फ्रान्सिस हॅल्झेन यांना भौतिकशास्त्रातील नोबेल

0
7

‘आईसक्यूब न्यूट्रिनो ऑब्झर्व्हेटरी’ आणि ‘हाय-एनर्जी न्यूट्रिनो’मधील संशोधनाचा सन्मान

भौतिकशास्त्र क्षेत्रातील यंदाच्या प्रतिष्ठित नोबेल पुरस्काराची घोषणा काल करण्यात आली. रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार बेल्जियममध्ये जन्मलेले प्रसिद्ध शास्त्रज्ञ फ्रान्सिस हॅल्झेन यांना जाहीर केला. अंटार्क्टिकामधील ‘आईसक्यूब न्यूट्रिनो ऑब्झर्व्हेटरी’मधील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी आणि अंतराळातून येणाऱ्या ‘हाय-एनर्जी न्यूट्रिनो’ कणांच्या शोधातील विशेष संशोधनासाठी त्यांना हा सर्वोच्च बहुमान प्रदान करण्यात येत आहे.

82 वर्षीय शास्त्रज्ञ फ्रांसिस हॅल्झेन हे सध्या अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन-मॅडिसनशी जोडलेले आहेत. नोबेल पुरस्कारांतर्गत त्यांना 12 दशलक्ष स्वीडिश क्रोनर (सुमारे 1.2 दशलक्ष अमेरिकन डॉलर) ही रक्कम सन्मानपूर्वक दिली जाणार आहे. त्यांच्या या संशोधनामुळे खगोलशास्त्रज्ञांना ब्रह्मांडात घडणाऱ्या अत्यंत ऊर्जावान आणि रहस्यमय घटनांच्या उगमाचा वेध घेणे शक्य झाले आहे, ज्यामुळे खगोलभौतिकशास्त्रात एक नवे दालन उघडले गेले आहे.

‘न्यूट्रिनो’ हे असे सूक्ष्म भौतिक कण आहेत जे कोणत्याही पदार्थातून न अडकता सहजपणे आरपार जाऊ शकतात. याच वैशिष्ट्‌‍यामुळे या कणांचा अभ्यास करणे वैज्ञानिकांसाठी अत्यंत आव्हानात्मक मानले जात होते. हॅल्झेन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संशोधनामुळे अंतराळातून येणाऱ्या या उच्च-ऊर्जा न्यूट्रिनोचा यशस्वीरीत्या शोध लावला गेला आणि त्यांच्या मूळ स्रोतांचा शोध घेणे शक्य झाले. यामुळे अंतराळातील अत्यंत दूरवरच्या घटनांचा माग काढण्यास मोठी मदत झाली आहे.

यंदाच्या नोबेल पुरस्कार सोहळ्याची सुरुवात सोमवारी वैद्यकशास्त्रातील विजेत्यांच्या घोषणेने झाली होती. त्यानंतर भौतिकशास्त्रातील पुरस्कार जाहीर करण्यात आला. आता चालू आठवड्यात रसायनशास्त्र, साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्र या उर्वरित क्षेत्रांतील नोबेल विजेत्यांची नावे टप्प्याटप्प्याने जाहीर केली जाणार आहेत. फ्रान्सिस हॅल्झेन यांच्या या अभूतपूर्व यशामुळे जगभरातील विज्ञान आणि खगोलशास्त्र क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.