फोडणीतील द्रव्यांचे गुणधर्म
जिरे

0
26
 • डॉ. मनाली महेश पवार

फोडणीसाठी आपण जे-जे पदार्थ वापरतो त्या सर्व द्रव्यांचा औषध म्हणूनसुद्धा वापर केला जातो. फोडणी ही केवळ पदार्थांची चव वाढवण्यासाठी नसते; त्यांचा आपल्या आरोग्यासाठीही उपयोग होतो, म्हणून भारतीय जेवणात या द्रव्यांना एक मुख्य स्थान आहे.

विश्‍वातील एकही द्रव्य असे नाही जे औषधी नाही, हे आपण सर्वच जाणतो. प्राचीनकाळी (आणि आतासुद्धा) काही आजारांवर औषधोपचार, प्रथमोपचार हे घरीच केले जायचे. प्रथमोपचाराने बरे वाटले नाही तर वैद्याचा सल्ला घेतला जायचा. आपल्या आहारात वापरल्या जाणार्‍या प्रत्येक द्रव्यामध्ये औषधी गुणधर्म असतात. त्याचप्रमाणे अगदी फोडणीसाठी आपण जे जे पदार्थ वापरतो- उदा. जिरे, मोहरी, हिंग, मेथी, लसणू वगैरे- या सर्व द्रव्यांचा औषध म्हणूनसुद्धा वापर केला जातो. या द्रव्यांनादेखील अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. फोडणी ही केवळ पदार्थांची चव वाढवण्यासाठी नसते; त्यांचा आपल्या आरोग्यासाठीही उपयोग होतो, म्हणून भारतीय जेवणात या द्रव्यांना एक मुख्य स्थान आहे.

जिरे
भारतीय पाकसंस्कृतीतील महत्त्वपूर्ण आणि चवीत भर टाकणारा फोडणीतील एक पदार्थ म्हणजे जिरे. जिरा राईस, जिर्‍याच्या फोडणीचे वरण, सूप, रायते व जिर्‍याचे पाणी असे विविध प्रकारे आपण जिरे खात असतो. फक्त जिरे फोडणीकरिता नाही तर शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवण्याकरिता याची मदत होते.
जिर्‍याचा शोध चार हजार वर्षांपूर्वी सीरिया आणि पूर्व इजिप्तमध्ये लागला. त्याकाळी त्याचा वापर मसाल्यासाठी केला जायचा. जिरे हा सुरुवातीपासूनच भारत, रोमन, ग्रीक इत्यादी संस्कृतींचा महत्त्वाचा भाग आहे.

अख्खे जिरे हे फोडणीकरिता वापरतात व आजकाल जिरा पावडरही बाजारात उपलब्ध आहे. जिरा पावडर ही मसाला म्हणून वापरली जाते. आजकाल जिर्‍याची पावडर सॅलड, सॉसेस आणि बार्बेक्यूजमध्येही केला जातो. ताकामध्येही या जिर्‍याची पावडर वापरतात. चाट प्रकारामध्येही जिरा पावडरीचा विशेष उपयोग केला जातो.

वर्णभेदानुसार जिरे काळे व सफेद असे दोन प्रकारचे असते. त्याचप्रमाणे शाही जिरे असा एक जिर्‍याचा तिसरा प्रकारही आहे. तिन्ही प्रकारच्या जिर्‍यामध्ये उडनशील तेल, जीवनसत्त्वे, खनिज द्रव्ये असतात. आयुर्वेदशास्त्रानुसार या तिन्ही प्रकारचे जिरे हे रुक्ष, उष्ण, दीपनकारक, ग्राही, पित्तकारक, मेध्य, गर्भाशय शुद्ध करणारी, ज्वरनाशक, पाचक, वीर्यवर्धक, बलकारक, रूचीकारक, कफनाशक, आध्यान, गुल्म, वमन, अतिसार नष्ट करणारे अशा गुणांनी संपन्न असते.
आधुनिक शास्त्रानुसार जिर्‍यामध्ये अँटी ऑक्सिडंटची मात्रा भरपूर असते. तसेच यामध्ये फायबर, कॉपर, पॉटेशियम, मँगनीज, कॅल्शियम, झिंक आणि मॅग्नेशियम यांसारखी मनरल्सही आढळतात. याशिवायही अनेक जीवनसत्त्वे असतात.

जिरे खाण्याचे फायदे

 • त्वचेसाठी ः जिर्‍यामध्ये आढळणार्‍या व्हिटॅमिन-ई मुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. जिर्‍यामध्ये अँटी फंगस गुणही असतात, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या इंफेक्शनपासून रक्षण होते. सोरायसिस व एक्झिमासारख्या आजारात जिर्‍याचा उपयोग होतो.
 • पचन ः जिर्‍याच्या सेवनाने जेवण लवकर आणि चांगले पचते. जीरे व धणे याने सिद्ध केलेले तूप सकाळ-संध्याकाळ जेवणाबरोबर सेवन केल्यास मंदाग्नी प्रदीप्त होतो. वात-पित्त यांसारख्या रोगात या तुपाचा उपयोग होतो.
  १०० ग्रॅम पाण्यात १०० ग्रॅम जिरे घालून २५ ग्रॅम पाणी उरेपर्यंत चांगले उकळावे व नंतर त्यात काळी मीर पूड व सैंधव घालून या काढ्याचे सवेन केल्यास करपट ढेकर शुद्ध होतात व अजीर्ण दूर होते. आवळ्यासोबत जिरे, ओवा आणि काळे मीठ मिसळून खाल्ल्यास भूक वाढते.
 • केसांसाठी ः काळ्या जिर्‍याचे तेल केसांना लावल्यास केस गळणे थांबते. रोज काळ्या जिर्‍याचे सेवन केल्यास केस दाट, काळे आणि मजबूत होतात. जिर्‍याचे तेल कोमट करून केसांना लावल्यास डोक्यातील कोंडा नाहीसा होतो.
 • ताप ः मलेरियासारख्या तापात १० ग्रॅम कारल्याच्या रसात ५ ग्रॅम जिर्‍याची पावडर घालून हे मिश्रण दिवसातून तीन वेळा सेवन करावे, याचा लाभ होतो. साधारण ४ ग्रॅम जिर्‍याचे चूर्ण गुळामध्ये मिसळून जेवणाअगोदर एक तास खाल्ल्याने विषम ज्वर, मंदाग्नी व वातरोगामध्ये आराम मिळतो.
 • सर्दी ः नाक बंद होण्याची समस्या असल्यास किंवा जास्त शिंका येत असल्यास जिरे चांगले भाजून त्याची पोटली बनवावी व ही पोटली थोड्या थोड्या वेळाने हुंगत राहावी. असे केल्याने चोंदलेले नाक सुटते व शिंकाही बंद होतात.
 • पोटदुखी ः कुठल्याही प्रकारची पोटदुखी असल्यास जिरे व साखर चांगले चावून-चावून खा, म्हणजे जिर्‍याचा जो रस निघतो त्या रसाच्या सेवनाने लगेच बरे वाटते.
 • उमासे येणे ः गर्भिणी स्त्रियांना जेव्हा उलटी आल्यासारखी वाटते तेव्हा जिरे चावून-चावून खाण्यास सांगावे, लगेच आराम मिळतो. तसेच जिर्‍यामध्ये लिंबूचा रस व काळे मीठ घालून ते जिरे गर्भिणीला चघळण्यास द्यावे, त्रास कमी होतो.
 • उलटी ः लहान मुलांना उलट्या होत असल्यास जिरे एका रेशमी कापडात गुंडाळून वाफ करावी. त्यातूून जो धूर येतो तो नाकाद्वारे आत घ्यावा, लगेच बरे वाटते.
 • उदरकृमी ः १५ ग्रॅम जिर्‍यामध्ये ४०० ग्रॅम पाणी घालून एक चतुर्थांश पाणी शेष उरेपर्यंत उकळावे व काढा पिण्यास द्यावा, पोटातील जंत मरतात.
  मूळव्याध ः अर्शाचा मोड जेव्हा गुदाबाहेर येऊन त्याला सूज येते तेव्हा काळ्या जिर्‍याच्या कोमट पाण्याने चांगले शेकावे. आराम मिळतो. तसेच ५ ग्रॅम सभेद जिरे पाण्यात चांगले उकळून त्याचा काढा सकाळ-संध्याकाळ सेवन केल्यास वेदना व सूज कमी होते.
 • सग्रहणी ः सुंठ व जिर्‍याची पावडर रोज सकाळ-संध्याकाळ अर्धातास काही खाण्याअगोदर दह्याबरोबर सेवन केल्यास आराम मिळतो. तसेच भाजलेले जिरे व बडीशेप अर्धा-अर्धा चमच सेवन केल्याने मुरड कमी होऊन होणारे सांडास बंद होते.
 • अतिसार ः जिर्‍याला गरम करून, कुटून दह्याबरोबर किंवा लस्सीबरोबर सेवन केल्यास लाभ होतो. लहान मुलांना अर्धा चमचा भाजलेल्या जिर्‍याची पूड पाण्याबरोबर दिल्यास अतिसार बंद होतो.
 • उचकी ः जिर्‍याला तुपात घोळून, वातीसारखी बनवून तो धूर तोंडावाटे आत घेऊन सोडल्याने उचकी थांबते.
 • स्तन्यजनन ः प्रसूतीकाळात बनवणार्‍या सर्व प्रकारच्या लाडवात जिरे चांगले तुपात भाजून घालावे व हे लाडू सूतिकेला खाण्यास द्यावे.
 • दंतशूल ः काळ्या जिर्‍याच्या काढ्याने गुळण्या केल्याने दंतशूल बंद होतो.
 • नेत्ररोग ः शाही जिरा किंवा सफेद जिरा उकळत्या पाण्यात टाकून, पाणी थोडे कोमट झाल्यावर त्या पाण्याने डोळे शेकावे किंवा धुवावे, नेत्ररोगांमध्ये आराम मिळतो.
 • मूत्रकृच्छ् ः लघवी करताना दुखत असल्यास किंवा दाट होत असल्यास जिरे पाण्यात उकळून त्यात खडीसाखर घालून पाणी पिल्याने बरे वाटते.
 • जिरे, धणे व साखर समभागात चूर्ण स्वरूपात करून एका डब्यात भरून ठेवावी व हे चूर्ण अर्धा-अर्धा चमचा जेवणानंतर अर्ध्या तासांनी रोज सेवन करावे. हायपर ऍसिडिटी दूर होते.
 • कॉलेस्ट्रॉल ः जिर्‍याच्या सेवनाने कॉलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राहते.

जिर्‍याचे पाणी
आजकाल जिर्‍याचे पाणी पिण्याचे खूप फॅड आहे, पण ते कसे बनवावे याबाबत योग्य माहिती नसते म्हणून जिर्‍याचे पाणी बनवण्याची रेसिपी येथे देते.
रात्रीच्या वेळी २ चमचे जिरे १ ग्लास पाण्यात भिजवावे (ग्लास किंवा भांडे तांब्याचे असेल तर त्या ग्लासचा वापर करावा) आणि सकाळी उठल्यावर हे पाणी चांगले उकळून गाळून घ्यावे. हे पाणी रिकाम्या पोटी चहासारखे गरम-गरम घ्यावे. पाणी गाळून उरलेले जिरे चावून खावे. हे जिर्‍याचे पाणी ज्यांना अनावश्यक जरबी कमी करायची आहे, त्यांच्यासाठी फार फायदेमंद आहे. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा उपाय कायम चालू ठेवू नये. हा उपाय पंधरा दिवस करावा, परत सात किंवा पंधरा दिवसांचा गॅप घ्यावा व परत हे पाणी प्यावे. असे केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
(क्रमशः)