फोंड्यातील उमेदवारीबाबत अद्याप निर्णय नाही : भाजप प्रदेशाध्यक्ष

0
6

फोंडा मतदारसंघात भाजपची उमेदवारी कुणाला द्यावी यासंबंधीचा निर्णय अद्याप झालेला नाही. पक्षाने त्याबाबत अजूनतरी निर्णय घेतलेला नाही, असे गोवा प्रदेश भाजपचे अध्यक्ष दामू नाईक यांनी काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना स्पष्ट केले. स्थानिक भाजप नेते आणि केंद्रीय नेते याबाबत चर्चा करून योग्य काय तो निर्णय घेणार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.

आपण लवकरच दिल्लीला जाणार असून दिल्लीत पक्षाच्या केंद्रीय नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी राज्यातील आगामी जिल्हा पंचायत निवडणूक तसेच फोंडा मतदारसंघातील गोवा विधानसभेची पोटनिवडणूक याबाबत चर्चा करणार असल्याचे नाईक म्हणाले.
रवी नाईक यांच्या दोघा पुत्रांपैकी एकाला भाजप उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे. त्याविषयी विचारले असता त्याबाबत पक्ष काय तो निर्णय घेणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

युतीतील घटक पक्ष मगोने रितेश नाईक यांना भाजपने उमेदवारी द्यावी, असे जे म्हटले आहे त्याविषयी विचारले असता त्याबाबत निर्णय घेताना आमचा घटक पक्ष असलेल्या मगोलाही विश्वासात घेण्यात येणार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.
जिल्हा पंचायत निवडणुकाविषयी पक्षाने रणनीती ठरवली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र, याबाबत आपण या घडीला जास्त काही सांगू शकत नसल्याचे ते म्हणाले.