फोंडा, साखळी नगरपालिका जाहीर प्रचाराची आज सांगता

0
10

फोंडा आणि साखळी या दोन्ही नगरपालिका मंडळाची निवड करण्यासाठी येत्या 5 मे 2023 रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता आज बुधवार 3 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. या दोन्ही नगरपालिका क्षेत्रांमध्ये निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. दोन्ही नगरपालिकांच्या मंडळांवर सत्ता मिळविण्यासाठी बड्या राजकीय नेत्यांकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. या दोन्ही नगरपालिका क्षेत्रात चुरशीच्या लढती अपेक्षित आहेत.

फोंडा नगरपालिकेमध्ये बहुमत मिळविण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न चालविले आहेत. फोंडा नगरपालिका निवडणुकीसाठी स्थानिक आमदार आणि राज्याचे कृषिमंत्री रवी नाईक प्रचारात सक्रिय झाले आहेत. भाजपचे स्थानिक नेतेसुद्धा प्रचार कार्यात गुंतलेले आहे. भाजपबरोबर स्थानिक नेते केतन भाटीकर, काँग्रेसचे स्थानिक नेते राजेश वेरेकर यांनी आपल्या समर्थकांना निवडून आणण्यासाठी जोरदार प्रचार सुरू ठेवला आहे. उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचारावर भर दिलेला आहे. केतन भाटीकर यांच्या नेतृत्वाखाली मगोपचे स्थानिक कार्यकर्ते राईझिंग फोंडाच्या बॅनरखाली नगरपालिका निवडणूक रिंगणात आहेत. तथापि, मगोपचे नेते, वीजमंत्री सुदिन ढवळीकर फोंडा नगरपालिका निवडणुकीपासून अलिप्त आहेत. तर, राजेश वेरेकर यांनी पाठिंबा दिलेले उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

फोंडा पालिकेच्या 2, 9 आणि 15 या प्रभागांत चुरशीची दुरंगी लढत होणार आहे. 5, 8,10,11 आणि 14 या पाच प्रभागात तिरंगी तर, 1,3,5,6 आणि 12 या पाच प्रभागात बहुरंगी आणि 7 व प्रभाग 13 मध्ये बिनविरोध निवड झालेली आहे.