मेरी इमॅक्युटलेट चर्चच्या फेस्तासाठीची फेरी येत्या १४ ते १८ डिसेंबरदरम्यान पणजीत भरणार असून, या फेरीत दुकाने थाटून व्यवसाय करण्यास इच्छुक असलेल्या दुकानमालकांना काल महापालिकेने ४०० अर्ज वितरित केले. हे अर्ज विकत घेण्यासाठी काल व्यावसायिकांनी पणजी महापालिकेसमोर गर्दी केली होती. महापालिकेने स्थानिक व आधारकार्ड असलेल्या व प्रथम आलेल्यांना प्रथम या तत्त्वावर काल अर्जांची विक्री केली. दरम्यान, अष्टमीच्या फेरीवेळी अर्ज वितरणात झालेल्या गोंधळातून महापालिकेने आता चांगलाच धडा घेतला आहे. गेल्या अष्टमीच्या फेरीच्या वेळी दुकाने थाटण्यासाठी आलेल्या व्यावसायिकांना हे अर्ज काळ्या बाजारात विकण्यात आल्याने ते मिळण्यास अडचण आली होती. त्याविरोधात आवाज उठवल्यानंतर हे प्रकरण बरेच गाजले होते.

