ुने गोवे येथे सेंट फ्रान्सिस झेवियरच्या फेस्ताच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांना सतर्क राहण्याची सूचना करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल सांगितले.
केरळ येथे धार्मिक स्थळातील बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क बनली आहे. फेस्ताला भेट देणाऱ्या नागरिकांच्या ओळखपत्राची कुठल्याही क्षणी तपासणी केली जाऊ शकते, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्ताच्या नऊ दिवसांच्या प्रार्थनासभांना गेल्या शनिवारी सुरू झाला. जुने गोवे येथे सेंट फ्रान्सिस झेवियरच्या फेस्तासाठी 1 लाखांपेक्षा जास्त भाविक चर्चला भेट देतात. गोव्याबरोबरच देशातील विविध राज्यातील भाविक आणि विदेशी नागरिक सुध्दा फेस्ताला भेट देतात. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील प्रत्येकी एक बॉम्बशोधक आणि निकामी पथके सुरक्षा तपासणीचा भाग म्हणून राज्य पोलिसांना मदत करण्यासाठी दाखल झाली आहेत, असेही त्यांनी सांगितले.
जुने गोवे फेस्तासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक दोन पाळ्यांमध्ये सुमारे 250 सशस्त्र पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहे. 1 पोलीस अधीक्षक आणि 1 पोलीस उपअधीक्षक यांचीही उपस्थिती असणार आहे, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली.