– मनस्विनी प्रभुणे
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली आणि तरुण तेजपालची बातमी आगीसारखी सगळीकडे पसरली. इफ्फीच्या मिडिया सेंटरमध्ये महोत्सवासाठी देशभरातून आलेल्या पत्रकारांना आयती बातमी मिळाली. दरवर्षी महोत्सवाचा एक वेगळा चेहरा त्यात दाखवल्या जाणार्या चित्रपटांमधून दिसून येत असतो. यावर्षी महोत्सवाचा कॅटलॉग हातात पडताच हा चेहरा स्पष्टपणे दिसून आला. महायुद्धाची पार्श्वभूमी, महिला केंद्रित चित्रपट यावर आधारित चित्रपट महोत्सवाचा चेहरा होता. ७४ देशांमधल्या दाखवण्यात येणार्या ३७४ चित्रपटांमध्ये महायुद्धाची पार्श्वभूमी, महिला केंद्रित विषय ठळकपणे दिसत होते. ‘जागतिक सत्य’ म्हणावे असे हे सूत्र वेगवेगळ्या देशांमधील, भाषांमधील चित्रपटांमधून बघायला मिळाले.
युद्ध-महायुद्धाची पार्श्वभूमी आणि नातेसंबंध
जर्मनी-ज्यू संबंध, छोट्या छोट्या देशांना पोहोचलेली झळ, इराक-इराण-अमेरिका संबंधाची पार्श्वभूमी, युद्धजन्य परिस्थिती आणि अशा परिस्थितीत जगणारी माणसं, लैंगिक शोषण, अत्याचार, बलात्कार यांना सामोरं जाताना जगण्याची धडपड करणार्या महिला आणि मुलं या सार्यांचे चित्रण ‘इन हायडिंग’, ‘युरोपा युरोपा’, ‘लास्ट ऑफ अनजस्ट’, ‘द जर्मन डॉक्टर’, ‘अ पीस इन हेवन’, ‘विव्हा बेलारूस’ या चित्रपटांमधून बघायला मिळाले. जर्मनीच्या अत्याचारांपासून स्वतःला बचावू न शकलेला पोलंडसारखा छोटासा देश. या देशातून दोन चित्रपटांना प्रवेश मिळाला आणि दोन्ही चित्रपट महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित होते. दिग्दर्शक यान किडावा ब्लोन्स्की यांनी ‘इन हायडिंग’ या सिनेमात नाझी अत्याचार, ज्यूंना करावे लागलेले पलायन, त्यातून भेटलेली नवनवीन माणसे, तयार झालेली नवीन नाती याचे अप्रतिम चित्रण या सिनेमामध्ये केले आहे. युद्धाची पार्श्वभूमी असताना मानवी नातेसंबंध रंगवण्याची कसब या दिग्दर्शकाने मोठ्या खुबीने सांभाळली आहे. ‘विव्हा बेलारूस’ हाही पोलंडच्याच युद्धाची पार्श्वभूमी असलेला सिनेमा. रशियन सैनिकांनी सोव्हिएतमधील छोट्या-छोट्या देशांवर केले हुकुमशाही पद्धतीचे अत्याचार, त्यांचा प्रतिकार करणारे कलाकार- लेखक- पत्रकार मंडळी आणि त्यांना अज्ञातवासाची भोगावी लागलेली शिक्षा, त्यांच्या अभिव्यक्तीवर आलेली गदा, सक्तीने लष्करात भरती व्हावे लागणे या सगळ्या गोष्टी भारतातील आणीबाणीच्या काळाची आठवण करून देतात.
मार्गरेटा व्हान ट्रोटा या दिग्दर्शिकेने ‘हानाह अरेंट’ या तिच्या चित्रपटामधून दुसरे महायुद्ध, नाझींच्या कारवाया याचे वेगळेपणाने चित्रण केले आहे. एक शिक्षिका जी पुढे पत्रकाराचा पेशा स्वीकारून नाझींच्या कारवायांवर नजर ठेवत असते. त्यांच्या छावण्यांमध्ये जाऊन त्यांची सगळी रहस्ये जगासमोर आणते. खूप नाट्यमयरीत्या चित्रपटाची कथा पडद्यावर मांडण्यात दिग्दर्शिका यशस्वी झाली आहे. या चित्रपटाची दिग्दर्शिका मार्गरेटा व्हान ट्रोटा ही ‘फेमिनिस्ट फ्लिममेकर’ म्हणून प्रसिद्ध आहे. तिच्या चित्रपटातील नायिका ही सामन्यांतून असामान्य ठरून जाते. ते या चित्रपटातही जाणवते. हानाहसारखी सशक्त नायिका या चित्रपटात उभी करून युद्धात महिलांचा सहभाग वेगवेगळ्या पातळीवर कसा होता हेदेखील दाखवून दिले आहे.
महिलांच्या प्रश्नांची कोंडी सोडवण्याचा प्रयत्न
इफ्फीमध्ये खूप सारे चित्रपट महिलाच्या प्रश्नांवर आधारित होते. विशेषतः इराण आणि अफगाणीस्तानमधील चित्रपट हे तिथल्या महिलांची स्थिती मांडणारे होते. अफगाणीस्तानचे दिग्दर्शक अतिक रहिमी यांच्या ‘द पेशन्स स्टोन’, इराणमधील दिग्दर्शिका पौरन देराखशान्देहचा ‘हुश्श गर्ल्स डोंट स्र्किम’ आणि मोरोक्को-फ्रान्समधील दिग्दर्शक मोहमद अहेद बेन्सुदा यांचा ‘बिहाइंड क्लोज डोअर’, अफगाणीस्तानमधील सेदिक अबेदी यांचा ‘अ मॅन डिझायर फॉर अ फिफ्थ वाईफ’ या सिनेमांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. अफगाणीस्तानचे दिग्दर्शक अतिक रहिमी यांच्या ‘द पेशन्स स्टोन’ या चित्रपटातील नायिका तालिबानी सैनिकांच्या कारवायांमध्ये कोमात गेलेला तिचा नवरा, घरातच त्याच्यावर करावे लागणारे उपचार यासारख्या परिस्थितीत त्याच्याजवळ व्यक्त होण्याची तिला मिळालेली संधी याचे अतिशय सुंदर चित्रण दिग्दर्शक रहिमी यांनी केले आहे. नवर्याशी कधीच मोकळेपणे वागायला मिळालेले नसते. नवर्याचा हवा तसा सहवास मिळालेला नसतो. त्याला कायम घाबरून राहण्यातच आयुष्य जात असतं अशा वेळेस तिचा होणारा कोंडमारा, मन मोकळं करण्याची तळमळ, याचे दर्शन या चित्रपटात बघायला मिळते. चित्रपटाची कथा खूप वेगळी ठरते. या कथेत दगडाला महत्त्व दिले आहे. आपल्याला आवडलेल्या एखाद्या मौल्यवान दगडाकडे तू आपलं मन मोकळं कर असा सल्ला देणारी नायिकेची आत्या आणि आत्याच्या सांगण्यावरून कोमात असलेल्या नवरारूपी ‘दगडा’ला आयुष्यातील सर्व गुपितं सांगणारी नायिका या सार्याची सुरेख मांडणी दिग्दर्शकाने या चित्रपटात केली आहे आणि याला गोल्डशिफ्ट फरहानी या अभिनेत्रीच्या उत्तम अभिनयाची जोड मिळाल्यामुळे चित्रपट एकदम जमून गेलाय. इराणमधील दिग्दर्शिका पौरन देराखशान्देहचा ‘हुश्श गर्ल्स डोंट स्र्किम’ आणि मोरोक्को-फ्रांसमधील दिग्दर्शक मोहमद अहेद बेन्सुदा यांचा ‘बिहाइंड क्लोज डोअर’ या दोन्ही चित्रपटांमधून महिलांचे होणारे लैंगिक शोषण, अत्याचार दाखवण्यात आले आहे. महिलांच्या समस्यांमध्ये सर्वत्र समानता आहे. जे चित्रण भारतातील सिनेमांमध्ये बघायला मिळते तेच इराण, अफगाणीस्तान, फ्रांस, जपान अशा जगातील नकाशावर वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या देशांमध्ये बघायला मिळते.
इफ्फीवर दिग्दर्शिकांचा प्रभाव
उक्रेनच्या व्हिक्टोरिया ट्रोफिमेंको, इराणमधील दिग्दर्शिका पौरन देराखशान्देह, भारतातील वीणा बक्षी, इटलीमधील इमा दांते, कानडाच्या लुईस अर्चमबोउल्त, फ्रान्सच्या निकोल ग्रासिया, नेदरलँडच्या नानुक लिओपोल्ड, सर्बियाच्या जेलेना बाजिक जोसीस, फ्रान्सच्या इव्हा पेर्वोलोविक, बेल्जियमच्या डेल्पीन लेहेरीसी, कानाडाच्या चोल रोबिचाउद, इनग्रिड विनेगर, फ्रांसच्या काटेल कुइलिवेर, अर्जेन्टिनाच्या लूइसा प्यूएझो, रशियाच्या अलेक्सझाड्रा स्ट्रेलयाना, चिलीच्या मार्सेला सैद, फिलिपिन्सच्या हानाह अस्पिया, जर्मनीच्या अना झोहरा बेर्राचेद, इंडोनेशियाच्या मौली सूर्या, जर्मनीच्या मार्गरेटा व्हान ट्रोटा, डेन्मार्कच्या सुसान बीर, फ्रान्सच्या क्लाअर डेनिस, पोलंडच्या मल्गोर्झाता स्झुमोवस्का, फ्रान्सच्या अक्षेल रोपेर्त, मेक्सिकोच्या क्लौडिया सांते लूस, ग्रीसच्या ओल्गा मलेआ, पेंनी पनियाटोपौलू, एलिना पसकौ, मारिया डोउझा, भारतातील रुथ झाबवाला, सुमित्रा भावे या बत्तीस दिग्दर्शिकांच्या चित्रपटांचा समावेश या महोत्सवात होता. फक्त महिलांचेच विषय न हाताळता सामाजिक, राजकीय विषयांवर आधारित चित्रपट या दिग्दर्शिकांनी हाताळलेले आहेत. निर्मात्या म्हणूनही असंख्य महिलांची नावे या महोत्सवाच्या निमित्ताने पुढे आली.
काही चित्रपटांनी निराशा केली
इफ्फीमध्ये असेही काही चित्रपट होते की त्यांची निवड कोणत्या आधारावर केली गेली अशी शंका अनेकांच्या मनात येऊन गेली. ना चांगल्या कथेचा बेस, सुमार दिग्दर्शन आणि गोष्टींच्या उणिवा यामुळे चित्रपट रसिकांना हे चित्रपट आवडले नाहीत. चित्रपट सुरू असतानाच अनेकजण उठून जायचे. निवड समितीवर तोंडसुख घेणारेही अनेकजण इथे भेटले. भरगच्च कार्यक्रम, चांगले चित्रपटांचे पुन्हा प्रक्षेपण न होणे, तिकीट पद्धत, हॉल भरला म्हणून आत न सोडणे, व्यवस्थापनात ढिसाळपणा या सार्यामुळेही अनेकजण त्रस्त झाले. सर्वात जास्त त्रास झाला तो तिकीट काढण्याच्या व्यवस्थेचा आणि तिकीट नाही म्हणून लावाव्या लागलेल्या भल्या मोठ्या रांगेचा. तिकीट पद्धत कशासाठी? हा प्रश्न दरवर्षी उभा राहतो पण त्यावर उपाय काही निघत नाही.
गर्दी खूप पण दर्दी कमी
जगभरातून- देशभरातून वेगवेगळ्या राज्यांतून आलेले चित्रपट समीक्षक, आस्वादक यांच्याबरोबरीने सिनेमा स्कूलमधील असंख्य विद्यार्थी इफ्फीसाठी आले होते. जवळजवळ सर्व चित्रपट ‘हाउसफूल’ व्हायचे इतकी गर्दी व्हायची. पण सिनेमा सुरू झाल्यानंतर केवळ १० ते १५ मिनिटे बसून लगेच उठून जाणारे अनेकजण बघायला मिळाले. ज्या सिनेमामध्ये सेक्सने भरलेली भरपूर दृश्य आहेत अशा सिनेमांना जास्त गर्दी हे समीकरणच बनून गेले होते. सिनेमा स्कूलचे विद्यार्थी नेमकं सिनेमातील काय बघायला आले होते असा प्रश्न पडत होता. चांगल्या सिनेमांकडे पाठ आणि भरपूर ‘हॉट सीन’ असलेल्या सिनेमांना गर्दी अशी जाणवणारी परिस्थिती यावर्षीच्या महोत्सवात होती.