– शंभू भाऊ बांदेकर, साळगाव
गेल्या १३ जूनपासून सुरू झालेल्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेची पहिली फेरी संपून दुसर्या फेरीला धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. तशी ही सुरुवात – आणि ती ही ब्राझिलमध्ये थोड्या निराशेच्या सुरातच झाली.
ब्राझिलमधील सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणजे फुटबॉल. ब्राझील आणि फुटबॉल हे जणू जागतिक समीकरणच होऊन गेले आहे. याचे कारण प्रत्येक ब्राझिलियनांच्या नसांनसांत फुटबॉल हा खेळ भिनलेला आहे. अगदी प्रत्येक रस्त्यारस्त्यावर, समुद्रकिनार्यावर व लहान-मोठ्या मैदानावर हा खेळ थोडासासुद्धा मोकळा वेळ मिळाला की खेळला जातो.
ब्राझिलियन संस्कृतीवरही फुटबॉल खेळाचा प्रचंड पगडा आहे. या देशात फुटबॉल पाहणे तर आलेच, पण हा खेळ न खेळलेला अवलिया सापडणे अवघडच. त्यामुळेच असेल कदाचित या देशाने पेले, रोनाल्डो, रियाल्डो, रोनाल्डिन्हो, काकासारखे अनेक दिग्गज फुटबॉलपटू दिले आणि जगभरच्या फुटबॉलशौकिनांनीही त्यांना डोक्यावर घेतले. ब्राझील संघाचा सामना सुरू असेल तर दोन-अडीच तासांसाठी या देशातील कामकाज ठप्प होऊन जाते आणि ब्राझिलियन सारा जीव डोळ्यांत आणून हा खेळ बघतात. पण अशा ब्राझिलमध्ये विश्वचषक फुटबॉलच्या सुरुवातीला मात्र कडाडून विरोध झाला. बेकारी, शिक्षणाचा अभाव, पायाभूत सुविधांची वानवा, भ्रष्टाचार, गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण यामुळे त्रस्त झालेली जनता या महामेळाव्याच्या विरोधात ठामपणे उभी राहिली. पण तेथील फुटबॉलशौकिनांनी, धुरिणांनी व राजकारण्यांनी यावर कडी करून मोठ्या धुमधडाक्यात खेळाला प्रारंभ केला.
अत्यंत लालित्यपूर्ण अशा या खेळात सावधगिरी, आक्रमण, बचाव, गतीशीलता या सार्यांचे प्रदर्शन अत्यंत कौतुकास्पद असते. असे असूनही हा खेळ पाहता पाहता आपल्या खेळाडूने साजेशी कामगिरी केली नाही, आपल्या आवडत्या संघाने, देशाने आवश्यक पल्ला गाठला नाही म्हणून देशातील आणि जगभरातील फुटबॉलशौकिनांचा अपेक्षाभंग झाला, तरी खेळातील थरार डोळ्यांचे पारणे फिटेपर्यंत पाहून समाधान पावत आहेत.
आमचे गोव्यातील फुटबॉलप्रेमी तर रात्री ९.३०, रात्री १२.३० आणि पहाटे १.३० असे दिवसरात्र तीन तीन सामने बघून परत सकाळची सुरुवात फुटबॉल सामन्याच्या चर्चेपासूनच करत आहेत.
यावेळी जागतिक नामांकनात स्पेन, इटली, इंग्लंड, पोर्तुगाल, क्रोएशिया या बलाढ्य युरोपियन संघांना पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड, अर्जेंटिना, घाना आदी संघांनी रसिकांची वाहव्वा मिळवली आहे. त्यातल्या त्यात अर्जेंटिनाचा मेस्सी, ब्राझिलचा नेमार, जर्मनीचा थॉमस मुलेर, हॉलंडचा अर्जन रॉबेन, मेक्सिकोचा राफेल मार्केझ या खेळाडूंनी आपली ताकद पणाला लावून फूटबॉलप्रेमींची मने जिंकली आहेत. यजमान ब्राझील आणि क्रोएशिया यांच्यातील सामन्याने प्रारंभ झालेल्या या स्पर्धेत दिवसेंदिवस थरार वाढतो आहे आणि प्रेक्षकही बेकरार बनत आहेत.
वानगीदाखल दोन उदाहरणे देता येतील. उरूग्वेचा धडाकेबाज पण तितकाच सनकी फूटबॉलपटू लुईझ सुआरेझ याचे. आता तो ‘‘चावरा’’ खेळाडू म्हणून जगप्रसिद्ध पावला आहे. २४ जून रोजी इटली विरुद्ध उरूग्वे या सामन्यात रंगत आली होती. दोन्ही संघांचे खेळाडू मनापासून व ‘जिंकू किंवा मरू’च्या इराद्याने खेळत होते. इटलीचा सामना बरोबरीत सुटला तरी काही विशेष गमवावे लागले नसते, पण उरूग्वे हरला तर त्यांना घरची वाट धरावी लागली असती. अशावेळी इटलीचा बचावपटू जॉर्जियो शिएलिनी आणि सुआरेझची धडकाधडकी झाली आणि मजेखातर खांद्यावर हात मारावा तशा आविर्भावात सुआरेझने जॉर्जियोच्या खांद्याचा चावा घेतला आणि जसे काही झालेच नाही, अशा आविर्भावात पुढे सटकला, पण व्हिडिओक्लिपिंगमध्ये सारे ‘उघड’ झाले होते. हा सामना उरूग्वेने जिंकला हे खरे, पण सुआरेझमुळे जगभरातून त्यांच्या संघावर टीका झालीचे. सुआरेझला हे चावा-प्रकरण भलतेच भोवले आहे.
‘फिफा’च्या शिस्तपालन समितीने सुआरेझ याच्या नऊ आंतरराष्ट्रीय सामन्यांवर बंदी घातली आहे. शिवाय त्याला १ लाख १९ हजार अमेरिकी डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. उरूग्वे संघ अजूनही खेळणार असला तरी या ‘चावर्या’ला अर्थातच त्यात स्थान नसेल.
दुसरी गोष्ट आहे अर्जेंटिनाचा खेळाडू कार्लोस टेवेझ याची. ही गोष्ट पहिल्यापेक्षा थोडी वेगळी आहे. काहींना हे सूडनाट्य वाटते तर काहींना शिस्तपालन वाटते. तीन वर्षांपूर्वी झालेल्या कोपा अमेरिका स्पर्धेत उरूग्वेविरुद्ध पेनल्टीची संधी वाया दवडणार्या या अर्जेंटिनाच्या ३० वर्षीय खेळाडूला या विश्वचषक संघातून वगळण्याचा निर्णय अर्जेंटिनाचे प्रशिक्षक अलेजॅन्ड्रो सावेला यांनी घेतला. आज अर्जेंटिनाचा मेस्सी फॉर्ममध्ये असला तरी अर्जेंटिनाचा जागतिक फुटबॉल खेळाडू डायगो मारोना यांच्याशी कार्लोझ टेवेझशी बरोबरी करण्याचे काम त्या देशातील लोक करीत. कार्लोझ टेवेझबद्दल सांगायचे म्हणजे ज्युवेंट्स या संघाचे प्रतिनिधित्व तो करीत असून यंदाच्या हंगामात तो चांगच्या फॉर्ममध्ये आहे. त्याने केलेल्या १९ गोलांच्या जोरावरच जुवेंल्स संघाने सीरीए स्पर्धेच्या जेतेपदाचा कब्जा केला. टेवेझचे हे गेल्या सहा वर्षातील चौथे जेतेपद आहे. असा हा कार्लोझ आपल्याला विश्वचषक करंडक सामन्यातून वगळल्याबद्दल नाराज असून ‘‘मी कोणताही सामना पाहणार नाही. अर्जेंटिनाचा संघ कशी कामगिरी करतोय याकडेही मी लक्ष देणार नाही. मी माझ्या कुटुंबासोबत आहे व सध्या गोल्फ खेळ खेळतोय. मी फुटबॉलपटू आहे आणि या खेळाच्या सर्वोत्तम सोहळ्यात मी नसल्याने मला एकटे पडल्यासारखे वाटते आहे’’, असे सांगत आहे. अर्थात त्याचे चाहतेही यामुळे बेजार आहेत हे ओघानेच आले.
एका बाजूने विश्वकरंडक फुटबॉलचा थरार चालू असताना दुसर्या बाजूने आवडत्या संघाच्या खराब प्रदर्शनामुळे आणि काही चावर्या- बोचर्या घटनांमुळे बेकरार झालेल्या प्रेक्षकांमुळेही एक निराळी रंगत या स्पर्धेला आली आहे.

