फा. परेरा यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर

0
8

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी फादर बोलमॅक्स परेरा यांना दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने काही अटी-शर्थींसह काल अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला. फा. परेरा यांनी तपासात पोलिसांना सहकार्य करावे आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्यांनी राज्याबाहेर जाऊ नये, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.

फादर बोलमॅक्स परेरा यांनी चिखली येथील चर्चमध्ये धर्मोपदेश करताना शिवरायांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर गेल्या शुक्रवारी रात्री शिवप्रेमींनी वास्को पोलीस स्थानकावर धडक देत त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्वरित अटकेची मागणी केली होती.

काल सरकारी पक्षाने आपली बाजू मांडली. वास्को पोलिसांनी परेरा यांना पोलीस कोठडीची गरज नसल्याचे सांगितले. तसेच परेरांच्या वकिलांनीही युक्तिवाद केला. त्यानंतर दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायाधीश शमा जोशी यांनी त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. तसेच फा. परेरा यांना अटक केल्यास 20 हजार रुपयांच्या वैयक्तिक आणि अन्य एका त्याच रकमेच्या हमीवर मुक्त करावे, असेही आदेशात म्हटले आहे.