फार्मा कंपनीची नोकरभरतीची जाहिरात वादाच्या भोवऱ्यात

0
9

विरोधी पक्षांकडून आक्षेप; मुख्यमंत्र्यांकडे कंपनीवर त्वरित कारवाईची मागणी

वेर्णा येथील इंडोको रेमेडीज या फार्मा कंपनीची देशपातळीवर नोकरभरतीची जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राज्यातील विरोधी पक्षांनी फार्मा कंपनीच्या गोव्याबाहेरील नोकरभरतीच्या जाहिरातीला आक्षेप घेतला आहे. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने या देशपातळीवरील नोकरभरतीला आक्षेप घेतला आहे. दरम्यान, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, आमदार विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे इंडोकोच्या नोकरभरती जाहिरातीकडे लक्ष वेधून या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सोशल मीडियावर इंडोको रेमेडीजची नोकरभरतीची जाहिरात व्हायरल झाली आहे. नोकरभरती प्रक्रिया 17 जूनपासून सुरू झाली असून, ती 29 जूनपर्यंत विविध राज्यांतील ठिकाणी राबवली जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
फोल : युरी आलेमाव

फार्मा कंपन्यांकडून अन्य राज्यांमधून उमेदवारांची करण्यात येणारी भरती चुकीची असून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे स्थानिकांना नोकरी देण्याचे आश्वासन फोल ठरल्याची टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी 24 मे रोजी फार्मा कंपन्यांत इतर राज्यांतील उमेदवारांची भरती होणार नाही आणि स्थानिक तरुणांना प्राधान्य मिळेल, असे जाहीर आश्वासन दिले होते. मात्र, हे धोरण आजतागायत प्रभावीपणे राबवले गेलेले नाही, असा आरोप आलेमाव यांनी केला.

आरजीपीची कंपनीवर धडक
आरजीपी या प्रादेशिक पक्षाने इंडोको रेमेडीजच्या देशपातळीवरील नोकरभरतीच्या जाहिरातीला आक्षेप घेतला आहे. आरजीपीचे प्रमुख मनोज परब, आमदार वीरेश बोरकर व इतरांनी वेर्णा येथील इंडोको कंपनीला काल भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी नोकरभरती जाहिरातीच्या विषयावर चर्चा केली. कंपनीकडून कामगार भरतीसाठी गोव्यात जाहिरात प्रसिद्ध केली. तथापि, कोणताही प्रतिसाद लाभलेला नाही, असा दावा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केल्याची माहिती मनोज परब यांनी दिली. राज्यातील कंपन्यांना आवश्यक मनुष्यबळ तयार करण्याकडे राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी मनोज परब यांनी केली.

मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आश्वासन
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी इंडोको रेमेडीजच्या नोकरभरतीला आक्षेप घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क साधून या प्रकरणात त्वरित लक्ष घालण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून आवश्यक कारवाईचे आश्वासन दिले आहे, असे विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे.