फातोर्डा पोलिसांकडून संशयिताला अटक; विविध कलमांखाली गुन्हा नोंद
रक्ताच्या नात्यातील माणसे कशी नराधम बनू शकतात याचा प्रत्यय आणून देणारी घटना फातोर्डा पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली. सख्ख्या काकानेच आपल्या दोन अल्पवयीन पुतणींवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आले असून, पोलिसांनी काल त्याला गजाआड केले. चोंदुला उर्फ चंदू सोरेन (51) असे संशयिताचे नाव आहे.
या प्रकरणी पीडित मुलींच्या आईने काल फातोर्डा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तपास करत संशयितास अटक केली. चंदू इमारत बांधकाम कामगार असून, तो मूळ झारखंड येथील आहे. पीडित अल्पवयीन मुली ह्या सख्ख्या बहिणी असून, त्या अवघ्या 10 व 8 वर्षांच्या आहेत.
पीडित मुलींची आई कामानिमीत्त हल्लीच बाहेरगावी गेली होती. त्यामुळे दोन्ही मुलींना शाळेत ने-आण करण्याचे काम चंदू हा करीत असे. मार्च व एप्रिल महिन्यात या चिमुकल्या मुलींवर त्याने अत्याचार केले. या प्रकरणाची कुठेही वाच्यता केल्यास तुम्हाला कायमचे संपवून टाकण्याची धमकी त्याने दिली होती. त्यामुळे भीतीने दोघीजणी घाबरून गेल्या होत्या. परिणामी त्यांनी या प्रकाराची कुठेही वाच्यता केली होती.
सदर मुलींची आई जेव्हा गोव्यात परतली तेव्हा त्यांनी आपल्या आईला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलीस तक्रारीनुसार त्याला अटक करण्यात आली.
‘बायलांचो एकवट’च्या आवदा व्हिएगस यांच्या उपस्थितीत पोलिसांनी मुलींची चौकशी केली. त्यानंतर संशयित चंदूवर पोलिसांनी पोक्सो कायदा व गोवा बाल कायदा कलम 8 खाली गुन्हा नोंद केला आहे.

