फर्मागुडी येथे शिवजयंती उत्सव

0
109
फर्मागुडी येथील शिवरायांचा पुतळा व किल्ला.

माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे फर्मागुडी येथे गुरूवार दि. १९ रोजी सकाळी ९ वा. राज्यस्तरीय शिवजयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, उद्योगमंत्री महादेव नाईक, माहिती आणि प्रसिद्धी मंत्री मिलिंद नाईक, बाष्पक मंत्री दीपक ढवळीकर, आमदार लवू मामलेदार, खात्याचे सचिव पवन सेन आणि मुख्य सचिव केवलकुमार शर्मा, जिल्हा पंचायत सदस्य पूर्णिमा नाईक व बांदोडा सरपंच नयन नाईक, तसेच िइतान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याळा पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर मान्यवर पुष्पांजली वाहतील. यावेळी प्रमुख वक्ते प्रा. कृष्णाजी कुलकर्णी हे शिवाजी महाराजांवर आपले विचार प्रकट करतील. यानंतर विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
बालभवनचे विद्यार्थी गीते आणि पोवाडा सादर करणार आहेत. तसेच यावेळी दादा वैद्य विद्यालयाचे विद्यार्थी लेझिम नृत्य सादर करतील.
संध्याकाळी ७ वा. रवळनाथ प्रासादिक नाट्यमंडळ नागेशी-बांंदोडातर्फे ‘करीन ती पूर्व’ हे ऐतिहासिक नाटक सादर करण्या येणार आहे. कुडचडे रवींद्र भवनात ललितप्रभा वळवईतर्फे ‘शहा शिवाजी’ हे नाटक सादर करण्यात येणार आहे. यावेळी शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
म्हापशात शिवजयंती
म्हापसा येथील हुतात्मा चौकात गुरूवार दि. १९ रोजी बार्देश तालुका पातळीवर शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून म्हापशाच्या नगराध्यक्ष रुपा भक्ता उपस्थित राहणार असून जयंती समारोह समितीचे अध्यक्ष गुरुदास नाटेकर, एकनाथ नार्वेकर तसेच प्रमुख वक्ते म्हणून दै. नवप्रभाचे संपादक परेश प्रभू उपस्थित राङणार आहेत. यावेळी मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहेत. त्यानंतर उपस्थित नागरिकांकडून पुष्पे अर्पण करण्यात येतील. सरकारी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, अन्साभाट व ज्ञानप्रसारक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांतर्फे गीते सादर केली जातील.
यानंतर श्री. प्रभू हे शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध विशेष पैलूंवर प्रकाश टाकतील.
यावेळी सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष श्री. नाटेकर, चिटणीस विश्‍वासराव नागवेकर खजिनदार रवींद्र फोगेरी यांनी केले आहे.