फर्मागुडीत उद्या अमित शहा यांची सभा

0
7

तयारी अंतिम टप्प्यात; मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; 25 हजार कार्यकर्त्यांची उपस्थिती शक्य

फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळील मैदानावर रविवार दि. 16 एप्रिल रोजी संध्याकाळी 4 वाजता आयोजित केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जाहीर प्रचार सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सभेच्या स्थळाला भेट देऊन आयोजनाची पाहणी काल केली. या सभेला साधारण 25 हजार कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

आगामी लोकसभेच्या निवडणूक प्रचाराला अमित शहा यांच्या जाहीर सभेने प्रारंभ होणार आहे. भाजपने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे दक्षिण गोव्यातील फर्मागुडी-फोंडा येथे शहा यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
देशातील लोकसभेच्या निवडणुकीला आता केवळ एक वर्षापेक्षा कमी अवधी राहिला आहे. भाजपने या निवडणुकांचे रणशिंग यापूर्वीच फुंकले आहे. गोव्यातील दोन्ही जागांवर भाजपचा झेंडा फडकावण्यासाठी कार्यकर्ते आणि नेते आत्तापासूनच कामाला लागले आहेत.
अमित शहा यांच्या दौऱ्याची तयारी युद्ध पातळीवर सुरू आहे. शहा यांच्या जाहीर सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी काल केले. कालच्या पाहणीवेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मंत्री गोविंद गावडे, सरचिटणीस नरेंद्र सावईकर हे उपस्थित होते.

प्रत्येक प्रभागात भाजपचा उमेदवार उभा करणार
फोंडा आणि साखळी या दोन्ही नगरपालिकांच्या प्रत्येक प्रभागात भाजपचा उमेदवार उभा करण्यात येणार आहे. या दोन्ही नगरपालिकांमध्ये भाजपचे उमेदवार बहुसंख्येने निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना काल केला. नगरपालिका निवडणूक ही पक्षीय पातळीवर लढविली जात नसली तरी, भाजप संघटन या निवडणुकीसाठी सक्रिय झाले आहे. दोन्ही नगरपालिकांमध्ये भाजपचे कार्यकर्ते निवडून आणण्यासाठी पक्षीय पातळीवर प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.