Home Featured प. बंगालमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता

प. बंगालमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता

0

>> आसाममध्ये भाजप तर तामिळनाडूत डीएमके

>> मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज

पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल येत्या सोमवारी जाहीर होणार आहेत. येत्या सोमवारी दि. 4 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहेत. मात्र तत्पूर्वी एक्झिट पोलच्या (मतदानोत्तर चाचण्या) अंदाजानुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना धक्का बसण्याची शक्यता असून आसाममध्ये भाजपची सत्ता कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. तसेच तामिळनाडूमध्ये पुन्हा द्रमुकच येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या पाच राज्यांतील प. बंगाल वगळता अन्य चार राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान झाले. बंगालमध्ये काल बुधवारी दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान झाले. त्यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल्स समोर आले आहेत. गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला धक्का बसून सत्तांतर होण्याचा अंदाज आहे.
देशातील चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात नुकतेच मतदान झाले. आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये या चार राज्यांमध्ये आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात मतदान झाले. पाचही राज्यांमध्ये 3 ते 12% मतदान वाढले असून पाचही राज्यांमध्ये यावेळी विक्रमी मतदान झाले. सर्वात मोठे कारण मतदार यादी पुनरावृत्ती (एसआआर) असल्याचे सांगितले जात आहे. पश्चिम बंगालमध्ये 294 जागांसाठी मतदान झाले असून इथे तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात जोरदार लढत आहे. केरळमध्ये 140 जागांसाठी, आसाममध्ये 126 जागांसाठी, तामिळननाडूमध्ये 234 तर पुदुच्चेरीमध्ये 30 जागांसाठी मतदान पार पडले.

पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या
टप्प्यासाठी 92 टक्के मतदान
पश्चिम बंगालमधील 142 जागांसाठीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत नोंदवल्या गेलेल्या आकडेवारीनुसार, मतदानाचे प्रमाण 91.79% इतके राहिले. मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान, अनेक ठिकाणी हिंसाचार, हाणामारी, लाठीमार आणि ईव्हीएममध्ये फेरफार करण्याच्या घटनांची नोंद झाली.
यानंतर आता प्रत्येक राज्यांचे एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. आसाममध्ये भाजप विजयाची हॅटट्रिक करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इथे भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना धक्का बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प. बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून भाजपच्या जवळपास सगळ्या मुख्यमंत्र्यांनी बंगालमध्ये जोरदार प्रचार केला होता. एसआयआरचाही भाजपला लाभ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम बंगालसाठीच्या सहा एक्झिट पोल्सच्या निकालांपैकी पाच पोल्समध्ये भाजपचे सरकार तर एका पोलमध्ये तृणमूलचे सरकार येईल असे भाकीत करण्यात आले आहे.मॅट्रिझच्या अंदाजानुसार, तृणमूल काँग्रेसला 125 ते 140, तर भाजपला 146 ते 161 जागा मिळतील. सत्ता स्थापनेसाठी 148 बहुमताचा आकडा आहे.

भाजप सत्तांतर करण्यात यशस्वी ठरेल, असा अंदाज ‘प्रजा’कडूनही वर्तवण्यात आला आहे. प्रजाने दिलेल्या आकडेवारीनुसार, तृणमूल काँग्रेसला 85 ते 110, तर भाजपला 178 ते 208 जागा मिळू शकतात. तर अन्य पक्षांना 0 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज आहे. चाणक्य स्ट्रॅटर्जीच्या आकडेवारीनुसार, तृणमूल आणि भाजपमध्ये जोरदार लढत होणार असून तृणमूलला 130 ते 140, भाजपला 150 ते 160 तर इतर पक्षांना 6 ते 10 जागांवर यश मिळू शकते.
‘पीपल्स पल्स’च्या अंदाजानुसार तृणमूल 177 ते 187 जागा जिंकेल, तर भाजप 95 ते 110 जागांवर विजय मिळवेल. ‘पी-मार्क’ एक्झिट पोलनुसार, तृणमूलला 118 ते 138 जागा तर भाजपला 150 ते 175 जागा मिळतील.‘पोल डायरी’ने तृणमूल 99 ते 127 जागा तर भाजप 142 ते 171 जागांवर विजय मिळवेल असा अंदाज वर्तवला आहे.

आसाममध्ये भाजपच सत्तेत

आसाममध्ये विविध चाचण्यांच्या अंदाजांनुसार भाजपचे कमळ फुलण्याची शक्यता आहे. इथे भाजपला 88 ते 100 जागा मिळतील तर काँग्रेसला 24 ते 36 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आसामसाठी 8 एक्झिट पोल्सनी भाजपच्या सत्तेत पुनरागमनाचा अंदाज वर्तवत आहेत
एक्सिस माय इंडिया’ ने भाजपला 88 ते 100 जागा, तर काँग्रेसवा 24 ते 36 जागा मिळतील असा अंदाज दिला आहे. ‘मेट्रिज’ने भाजपला 85 ते 95 जागा आणि काँग्रेसला 25 ते 32 जागा दिल्या आहेत. पीपल्स पल्सने भाजपला 68 ते 72 आणि काँग्रेसला 22 ते 26 जागा दिल्या आहेत. ‘पी मार्क’ ने भाजपला 82 ते 94 जागा आणि काँग्रेसला 30 ते 40 जागांचा अंदाज वर्तवला आहे. ‘जेव्हीसी’ ने भाजपसाठी 88 ते 101 आणि काँग्रेससाठी 23 ते 33 जागांचा अंदाज दिला आहे. ‘चाणक्य स्ट्रॅटेजी’च्या अंदाजानुसार भाजप 88 ते 98 जागा जिंकेल आणि काँग्रेस 22 ते 32 जागा जिंकेल. ‘पोल डायरी’च्या अंदाजानुसार भाजप 86 ते 101 जागी आणि काँग्रेस 15 ते 26 जागी विजयी होईल. तर ‘वोट वाइब’ने भाजपला 90 ते 101 जागा आणि काँग्रेसला 23 ते 33 जागा दाखवल्या आहेत.

तामिळनाडूत द्रमुक

तमिळनाडूसाठी 5 एक्झिट पोल्सनी अंदाज वर्तवला असून त्यातील 4 मध्ये पुन्हा द्रमुक सत्तेत येणार असल्याचे म्हटले आहे. ‘मेट्रिज’च्या अंदाजानुसार द्रमुक व आघाडी 122-132, मिळवेल, तर अद्रमुक व आघाडी 87-110 जागा जिंकेल. ‘पी मार्क’ने द्रमुक व आघाडीला 125-145 जागा तर अद्रमुक व आघाडीला 65-85 जागा मिळतील असे म्हटले आहे. ‘पीपल्स इनसाइट’ने द्रमुक व आघाडीला 120-140 जागा आणि अद्रमुक व आघाडीला 60-70 जागा मिळतील असे नमूद केले आहे. ‘जेव्हिसी-टाइम्स नाऊ’च्या अंदाजानुसार द्रमुक व आघाडीला 75-95 जागा आणि अद्रमुक व मित्रपक्षांना 128-147 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. ‘पीपल्स पल्स’ च्या अंदाजानुसार द्रमुक व आघाडी 125-145 जागा जिंकेल, तर अद्रमुक व आघाडी 65-80 जागा मिळवेल.

केरळमध्ये काँग्रेसची सत्ता?

केरळमध्ये एक्झिट पोलच्या अंदाजानुसार सत्तांतर होऊ शकते. देशात सध्या डाव्या पक्षांची सत्ता एकमेव केरळ राज्यात आहे. एक्सिस माय इंडियाच्या अंदाजानुसार इथे काँग्रेसच्या नेतृत्वातील यूडीएफला 78 ते 90 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, भाजपला 0-3 जागा मिळू शकतात. डाव्या पक्षांच्या एलडीएफला 140 जागांपैकी 49 ते 62 जागा मिळू शकतात.

पुद्दुचेरीत एनडीए

पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात ही निवडणूका झाल्या होत्या. या ठिकाणी पीपल्स पल्सच्या एक्झिट पोलनुसार एनडीए- 16-19, एसपीए- 10-12 इतर- 1-2 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर एक्सेस माय इंडिया नुसार एनडीएला 16-20 जागा मिळतील. तर काँग्रेसला 6-8 तर टीव्हीकेला दोन ते चार जागांचा अंदाज आहे.