31 C
Panjim
Monday, January 25, 2021

प्लास्टिक बंदीकडे

संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने जगभरामध्ये ‘सिंगल यूज प्लास्टिक’ हद्दपार करण्याचे प्रयत्न चालले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील उद्याच्या गांधी जयंतीपासून ‘सिंगल यूज प्लास्टिक’ विरुद्ध जनजागृती मोहीम राबवण्याचा संकल्प गेल्या स्वातंत्र्यदिनी व्यक्त केला होता. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून गोवा सरकारनेही आपल्या सरकारी कार्यालयांतून व कार्यक्रमांमधून सिंगल यूज प्लास्टिक हद्दपार करण्याचे पाऊल उचललेले आहे आणि त्याची कार्यवाहीही उद्यापासून अपेक्षित आहे. प्लास्टिक हे आधुनिक काळामध्ये वापरासाठी अत्यंत सोईस्कर जरी असले तरी ते अतिशय विघातकही ठरू लागले आहे. विशेषतः एकदा वापरून फेकून दिले जाणारे प्लास्टिक नंतर कचर्‍याचा भाग बनते आणि हजारो वर्षे विघटनाविना या पृथ्वीतलावर पडून राहते. या समस्येची भीषणता आता अवघ्या जगाला कळून चुकली आहे आणि म्हणूनच जागतिक पातळीवर किमान सिंगल यूज प्लास्टिकच्या उच्चाटनाचे पाऊल उचलण्यात आलेले आहे. दरवर्षी जगामध्ये ४०० दशलक्ष टन प्लास्टिक कचरा निर्माण होत असतो. पॅकेजिंग उद्योगाचे त्यातील योगदान मोठे असते. विविध उत्पादनांच्या पॅकेजिंगसाठी प्लास्टिकचे आवरण अत्यंत सोईस्कर जरी असले, तरी ते उत्पादन हाती येताच वेष्टन फेकून देणे ही सर्वांची मानसिकता बनलेली आहे. त्यामुळे शेवटी ते कचर्‍याचा भाग बनते आणि योग्य विल्हेवाट लावली गेली नाही तर अंतिमतः जमिनीखाली गाडले जाऊन हजारो वर्षे तेथे त्याच स्थितीत राहू शकते. प्लास्टिकला पर्याय म्हणून अनेक गोष्टी वेळोवेळी पुढे करण्यात आल्या, परंतु त्याही पर्यावरणास तितक्याच घातक असल्याचे दिसून आलेले आहे. त्यांचेही विघटन सहजपणे होत नसल्याने प्लास्टिकप्रमाणेच त्याही पर्यावरणास हानीकारक ठरत आहेत. त्यामुळे जोवर सिंगल यूज प्लास्टिकला सुयोग्य असा खरोखरच पर्यावरणपूरक पर्याय समोर येत नाही, तोवर त्यांचा वापर कमी करणे आव्हानात्मकच राहणार आहे. गोव्यासारख्या पर्यटनप्रधान राज्यामध्ये प्लास्टिक कचरा ही किती गंभीर समस्या बनलेली आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. प्लास्टिकविरुद्ध मोठमोठ्या घोषणा आजवरच्या सरकारांनी केल्या, परंतु प्रत्यक्षामध्ये त्याची कार्यवाही प्रभावीरीत्या होऊ शकली नाही. परिणामी रस्तोरस्ती, रस्त्यांच्या कडेने आजही प्लास्टिकचे किळसवाणे प्रचंड ढिगारे विद्रुप स्थितीत दृष्टीस पडतात. ते हटवणे हाच एक मोठा व्याप होऊन बसलेला आहे. मध्यंतरी राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेने करंजाळेच्या समुद्रकिनार्‍यावर साफसफाई मोहीम राबवली तेव्हा अवघ्या अडीच तासांत त्यांना तेथे एक हजार किलो प्लास्टिक कचरा आढळून आला. गोव्यातील समुद्रकिनारे, तेथे भेट देणारे लक्षावधी पर्यटक हे सगळे पाहिले, तर किती कचरा किनार्‍यांवरील वाळूत गाडला गेलेला असेल याची कल्पनाही करवत नाही. समुद्रात फेकलेल्या वस्तू देखील शेवटी समुद्र लाटांसोबत मानवाला साभार परत करत असतो. त्यामुळे त्यांची विल्हेवाट ही खरोखर आपली जबाबदारी आहे. प्लास्टिकचा वापर साधारणतः जगामध्ये १९५० पासून सुरू झाला. आपल्याकडे तर गेल्या काही वर्षांमध्येच त्यांचा वापर वाढला आहे. पूर्वी आपल्या आधीची पिढी बाजाराला जाताना सोबत कापडी पिशवी घेऊनच जायची. मात्र, प्लास्टिकचा सुळसुळाट वाढला तसे रिकाम्या हातांनी बाजारात जाणे सोईस्कर वाटू लागले. देशभरामध्येही हेच घडत होते. कमीत कमी मायक्रॉनच्या पिशव्यांतून अशी खरेदी होऊ लागताच शेवटी त्यावर काही निर्बंध घालावे लागले, परंतु त्यांची कार्यवाही आजही प्रभावीपणे झालेली दिसून येत नाही. प्लास्टिकरूपी भस्मासुराचा सामना यशस्वीपणे करायचा असेल तर त्याच्यासंबंधी अनेकपदरी उपाययोजना कराव्या लागतील. प्लास्टिक उद्योगामध्ये लाखो लोकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यामुळे या बंदीविरुद्ध ते न्यायालयीन लढाई लढत आहेत. त्यामुळे अशा उद्योगांना बंद पाडणे सरकारच्या हाती राहिलेले नाही. किमान या प्लास्टिकचा वापर कमीत कमी करावा यासाठी जनजागृती हाच सर्वांत सोपा उपाय राहिला आहे. मागणी घटेल तेव्हा आपोआप या गोष्टींचे उत्पादन बंद पडेल. आरोग्याच्या दृष्टीने विचार करताही प्लास्टिकचा वापर घातक असल्याचे दिसून आलेले आहे. त्यामध्ये वापरली जाणारी रसायने खाद्यपदार्थांसाठी तर निश्‍चितपणे घातक आहेत. आजकाल प्लास्टिक वापराविरुद्धच्या जागृतीमुळे मोठमोठ्या दुकानांतून प्लास्टिक पिशव्या देणे एकतर बंद झाले आहे वा त्यांना शुल्क आकारले जाते आहे, परंतु आम बाजारपेठांमधूनही प्लास्टिक पिशव्यांचे उच्चाटन व्हावे लागेल. खरेदीला जाताना सोबत कापडी पिशवी घेऊन जाणे हा सर्वांत सोपा पर्याय आपल्या हाती आहे. व्यापक जनजागृतीशिवाय प्लास्टिकच्या भस्मासुराचा नायनाट करता येणार नाही. त्यामुळे उद्याच्या गांधी जयंतीपासून शैक्षणिक संस्था, प्रसारमाध्यमे, सामाजिक संस्था यांच्या मदतीने सरकारने व्यापक जागृती मोहीम हाती घ्यावी. त्याचे सुपरिणाम हळूहळू निश्‍चित दिसू लागतील!

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

गो गोवा ऑर्गेनिक

श्रीरंग व्यंकटेश जांभळे सध्या चालू असलेला शेतीतील रसायनांचा वापर जमीन, पर्यावरण, प्राणी, मनुष्य यांच्या आरोग्याला घातक असून याचे...

‘कोरोना’च्या आशीर्वादाचे- असेही अभ्यंग… अवती-भवती

अंजली आमोणकर या लॉकडाऊनपायी मिळालेल्या जबरदस्तीच्या कैदेत सर्वांना ‘मनाच्या अभ्यंगाचा’ आशीर्वाद मिळून गेला. एकमेकांचा यथेच्छ सहवास मिळाल्यामुळे, मनातल्या...

सेवानिवृत्तीनंतरची आर्थिक तजवीज

शशांक मो. गुळगुळे तुम्ही पेन्शनधारक असाल तर महिन्याला निश्‍चित ठरावीक उत्पन्न मिळू शकते. पेन्शन वृद्धांना स्वावलंबी बनवते. म्हणून...

दुभंगलेला अमेरिकन समाज

दत्ता भि. नाईक आतापर्यंत अमेरिकेतील द्विपक्षीय लोकशाही खेळीमेळीने चालते असा लौकिक होता. दोन्ही पक्षांमध्ये देशाच्या ध्येयधोरणांविषयी मतभिन्नता नसल्यामुळे...

कोरोनानंतरचे अर्थकारण

महेश देशपांडे, (गुंतवणूक सल्लागार) कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बरेच काही बदलणार आहे. गुंतवणूक म्हणून मालमत्तेपेक्षाही शेअर्स तसंच...

ALSO IN THIS SECTION

ट्रॅक्टर मोर्चाचा दुराग्रह

गेले दोन महिने सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता दुराग्रहाच्या पातळीवर जाऊन पोहोचले आहे. केंद्र सरकारने तिन्ही नवे कृषिकायदे रद्दबातल करावेत या एकमेव...

मागे हटू नये

केंद्र सरकारने नवा मोटरवाहन कायदा लागू करून एव्हाना दीड वर्ष झाले, परंतु या ना त्या कारणावरून राज्य सरकारने अजूनही त्याची अंमलबजावणी करण्यात...

पवार उवाच..

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आधारवड श्रीमान शरद पवार नुकतेच गोव्याच्या दौर्‍यावर येऊन गेले. वास्तविक हा दौरा काही पक्षकार्यासाठी नव्हता. संसदेच्या संरक्षणविषयक समितीच्या बैठकीसाठी पवार...

सत्तांतर

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अधिकृतपणे ज्यो बायडन यांच्या हाती आली आहेत. आपल्या निरोपाच्या भाषणात मंगळवारी ट्रम्प यांनी बायडन यांच्या...

ध्यासपंथी

देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती…वाळवंटातुनी सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती --बा. भ. बोरकर जीवनभर एखादा ध्यास घेऊन वावरणार्‍या व्यक्ती...