‘प्रॉस्पेक्टस्‌‍’ची किंमत 100 रुपयांपेक्षा जास्त नको

0
8

1 हजार रुपये आकारले जात असल्याच्या तक्रारींनंतर शिक्षण खात्याकडून आदेश जारी

शिक्षण खात्याने काल काढलेल्या एका परिपत्रकाद्वारे राज्यातील उच्च माध्यमिक विद्यालयांना त्यांच्या ‘प्रॉस्पेक्टस्‌‍’ची किंमत (माहिती पुस्तिका) 100 रुपयांपेक्षा जास्त न ठेवण्याचा आदेश दिला आहे. प्रॉस्पेक्टस्‌‍ तसेच विद्यार्थ्यांचा प्रवेश अर्ज हा जर एकत्रित देण्यात येत असेल, तर त्याची किंमत ही 100 रुपये अथवा त्यासाठी आलेला छापील खर्च (जो कोणता कमी असेल) जो असेल तो लागू करावा, असे कळवले आहे. त्यावर अन्य कोणताही छुपा खर्च लागू केला जाऊ नये, तसेच याबाबत पूर्ण पारदर्शकता बाळगावी, असे उच्च माध्यमिक विद्यालयांना सूचित केले आहे.
राज्यातील काही उच्च माध्यमिक विद्यालये प्रॉस्पेक्टस्‌‍साठी तब्बल 1 हजार रुपये आकारत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून आल्यानंतर शिक्षण खात्याने वरील सूचना केली आहे.

दहावीचा निकाल रविवारी जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर काल सोमवारी अकरावी इयत्तेत प्रवेश घेण्यासाठी उच्च माध्यमिक विद्यालयांत गेलेल्या विद्यार्थ्यांना प्रॉस्पेक्टस्‌‍साठी तब्बल 1 हजार रुपये मोजावे लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तीव्र संताप व्यक्त होता.
अभाविपचे यश कंटक, गौरव देसाई, कल्पेश वाळके व राजस सावंत यांनी काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत व शिक्षक संचालक शैलेश झिंगडे यांना याबाबत निवेदन सादर केले आणि या प्रॉस्पेक्टस्‌‍ची किंमत 100 रुपयांपेक्षा जास्त नसावी, अशी मागणी केली होती. तसेच प्रॉस्पेक्टस्‌‍ पीडीएफ स्वरूपात ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचीही मागणी केली होती. प्रॉस्पेक्टस्‌्‌‍साठी अवाजवी शुल्क आकारणाऱ्या उच्च माध्यमिक विद्यालयांवर शिक्षणमंत्र्यांनी आणि शिक्षण खात्याने कडक कारवाई करावी, अशी मागणी देखील केली आहे.

मुख्यमंत्र्यांचे शिक्षकांना आवाहन
उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी त्यांना योग्य तो अभ्यासक्रम निवडण्यासाठी मार्गदर्शन करावे, अशी सूचना काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. शिक्षकांनी या मुलांना मार्गदर्शन केल्यास त्यांना आपली करिअरची दिशा ठरवण्यास चांगली मदत होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. आपल्या विद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, यासाठी त्यांना चुकीचे मार्गदर्शन करू नये, अशी सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. काल साखळी रवींद्र भवन येथे विद्यार्थ्यांसाठी आयोजित शिबिरात बोलताना त्यांनी वरील सूचना केली.