प्रेम, भक्ती व श्रद्धा ठेवा!

0
13

योगसाधना- 668, अंतरंगयोग- 254

  • डॉ. सीताकांत घाणेकर

जीवनातील काही कठीण प्रसंगी भगवंत आपल्यावर कृपा करतो. त्याला परिस्थितीचा सामना करण्याचे सामर्थ्य देतो. भक्ताला गरज आहे ती भगवंताची कृपा ओळखण्याची व त्याप्रमाणे कृतज्ञता व्यक्त करण्याची. म्हणून प्रत्येकाने सुशिक्षित व सुसंस्कृत होणे आवश्यक आहे.

मानवसमाज सुशिक्षित व्हावा, सुसंस्कृत व्हावा अशी सगळ्यांचीच इच्छा असते. शिक्षण वेगवेगळ्या विषयांचे शाळा-कॉलेजमधून प्रत्येकाला मिळतच असते. अधिकतर हे शिक्षण भौतिकतेवर आधारित असते. तसे यात वावगे काही नाही. विश्वात जगण्यासाठी, प्रत्येकाच्या अनेक गरजा पुरवण्यासाठी हे शिक्षण अत्यंत आवश्यक आहे. आज प्रत्येकजण जास्तीत जास्त शिक्षण घेण्यासाठी झटत असतो. पण सुशिक्षित व्यक्ती सुसंस्कृत असेलच याची खात्री मात्र देता येत नाही.
प्रत्येक युगातील नकारात्मक घटना बघितल्या तर ही गोष्ट लगेच लक्षात येईल. याची अनेक उदाहरणे विश्वाच्या इतिहासाकडे सहज नजर फिरवली तर लक्षात येतात. उदा. रावण हा लंकेचा राजा होता. तो वेदशास्त्रात पारंगत होता. शास्त्रकार सांगतात की, वेदांना ऋचा लावणारा रावण विद्वान होता. तसाच तो शिवभक्तही होता. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी त्याने अनेक वर्षे घोर तपस्या केली होती. तो ब्राह्मणाचा पुत्र जरी असला तरी त्याच्यावर त्याची आई- केकसी- हिचे आसुरी संस्कार जास्त प्रबळ होते. त्यामुळे तो स्वार्थी व अहंकारी बनला होता. आपल्या शक्तीचा वापर करून तो सज्जनांना त्रास करीत असे. त्याच्या राज्यातील राक्षससेना ऋषींचे आश्रम उद्ध्वस्त करीत असे, यज्ञात व्यत्यय आणीत असे.

सारांश काय तर रावण सुशिक्षित जरी असला तरी तो सुसंस्कृत नव्हता. त्यामुळे त्याचे वर्तन नैतिकतेपासून दूर होते. स्वतः विष्णूला रामावतार घेऊन त्याचा नाश करावा लागला. आमच्यावेळी समाजप्रबोधनासाठी ज्या वेगवेगळ्या पद्धती होत्या, त्यांत कथाकथन, कीर्तन, भजन यांचा समावेश होता. या प्रत्येकात एक बोध असायचा. या कथा लहान मुलांना अत्यंत प्रिय असायच्या. जास्तकरून ध्रुवबाळ, भक्त प्रल्हाद, बाळकृष्ण… अशा अनेक.
इसापनीतीतील गोष्टी तर ऐकताना मजा यायची. आनंद व्हायचा. शेवटी कथेपासून वेगवेगळा बोध मिळत असे. ध्रुव व प्रल्हाद हे दोन्ही बालक विष्णुभक्त होते. भगवंतावर त्यांचे प्रेम, भक्ती व अढळ श्रद्धा होती. बालपणात ते आमचे आदर्श होते.

अनेक वर्षांपूर्वी वाचलेली एक गोष्ट आठवते ती अशी-
एक साधू होता. त्याला काही महत्त्वाच्या कामासाठी दुसऱ्या गावी जायचे होते. रस्ता घनदाट जंगलातून जायचा, त्यामुळे तो अगदी सकाळीच निघाला होता. त्या जंगलात हिंस्र पशू आहेत, चोर-लुटारू आहेत, हे त्याला माहीत होते. पण कामासाठी जाणे अत्यंत आवश्यक होते. तो साधू भगवद्भक्त होता. त्याला खात्री होती की भगवंत आपले संकटापासून निश्चितच रक्षण करेल. तो सकाळी घरून निघाला होता पण दुपार झाली तरी दुसऱ्या गावी पोचेना. दोन्ही हात जोडून त्याने हृदयापासून देवाची प्रार्थना केली. त्याच्या मनात आले की त्याच्याबरोबर प्रवास करण्यासाठी कुणीतरी त्याला भेटावे म्हणजे प्रवास सुसह्य होईल. तसेच रस्ता भटकण्याची शक्यतादेखील कमी होईल. तेवढ्यात बाजूच्या रस्त्याने येणारा एक लहान मुलगा त्याला दिसला. त्याला आनंद झाला. त्याच्याकडून कळले की तोदेखील त्याच गावाला जात आहे. तो अगदी आरामात चालला होता. लहान असला तरी त्याला भीती, चिंता मुळीच वाटत नव्हती.
गप्पागोष्टी सुरू झाल्या. एकमेकांच्या ओळखी झाल्या. थोड्या वेळाने साधूने मुलाला विचारले, “बाळा, तू एकटाच निघाला आहेस, तुला भीती नाही वाटत?”
मुलगा म्हणाला, “बिलकूल नाही. माझे सहा गुरू आहेत. माझी त्यांच्यावर श्रद्धा आहे, विश्वास आहे. त्यांच्याकडून मला विविध शक्ती मिळतात. त्या शक्तींच्या जोरावर मी माझे जीवन जगतो.”
साधूने विचारले, “हे तुझे सहा गुरू कोण?”
तो म्हणाला, “माझा पहिला गुरू श्रीहनुमान. त्याच्याकडून मी सामर्थ्य शिकलो. त्यामुळे अगदी कठीण परिस्थितीतदेखील मी शांत राहतो. अगदी भक्तिभावाने त्याचे नामस्मरण करतो. त्यामुळे मला विजय प्राप्त होतो. माझा दुसरा गुरू आहे भगवान श्रीविष्णू. त्याच्याकडून मला सौभाग्य प्राप्त होते. त्याचे स्मरण केले की मला यश मिळते. माझा तिसरा गुरू आहे देवी दुर्गा. ती तर शक्तीचीच देवता आहे. तिच्याकडून मी निर्भयता शिकलो. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढतो. माझा चौथा गुरू आहे श्रीराम. त्याच्याकडून मी विनम्रता शिकलो. तसेच जीवनातील विविध कठीण परिस्थितीत जेव्हा माझ्या जीवनात अंधकार येतो तेव्हा मी संयम ठेवतो व माझे कर्तव्य करतो. माझा पाचवा गुरू आहे श्रीकृष्ण. त्याच्याकडून मला उत्साहाची ऊर्जा मिळते. माझ्या प्रत्येक कामात मला आनंदप्राप्ती होते. श्रीकृष्णाचे स्मित मला आठवते. कुरुक्षेत्राच्या युद्धातदेखील त्याचे ते देखणे स्मित कायम होते. मीसुद्धा श्रीकृष्णाचे अनुकरण करतो. प्रत्येक परिस्थितीत हे संस्कार मला फार उपयोगी पडतात.”

बोलता बोलता किती वेळ गेला कळलेच नाही. साधूला त्या मुलाचे कौतुक वाटले. त्याने विचारले, “तुझा सहावा गुरू कोण?” मुलगा म्हणाला, “माझा सहावा गुरू देवांचा देव श्रीमहादेव. त्याच्यामुळे माझ्या बुद्धीत विवेक येतो. माझी बुद्धी सद्सद्विवेकबुद्धी होते. तसेच मी त्याच्याकडून वैराग्य शिकलो.”
चालता चालता काळोख झाला. मुलगा म्हणाला, “बाबा, आम्ही माझ्या झोपडीकडे पोचलो.” दूर एक झोपडी दिसत होती व त्यातून मंद प्रकाश दिसत होता. मुलाने सांगितले, “साधूबुवा, तुम्ही आत चला… मी येतोच मागून…”
आत गेल्यावर साधूला तिथे एक वृद्ध व्यक्ती दिसली. साधू सकाळपासून चालत असल्यामुळे अगदी थकला होता. त्यामुळे त्याला गाढ झोप लागली. आंघोळ करून, भगवंताचे नामस्मरण करून साधू लगेच झोपी गेला. थकल्यामुळे त्याला शांत झोप लागली.
सकाळी उठल्यावर वृद्ध बाबांकडे त्या मुलाची त्याने चौकशी केली. त्यांचा आदल्या दिवशीचा अनुभव सांगितला. वृद्ध बाबांना आश्चर्य वाटले. ते म्हणाले, “मी पंचवीस वर्षे माझ्या झोपडीत राहतो, पण आपण सांगता तसा लहान मुलगा मी केव्हाही पाहिला नाही.”
साधूच्या लक्षात आले की स्वतः भगवंतच आपल्याला सोबत करण्यासाठी आले होते. कारण त्याने हृदयापासून भगवंताची प्रार्थना करून रस्ता दाखवण्याची विनंती केली होती.

कथेची सत्यसत्यता न बघता आपण बोध घ्यावा. तत्त्ववेत्ते म्हणतात, या सर्व विविध रूपांत आपल्याच आत्मशक्ती आहेत. आज भौतिक शिक्षणामुळे आपण त्या शक्तीना विसरलो आहोत. गोष्टीत प्रतीक रूपात भगवंताची वेगवेगळी रूपं, गुण व शक्ती दाखवल्या आहेत. कथेच्या रूपाने त्या शक्तींची जाणीव आम्हाला होते. तसेच देवावर विश्वास व दृढ श्रद्धा असली तर प्रत्येक भक्ताला या सर्व शक्तींचा अनुभव येईल.
आपल्या जीवनातदेखील काही कठीण प्रसंगात भगवंत कृपा करतो. त्याला परिस्थितीचा सामना करण्याचे सामर्थ्य देतो. भक्ताला गरज आहे ती भगवंताची कृपा ओळखण्याची व त्याप्रमाणे कृतज्ञता व्यक्त करण्याची. म्हणून प्रत्येकाने सुशिक्षित व सुसंस्कृत होणे आवश्यक आहे.
आजच्या कलियुगात संपूर्ण जीवनविकासासाठी अशा बोधदायक कथांची प्रत्येक व्यक्तीला अत्यंत गरज आहे. आधी या विविध शक्ती समजून घेऊन त्या जीवनात धारण करणे आवश्यक आहे.

फक्त कर्मकांडात्मक भक्ती उपयोगाची नाही. त्याबरोबर कथांचा शाब्दिक अर्थ बघता बघता सूक्ष्म गर्भितार्थ व आध्यात्मिक अर्थ बघणे आवश्यक आहे. आतापासूनच योगसाधक तसे करतील याची मला खात्री आहे. भगवंत आपल्यासोबत आहेच.