शिक्षकदिनी घोषणांची खैरात
शिक्षण खात्याचा ताबा घेतल्यापासून शिक्षकांच्या जवळजवळ सर्व मागण्या पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केल्याचे सांगून माध्यमिक शिक्षकांप्रमाणेच प्राथमिक शाळांतील शिक्षकांनाही लॅपटॉप खरेदी करण्यासाठी व्याजमुक्त कर्ज देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देऊन या शिक्षकांना गृह कर्ज वितरीत करण्यची योजना राबविण्याची घोषणा शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेर्रात यांनी काल शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात केली.
यापुढे विद्यापीठ तसेच महाविद्यालयीन शिक्षकांच्याही योगदानाची दखल घेऊन राज्य पुरस्कार प्रदान करणार असल्याचे मोन्सेर्रात यांनी सांगितले. राज्यातील शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार भाग ‘ब’ श्रेणी लागू करण्याचे सरकारने ठरविले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुढील पिढीचे भवितव्य शिक्षकांवर अवलंबून असते, त्यामुळे शिक्षकांच्या मागण्यावर आपण नेहमीच सहानुभूतीपूर्वक विचार केला. असे सांगून शिक्षणमंत्री म्हणून आपले हे शेवटचे वर्ष आहे. पुढील वर्षी नवा शिक्षणमंत्री असेल असेही त्यांनी सांगितले. आरोग्य व शिक्षण ही दोन्ही महत्वाची क्षेत्रे असून या क्षेत्रांचा सामान्य माणसाशी संबंध येतो. समाजातील दुर्बल घटकांलाही त्याचे महत्व कळले आहे. आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण दिले पाहिजे याबाबतीत शिक्षण नसलेले पालक गंभीर असतात. असं सांगून शिकलेल्या पालकांनी याबाबतीत अधिक गंभीर असणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले. गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेत गोव्यात प्रथम आलेली मुलगी एका मडगांव पालिका मंडळाच्या सफाई कर्मचार्याची मुलगी होती. त्यामुळे शिक्षणाचे महत्व गरीबांना पटल्याचे सिध्द झाले आहे. यापुढे शिक्षण गुणवत्तेनुसारच असेल. परीक्षेत उत्तीर्ण करण्यासाठी वशिला घेवून जाण्याचे दिवस आता राहिले नाहीत, असे ते म्हणाले. शिक्षकांच्या मागण्यापूर्ण करण्यासाठी शिक्षकांनी जेवढे प्रयत्न केलेले नाहीत ते प्रयत्न शिक्षणमंत्री मोन्सेर्रात यांनी केल्याचे कामत यांनी सांगितले. या कार्यक्रमात आलबा फर्नांडिस, रेवा देसाई, गोविंद हवालदार, सिध्दा पुजारी, शेख हनिफ व मंगला देसाई यांना मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते राज्य शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षण संचालक डॉ. सेल्सा पिंटो यांनी स्वागत केले, तर उपसंचालक संतोष आमोणकर यांनी आभार मानले.