वन्यजीव मंडळाच्या बैठकीत निर्णय; मुख्यमंत्र्यांची माहिती
मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षामध्ये जीवितहानी झाल्यास पीडित कुटुंबाला 15 लाख रुपये भरपाई देण्याचा निर्णय गोवा राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली गोवा राज्य वन्यजीव मंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला वनमंत्री विश्वजीत राणे, गोवा वनविकास महामंडळाच्या अध्यक्ष तथा आमदार डॉ. दिव्या राणे, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू आणि वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये राज्यातील मानव-वन्यजीव संघर्ष प्रकरणांमध्ये भरपाई रक्कम वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. मानव-वन्यजीव संघर्षामध्ये जीवित हानी झाल्यास पीडित कुटुंबाला 15 लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली जाणार आहे. अशा प्रकरणातील पीडित कुटुंबांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी भरपाईची रक्कम वाढविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सुधारित भरपाईमध्ये कायमस्वरूपी अपंगत्वासाठी 7.5 लाख, गंभीर दुखापत किंवा आंशिक अपंगत्वासाठी 2 लाख आणि किरकोळ दुखापतीसाठी 50 हजार रुपये अशी भरपाई दिली जाणार आहे.
राज्य सरकार विकासात्मक गरजा संतुलित करत आणि नागरिकांच्या कल्याणाचे रक्षण करताना वन्यजीवांचे संवर्धन करण्यास वचनबद्ध आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
किती नुकसानभरपाई?
प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास : 15 लाख रुपये
कायमस्वरूपी अपंगत्वासाठी : 7.5 लाख रुपये
गंभीर दुखापत किंवा आंशिक अपंगत्वासाठी : 2 लाख रुपये
किरकोळ दुखापतीसाठी : 50 हजार रुपये

