31 C
Panjim
Friday, February 26, 2021

प्राणी-जंगल-माणूस

  •  पौर्णिमा केरकर

माणसा तू कधी विचारच करीत नाहीस का? तुझा जन्म कशासाठी आहे… लाचारीने जगण्यासाठी? धनदौलत जमविण्यासाठी, स्वतःला आणि जगाला फसविण्यासाठी? कायमस्वरूपी द्वेष, मत्सराने कुढण्यासाठीच…? जगण्यातला आनंद कधी शोधशील?

केरळमध्ये गर्भवती हत्तिणीची क्रूरतेने हत्या करण्यात आली. अननसामध्ये स्फोटके भरून ती तिला खायला देऊन त्याद्वारे तिच्या तोंडात विस्फोट घडवून आणला. हे कृत्य कोणी केलेले आहे ती स्वतःला माणसे समजतात, ही मोठीच विसंगती वाटते. प्रसारमाध्यमांद्वारे ही बातमी समाजाच्या सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचली आणि एकच हलकल्लोळ माजला. सोशल मीडियाद्वारे बर्‍याच जणांनी स्वतःच्या भावना व्यक्त करून वृक्षवेली, पशुपक्षी, एकूणच पर्यावरण, निसर्गाशी आपली बांधिलकी जपली. देशभरातील लोकांनी केलेल्या या शाब्दिक हल्ल्यातून लोक निसर्गाप्रती संवेदनशील आहेत याची जाणीव झाली.

हत्तिणीची हत्या घडवून आणणार्‍यावर, सरकारवर दबाव आला. मग सुरू झाल्या पळवाटा. केरळमध्ये अननसाची होणारी मोठ्या प्रमाणातील लागवड. जंगली जनावरांपासून ही शेती सुरक्षित राहावी म्हणून अशा तर्‍हेने म्हणे अननसाचा वापर केला जातो. म्हणूनच हेतू हत्तिणीची हत्या करण्याचा नव्हता, तर मेहनतीने घेतलेल्या पिकाची नासाडी होऊ न देणे हा होता. वस्तुस्थिती काही वेगळेच सांगते. हत्तीण भुकेलेली होती. ती गर्भावस्थेत असल्याने तर तिला भूक सहन होऊ शकली नाही. ती दिनवाणी होऊन दारोदार भटकत राहिली. तेव्हा तिच्या तोंडात स्फोटके असलेला नारळ कोंबण्यात आला. तिच्या तोंडात स्फोट झाला तरीही ती शांत राहिली. सगळी वेदना तिनं तोंडातील जाळासकट पिऊन टाकली. स्वतःला शांत करण्यासाठी तिला नदी जवळची वाटली. अननस जनावरे येऊन खातात, पिकाची नासाडी होते म्हणून मग जनावरांपासून पिकाचे रक्षण करण्यासाठी आम्ही असे स्फोटकांनी भरलेले अननस ठिकठिकाणी पिकामध्ये पेरून ठेवतो, जेणेकरून जनावरांनी तोंड जवळ नेले की स्फोट होतो, ती घाबरून पळतात. आमचा हेतू शुद्ध आहे. ही हत्तीण अशीच फसली. आम्ही जाणूनबुजून काहीच केले नाही. हत्तिणीच्या हत्येच्या पातकातून निर्दोष मुक्त होण्यासाठीचा हा आटापिटा आहे, हे कोणीही सहजपणे ओळखू शकेल. आणि अशी माणसे, ज्यांचे हात वरपर्यंत पोहोचलेले असतात ती तर अगदी मोकाट सुटतात… पुन्हा पुन्हा नवनवे गुन्हे करण्यासाठी!

या घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले आणि एक वेगळे वळण या वादाने घेतले. विचारांची अपरिपक्वता, संकुचित मनोवृत्ती, कुपमंडुकता अनुभवताना हृदयात तीव्र कळ उमटत होती. हत्तिणीला तर मानवी क्रूरतेमुळे जीव गमवावा लागला. त्यावरूनही वाद सुरू झाले. जनावरे आणि माणूस यांच्यातील संघर्ष तर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यात क्रौर्याला बळी पडत आहेत ती मूक जनावरे. हत्तीला आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. सकल कलांची, बुद्धीची देवता श्रीगणेश हे तर गजमुखी दैवत.

अचाट शक्ती आणि अफाट बुद्धी हे तर या विशालकाय प्राण्याचे वेगळेपण. समुहाने कुटुंबकबिल्यात वावरणार्‍या या प्राण्याला माणसाने स्वतःला पाहिजे तसे राबवून घेतले आहे. अजूनही घेत आहे. इंद्राच्या ऐरावताचे डोळे दिपविणारे सौंदर्य मिरवणारा हा हत्ती म्हैसूरचा दसरोत्सव दिमाखदार व्हावा म्हणून झोकून देत, असीम वेदना सहन करीत मिरवणुकीत सामील होतो. तप्त डांबरी रस्त्यावरून, लोकांच्या प्रचंड कोलाहलात मुकाटपणे चालणारा हा अगडबंब प्राणी भाविकांसाठी मोठी पर्वणी असते. भाविकही त्याच्यासमोर नतमस्तक होतात. रंगांची उधळण होते. सजवून धजवून मोठी मिरवणूक निघते.

हत्तीना या उत्सवात सहभागी केलेले असल्यानेच हा उत्सव आगळावेगळा ठरतो.काही वर्षांपूर्वी सर्कशीत हत्तीचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायचा. आबालवृद्ध या प्राण्याला बघण्यासाठीच खास सर्कशीला जायचे. खेळ संपल्यावर त्याच्या सोंडेला स्पर्श करून त्याला मायेने थोपटून हलकेच एखादे केळे त्याच्या सोंडेत दिले जायचे. हा हत्तीच अनेकांच्या उपजीविकेचे साधन बनलेला आहे. गरीब दुबळा जीव हत्तीवर सवार होत गावोगावी फिरत अन्न, पैसे मागायचा. कित्येक चित्रपटांत त्याच्याकडून कामे करून घेतलेली आहेत. माणसाचा मित्र, सुहृद बनूनच हा महाकाय प्राणी आजपर्यंत त्याच्याबरोबर वावरत आलेला आहे. ताकद, बुद्धी असूनही शालीन, संयमाने तो वागला. अजूनही तो वागत आहे. परंतु माणूस आज त्याच्या मागे हात धुवून लागला आहे.
कर्नाटकातील दांडेलीत कागदाचा कारखाना आल्यावर हत्तीचे खाद्य असलेल्या बांबूवर संक्रात आली. बांबू नाहीत तर खायचे काय? हा हत्तींना छळणारा प्रश्न होता. पोटात आग पडली. त्यांनी आपली सीमा ओलांडून खाद्याच्या शोधात भ्रमंती केली. प्रसंगी आक्रमक झाले. त्यावेळी माणसांनीच त्यांना मारण्यासाठी, जेरबंद करण्यासाठी आरडाओरडा सुरू केला. जनावरांचे खाद्य, त्यांचा निवास असलेले डोंगर उघडेबोडके करून त्यावर स्वतःसाठी बक्कळ पैसा मिळवून देणार्‍या झाडांची, फळांची लागवड करायची. असे करून जनावरांचे खाद्य नष्ट करायचे आणि ती लोकवस्तीत येतात, शेती उद्ध्वस्त करतात असाच कांगावा. त्यांची हक्काची जागा असलेल्या राखीव जंगलाला निर्दयपणे कापायचे, एवढेच नाही तर जंगलच नष्ट करण्यासाठी त्यांना आग लावायची. त्यात झाडांसकट जनावरे जाळून टाकायची हाच कपटी हेतू! केरळमध्ये हत्तिणीची हत्या स्फोट घडवून केली जाते. गोव्यात वाघांना विष घालून, सापळे रचून तर गव्यांना गोळ्या घालून, विजेचा शॉक लावून ठार मारण्यात येते. हत्यारे फक्त बदलतात… क्रूरता तीच! माणूस हाही एक प्राणीच आहे. तो समाजप्रिय प्राणी. समाजात राहतो, वावरतो, खातो, पितो, जेवतो, प्रतिष्ठा मिरवितो. त्याच्याकडे सारासार विचार करण्याची शक्ती आहे म्हणून तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. जंगलातील प्राण्यांनी उगाच काही कारण नसताना एकमेकांना मारून टाकले, असे कधी ऐकिवात नाहीत. पण स्वतःला बुद्धिजीवी समजणारा माणूस मात्र प्राण्यांच्या अधिवासात अतिक्रमण करून उलट प्राण्यांनाच दोषी ठरवतो. हत्तीसारखा प्राणी त्याला हवाय गणेशाच्या रूपात पुजण्यासाठी. त्याच्या खर्‍या स्वरूपाला मात्र क्रूरतेने मारताना त्याचे हृदय जराही विचलित होत नाही? पूर्वजांनी वाघाला देवच मानले होते. त्यांना माहीत होते, जेथे वाघ तेथे जंगल, जेथे जंगल तेथे पाणी आणि पाणी हेच तर मानवी जीवन! निसर्ग आवडतो बर्‍याच जणांना. घराशेजारी जंगल असले की मग जंगली प्राण्यांची मनसोक्त शिकार करून त्यांच्या मांसावर यथेच्छ ताव मारता येतो. स्वतःची कसली कामे अडून राहिली तर ती पूर्ण करण्यासाठी अधिकारीवर्ग, बड्या धेंड्यांना जंगली प्राण्यांचे फुकटात मांस देऊन त्यांना खूश करून कामे करून घेता येतात. निसर्ग हवाय… जंगल हवंय ते झाडे कापून घरे बांधण्यासाठी..! निसर्ग हवाय सेल्फी काढण्यासाठी. निसर्ग हवाय धबधब्यावर जाऊन दारू ढोशीत नागड्याउघड्या अंगाने अचकट-विचकट हातवारे करून धिंगाणा घालण्यासाठी.. एकूणच काय तर निसर्गाचे लचके तोडण्यासाठीच तर माणसाचा जन्म आहे, याच अरेरावीत कायम जगत राहिलेला माणूस या कोरोना काळातही विचारशील होणे केवळ अशक्यच आहे!

महामारीने अवघ्या जगाला चपराक दिलेली आहे. निसर्गाच्या प्रकोपापुढे मानवी शक्ती कशी कुचकामी ठरते, याची उदाहरणे समोर असतानाही त्याचा दंभ वाढतच आहे. नदीत डुंबताना, ती प्रदूषणविरहित असावी याचे भान नसते. जंगलात मनसोक्त विहार करताना त्यांचे मानवी समाजावरील उपकार सोयिस्कररीत्या विसरले जातात. संरक्षणाचे तर सोडाच, जो निसर्ग भरभरून आपल्याला देतो आहे त्याची साधी कृतज्ञताही बाळगताना दिसत नाही. माणसासारखे निसर्गाला खोटारडेपणाने वागता येत नाही. त्याला फक्त देता येते. मुळावर कुर्‍हाडीचे, यंत्राचे घाव घालणार्‍या हातानाही त्यांनी क्षमाच केली असणार. झाडांना जाळून त्याची राख करताना, प्राण्यांना मारून पुरावे नष्ट करताना मानव विसरतो की शेवटी आपणही एक ना एक दिवस या मातीतच मिसळून जाणार. झाडांचे एक आहे, ती मातीत मिसळतात पुन्हा नव्याने रुजून येण्यासाठी. ती उन्हात उभी असतात त्यावेळी सावली देतात. कसलाही भेदभाव न करता. आणि त्यांना तोडणारे हात मात्र कुजून पडतात… ते खिजगणतीतही नसतात कोणाच्या… माणसा तू कधी विचारच करीत नाहीस का? तुझा जन्म कशासाठी आहे? लाचारीने जगण्यासाठी? धनदौलत जमविण्यासाठी, स्वतःला आणि जगाला फसविण्यासाठी? कायमस्वरूपी द्वेष, मत्सराने कुढण्यासाठीच… जगण्यातला आनंद कधी शोधशील? …पण जिवंत राहण्यासाठी ‘श्वास’ हवाय, पाणी हे जीवन आहे! आणि हे निसर्गाचे आपल्यावरील उपकार आहेत. झाडे नकोच असतील, प्राण्यांचे अस्तित्वही सहन होत नाही तर मग श्वास आणि पाणी यांना जीवनातून करा वजा अन् खुशाल जंगल कापून, जाळून, प्राण्यांचे खून करून मारा मजा.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

सर्वथा अनुचित

पालिका प्रभाग आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयापुढे झालेल्या सुनावणीत राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार यांचा मनमानी कारभार उघडा पडला आहे. पालिका आरक्षणासंदर्भात ज्या...

६० वर्षांवरील व्यक्तींना मार्चपासून कोविड लस

>> केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती, ४५ वर्षांवरील व्यक्तींनाही गरजेनुसार लस देणार देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने...

नगरपालिका आरक्षण निवाडा राखीव

>> मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुनावणी पूर्ण गोवा नगरपालिका निवडणुकांसाठी गोवा सरकारने अधिसूचित केलेले प्रभाग आरक्षण व प्रभागांची...

गोमंतकीय दुसर्‍या लाटेचाही सामना करतील ः डॉ. बांदेकर

राज्यातील आरोग्य सेवकांना कोविडची लस देण्यात आलेली असल्याने आता राज्यात कोविडची दुसरी लाट आली तरी गोवा त्या लाटेचा चांगल्या प्रकारे सामना करू...

श्रीपाद नाईक यांना गोमेकॉतून डिस्चार्ज

मागील एक महिना आणि तेरा दिवस गोमेकॉत उपचार घेणारे उत्तर गोव्याचे खासदार व केंद्रीय आयुषमंत्री (स्वतंत्र कार्यभार) व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद...

ALSO IN THIS SECTION

आनंद सुधा बरसे…

रामनाथ न. पै रायकर मराठी संगीत रंगभूमीवरील प्रसिद्ध गोमंतकीय गायक-नट, रामदास कामत यांनी नुकतीच वयाची नव्वदी पार केली...

म्हादईची लढाई सर्वोच्च न्यायालयासमोर

राजेंद्र पां. केरकर कर्नाटकाकडे बेनिहल्ला, बेडधी त्याप्रमाणे काळीगंगा अशा अतिरिक्त पाण्याची उपलब्धता असलेल्या नद्या आहेत आणि त्या तुलनेत गोव्यासमोर म्हादईविना पेयजल आणि...

टूल-किटची कर्मकहाणी

दत्ता भि. नाईक देशातील कोणताही प्रश्‍न असो त्यात मानवतावादाचा बुरखा पांघरलेले व पर्यावरणवादाचा झेंडा खांद्यावर घेतलेले कम्युनिस्ट विचारसरणीचे...

सुखाचा भूपट्टा, अर्थात… कम्फर्ट झोन

अंजली आमोणकर डुप्लीकेट चावीने बाहेरचे दार उघडून सर्वजण आत यायला व अंधारातल्या चोरांनी व्हरांड्यात शिरायला एकच गाठ पडली....

पर्यटनाला नवी जाग!

प्रतिभा कारंजकर पर्यटनाच्या दृष्टीने गोवा हे एक सुरक्षित राज्य मानले जाते. त्यामुळे देशी पर्यटकांचा गोव्याकडे कल जास्त आहे....