– डॉ. प्रमोद पाठक
गेल्या अनेक वर्षांच्या माझ्या सिंधुसंस्कृती संदर्भात केलेल्या अभ्यासात सिंधुसंस्कृतीच्या अवशेषांमध्ये मिळणारी भाजलेल्या मातीची (ढशीीरलेींींर) सच्छिद्र भांडी कशाकरिता उपयोगात असावी हा प्रश्न डोळ्यांसमोर होता.
मी स्वतः सिंधुसंस्कृती अवशेष उत्खनित झाले आहेत त्या गुजरातमधील धोलाविरा कोटडा, सुरकोटडा, लोथल, खिरसरा इ. ठिकाणी जाऊन आलो. धोलाविरा कोटडा, सुरकोटडा या ठिकाणी तर अगदी वरवर सर्वत्र पसरलेल्या खापरांमध्ये सच्छिद्र भांड्यांची खापरे मिळतात. त्याचा अर्थ सिंधुसंस्कृती काळात ती सच्छिद्र भांडी बर्याच मोठ्या प्रमाणात वापरात होती. या भांड्यांना बाजूंनी तसेच तळाशी छिद्रे असतात.
आजवर माझ्या वाचनात आणि चाळण्यात सिंधुसंस्कृती संदर्भातील कितीतरी पुस्तके आणि अक्षरशः हजारो संशोधनपर लेख आले आहेत. त्या सर्व लेखांमधून केवळ इरावथम् महादेवन् यांचे केवळ एक-दोन लेख (र्उीश्रीं जलक्षशलीं ेप णपळलेीप ीशरश्र (१९८५), र्डींीवू ेष खपर्वीी डलीळिीं ींर्हीेीसह इळश्रळपर्सीरश्र झरीरश्रश्रशश्री (१९७२) ज्यात सच्छिद्र पात्रांचा निर्देश आहे.)
सोडता पुरातत्त्व क्षेत्रातील बोटावर मोजता येतील इतक्याच संशोधकांनी ही सच्छिद्र पात्रे कोणत्या कारणासाठी उपयोगात येत असावीत याबाबत ऊहापोह केल्याचे वाचनात आहे. त्यांनी सर्वांनी केवळ आपली मते नोंदविली आहेत. कुणीही प्रत्यक्षात तशी भांडी तयार करून त्यावर प्रयोग करून पाहिलेले नाहीत.
सुप्रसिद्ध सिंधुलिपीतज्ज्ञ इरावथम् महादेवन् यांच्या मते, ही सच्छिद्र पात्रे सोमरस गाळण्याच्या कामी येत असावीत. सिंधुसंस्कृती उत्खननात सापडलेल्या सुमारे २५०० सिंधुमुद्रांपैकी ११०० पेक्षा जास्त मुद्रांवर वृषभाचे चित्र आहे. ती अथर्ववेदातील एकवृष ही देवता असून ती इंद्राचे प्रतीक- राज्यकर्त्यांची मुद्रा असावी. (अथर्ववेद ५.१६ आणि ६.८६) असे प्रतिपादन मी काही वर्षांपूर्वी केले होते. ते डॉ. महादेवन् यांच्या प्रतिपादनाशी सुसंगत होते. कारण सिंधुमुद्रांवरील काही चित्रांमध्ये त्या भांड्याच्या बाहेरच्या बाजूस थेंब जमावेत असेही गोल ठिपके काढलेले आढळतात. मात्र ही पात्रे अर्धवर्तुळाकार (ीशाळ ीहिशीळलरश्र) दाखविली गेली आहेत. मात्र प्रत्यक्षात ही भांडी प्रामुख्याने उंच दंडगोलाकार आकाराची मिळतात. सर्वसाधारणपणे उत्खननात तुटलेल्या भांड्यांचीच खापरे मिळतात. पण लोथल, रंगपूर आणि इतर एकदोन ठिकाणी न तुटलेली सच्छिद्र भांडी मिळाली. त्यांचे आकार खाली फुगीर असलेल्या दंडगोलाचे आहेत.
वैदिककाळात सोमवल्ली कोटून त्यात पाणी मिसळून जो रस तयार होत असे तो गाळण्यासाठी मेंढ्यांच्या केसाचे अस्तर वापरत असत. तसे गाळणे महादेवन् म्हणतात त्याप्रमाणे अर्धवर्तुळाकार-
अर्धवर्तुळकार मातीचे सच्छिद्र भांडे
आकाराच्या भांड्यात शक्य व्हावे. पण वर दाखविलेल्या दंडगोलाकार भांड्यांमध्ये तसे गाळणे शक्यच नव्हते. त्याचप्रमाणे महादेवन् यांनी आपल्या लेखात ही भांडी किती मोठ्या प्रमाणावर सापडतात यासंदर्भात काही विवेचन केलेले नाही. त्यामुळे ही सच्छिद्र भांडी नक्की कशासाठी वापरली जात याविषयी काही अंदाज मला काढता येत नव्हता. पुढे काही वर्षांनी २००९ फेब्रुवारीच्या तिसर्या आठवड्यात कच्छच्या सीमेवर असलेल्या शिकारपूर या गावी चाललेल्या उत्खननात प्रत्यक्ष सहभाग घेण्याची संधी मला बडोदरा विश्वविद्यालयातील पुरातत्त्व विभागाचे प्राध्यापक डॉ. अजितप्रसाद आणि डॉ. कृष्णन् यांच्या सहकार्यामुळे मिळाली.
उत्खननाचे निष्कर्ष
एक दिवस छोटी खुरपणी आणि फावडे घेऊन हळूहळू जमीन उरकीत जाण्याची संधीही त्यांनी मला दिली. पण काही तासांतच मला त्याचा कंटाळा आला आणि हाताला फोड आले. ते काम किती मेहनतीचे आणि चिकाटीचे आहे हे लक्षात येऊन पुरातत्त्व संशोधकांच्या चिकाटीबद्दल माझ्या मनातील आदर वाढला.
उत्खननाच्या परिसरात एका मैदानात चौकोनी गाळे आखून त्या ठिकाणी उत्खनन करताना मिळालेली खापरे साचवून ठेवली होती. त्यांच्याकडे मी माझा मोर्चा वळविला. जवळपास सर्वच चौकोनांतील खापरांच्या ढिगात मला सच्छिद्र खापरे आढळली.
खापरांची वर्गवारी
मी डॉ. कृष्णन् यांच्या अनुमतीने आणि त्यांनी देऊ केलेल्या व्हर्निअर कॅलीपर आणि आकार व व्यास मोजण्याच्या उपकरणाने त्या सच्छिद्र खापरांचा आकार, व्यास, छिद्रांचा व्यास, खापरांची जाडी इ.ची मोजमापे घ्यायला सुरुवात केली.
मी हाताळलेल्या अनेक खापरांपैकी ज्यांचा बाहेरचा व्यास बरोबर मोजता आला त्यांतील काही १८ सें.मी., २४ सें.मी., २९ सें.मी. व्यासाची आढळली. त्यावरील छिद्रांचा व्यास ४-६ मि.मि. मोजता आला. बहुतांश पात्रे दंडगोलाकार असावीत असे त्यांच्या घाटावरून लक्षात आले.
त्यातील काही ढिगांमध्ये सापडलेल्या सच्छिद्र खापरांची संख्या ५-८ टक्के इतकी आढळली. याचा अर्थ अशी सच्छिद्र भांडी घराघरांत वापरण्यात येत होती. ती जर केवळ सोमरस गाळण्यासाठी वापरण्यात येत असती तर इतक्या मोठ्या प्रमाणावर मिळण्याची शक्यता कमी होती. कारण ज्या यज्ञात सोमरस गाळण्यात येत होता ते यज्ञ फार कमी लोक करत. त्यामुळे सच्छिद्र खापरांची संख्या इतकी जास्त असण्याची शक्यता नव्हती.
उत्खननावरून परतल्यावर मोठे माठ, रांजण बनविणार्या कुंभारांना भेटून त्यांना लोथल येथे मिळालेल्या भांड्यांचे चित्र दाखविले आणि त्याप्रमाणे ६-८ मि.मि. जाडीची व सुमारे ७ व १५ इंच उंचीची त्याच आकाराची भांडी मी करवून घेतली. ती करताना कुंभाराला बर्याच अडचणी, विशेषतः छिद्रे करताना, जाडी ठेवताना आल्यात. त्यात छोट्या आकाराची ही भांडी होती. ती ७ इंच उंच व सुमारे ६ इंच फुगीर आकाराची होती. कारण काही खापरे त्याही आकाराची होती. त्या भांड्यांवर सच्छिद्र झाकणे सिंधुसंस्कृती काळात वापरत असत. ती मात्र तयार झाली नाहीत.
सच्छिद्र भांड्यांवर प्रयोग
भांडी घरी आणल्यावर प्रयोग करण्यापूर्वी आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे ती पाण्यात बुडवून ठेवली. त्यातून बराच वेळ बुडबुडे निघत होते. थोड्या वेळाने बुडबुडे निघण्याचे थांबले. (वेळ मोजली नाही, पण १५-२० मि. लागली.) भांड्यांमध्ये पाणी शोषले गेल्याने त्यांचे वजनही वाढले होते. आपण दरवर्षी नवा माठ वापरण्यापूर्वी त्याचा मातीचा वास जावा म्हणून २-४ वेळा पाणी बदलतो. त्याच हेतूने मी ते पाण्यात बुडविले होते व नंतर पाणी निथळण्यासाठी बाहेर ठेवले. थोड्या वेळाने ती भांडी हाताळताना लक्षात आले की त्यांचा पृष्ठभाग चांगलाच थंड झाला आहे. एप्रिल-मे महिन्यात असा थंडावा या भांड्यांमध्ये मिळू शकल्यास त्यांचा शीतक (उेेश्रशी) म्हणून उपयोग करीत असावेत. ही कल्पना येताच मी ५० अंश सेंटिग्रेडपर्यंत तापमान मोजणारे तापमापक घेऊन आलो आणि त्या भांड्यावर प्रयोग सुरू केले. त्यात १५ इंच व ७ इंच उंच अशी दोन्ही भांडी होती.
पुढचे काही दिवस मी त्या सच्छिद्र भांड्यांमध्ये फळभाज्या, पालेभाज्या, फले आणि ताक इ. ठेवून त्याचे तपमान मोजण्याचे प्रयोग केले.
प्रयोग करण्याच्या दिवशी सकाळी सच्छिद्र भांडे १०-१२ मि. पाण्यात बुडवून ठेवत असे. त्यातील बुडबुडे येण्याचे थांबले की पाणी निथळू देऊन त्याच्या आत त्या दिवसाची प्रायोगिक भाजी पाण्याने ओली करून ठेवत असे. ताकाच्या प्रयोगात दोन सारख्या आकाराची भांडी- टिफिनच्या डब्याची- घेतली. त्यात सारख्याच आकारमानाचे ताक टाकून एक भांडे बाहेर व एक भांडे आतमध्ये ठेवले.
या प्रयोगा दरम्यान सच्छिद्र भांड्यांच्या आतील तापमान तसेच बाहेरचे तापमान ठराविक अंतराने मोजत गेलो.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने घरातील तापमानही ३०-३२ पर्यंत वाढत असे. त्याच वेळी सच्छिद्र भांड्यांतील तापमान मात्र २०-२२ डिग्री सेंटिग्रेड पर्यंतच वाढत असे. त्यामुळे भाजी ताजी राहत असे. बाहेर ठेवलेले ताक ८-१० तासांत आंबट झाले तर आत ठेवलेले ताक कमी तापमानावर राहिल्याने कमी आंबट झाले. किंबहुना सकाळपेक्षा चवीत फरक पडला नाही.
दोनदा पालक भाजीच्या जवळपास सारख्या आकाराच्या जुड्यांवर प्रयोग केले. तेव्हा बाहेर ठेवलेली जुडी सायंकाळपर्यंत सुकली तर आत ठेवलेली पालकाची जुडी ताजी वाटत होती.
सिंधुसंस्कृती काळातील शीतके
याचा अर्थ सिंधुसंस्कृती काळात ही भांडी फार मोठ्या प्रमाणावर घरगुती शीतक म्हणून वापरीत असावेत. त्यात पाणी शोषून आत ठेवलेले पदार्थ कमी तापमानावर राहत असल्याने ते जास्त वेळ ताजे राहण्यासाठी त्यांचा उपयोग होत असावा असा निष्कर्ष मी काढला. दूध, ताक इ. लवकर खराब होणार्या वस्तू चांगल्या राहाव्यात यासाठी त्या काळच्या गृहिणी सच्छिद्र भांडी वापरत असतील.
शिकारपूर व कच्छच नव्हे तर गुजरातमध्ये विशेषतः नवरात्राच्या गरब्या दरम्यान अर्धगोलाकार आकाराची सच्छिद्र भांडी दिवा विझू नये यासाठी दिव्यावर झाकून ठेवण्यासाठी वापरतात. मात्र त्यावर आतून काजळी धरते व ज्योतीच्या तापमानामुळे पृष्ठभागही काळपट पडतो. ती इतकी जाडीही नसतात.
मी हाताळलेल्या सच्छिद्र खापरांपैकी एकही खापरावर काजळी अथवा उष्णतेचा डाग दिसला नाही. सर्व खापरे स्वच्छ होती. उच्च तापमानावर चिकटलेली काजळी सहज निघण्याची निघण्याची शक्यता कमीच आहे. वर्षातून केवळ एकदा वापरण्यात येणारी अर्धगोलाकार सच्छिद्र पात्रे इतक्या मोठ्या प्रमाणावर मिळण्याची शक्यताही कमीच आहे.
वरील सर्व प्रयोगांमधून तापमान कसे कमी राहू शकेल आणि त्याचा उभट आकारच का ठेवत याचा उलगडाही करता येतो.
उभट भांडे असल्याने हवेचा प्रवाह खालपासून वर जातो. शोषले गेलेल्या पाण्याची वाफ होते व ती होताना हवेचे तापमान कमी होते. खालून वर जाणार्या थंड हवेच्या प्रवाहाला कोल्ड ड्राफ्ट म्हणता येईल. याशिवाय भाज्या पाणी शिंपडून ठेवल्याने त्यातील पाणीसुद्धा वाफ होताना भाजीचे तापमान थंड राखण्यास मदत होते. उभट आकारामुळे हवेचे उर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात. तळाशीसुद्धा मोठे छिद्र त्याचसाठी दिलेले असते.
डेक्कन कॉलेजमध्ये काम करणारे पुरातत्त्व तज्ज्ञ डॉ. प्रमोद जोगळेकर यांना मी वरील प्रयोगांची माहिती देऊन त्यांच्याबरोबर चर्चा केली. त्यांनी माझ्या म्हणण्याला दुजोरा दिला. त्यांनी अशीही शक्यता वर्तविली की या भांड्यांचा उपयोग सागरी मासे (खारे मासे) दूरवर्ती भागात नेण्यासाठी ही भांडी वापरत असावेत. कारण समुद्रकिनार्यापासून दूर अंतरावर असणार्या सिंधुसंस्कृती अवशेषांत चांगल्या मोठ्या आकाराच्या माशांची हाडे मिळतात. ती इतक्या आत कशी येत असतील त्याचे उत्तरही मिळू शकते. या सच्छिद्र भांड्यांचा उपयोग माशांचे तापमान कमी राखून दूरवर नेण्यासाठी करत असावेत अशी शक्यता डॉ. जोगळेकरांनी बोलून दाखविली.
या संदर्भात अधिक प्रयोग करून पाहण्याची आवश्यकता आहे.

