प्रश्‍नपत्रिकेत असे प्रश्‍न विचारणे गैर : नाडकर्णी

0
190

 

शालांत परीक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचे प्रश्‍न विचारले जावेत याचे काही संकेत आहेत. धार्मिक, वांशिक, जातीय किंवा राजकीय स्वरुपाचे प्रश्‍न विचारले जाऊ नयेत असे दंडक सर्वसाधारणपणे पाळले जातात. त्यामुळे दहावीच्या प्रश्‍नपत्रिकेत ज्या प्रकारे यंदा प्रश्‍न विचारला गेला ते गैर असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व गोवा बोर्डाचे माजी अध्यक्ष पांडुरंग नाडकर्णी यांनी ‘नवप्रभा’ला दिली.
अशा प्रकारचे आक्षेपार्ह प्रश्‍न विचारल्याबद्दल शालांत परीक्षा मंडळ व शिक्षण खाते संबंधित शिक्षकावर व सदर प्रश्‍नपत्रिकेस मान्यता देणार्‍या प्रमुखावर कारवाई करू शकते असे ते म्हणाले. मंडळाने अथवा शिक्षण खात्याने दोषी शिक्षकावर कारवाई करण्याचे आदेश दिले तरी अनेकदा शालेय व्यवस्थापनांकडून त्याचे पालन होत नाही असा अनुभव असल्याचे ते म्हणाले.

एकदा एका परिक्षेत व्यावसायिक विषयाच्या उत्तरपत्रिकेत फेरफार केल्याचे व दुसर्‍या मुलाची उत्तरपत्रिका स्वत:च्या मुलाच्या उत्तरपत्रिकेला जोडल्याचे आढळले होते तेव्हा कारवाईची वेळ आली होती अशी आठवण त्यांनी सांगितली. सदर मुलाने तंत्रशिक्षणासाठी त्या निकालाच्या आधारे घेतलेला प्रवेशही रद्द करणे भाग पडले होते असे नाडकर्णी यांनी सांगितले.

एकदा एका शिक्षिकेने आपल्या मुलाची उत्तरपत्रिका स्वत:च लिहिल्याचे आढळले तेव्हा तिला स्वेच्छानिवृत्ती घ्यायला सांगितले गेले. आपल्या कार्यकाळात एका प्रकरणात पणजीच्या एका शिक्षणसंस्थेने मात्र शिक्षण मंडळाच्या आदेशानुसार सदर शिक्षिकेवर कारवाई करण्याची हिंमत दाखवली होती. अन्यथा सहसा राजकीय व्यक्तींद्वारे शिक्षण खात्यावरही दबाव आणला जाण्याची शक्यता असते असे मत त्यांनी व्यक्त केले.