न्यायालयात जाण्याचा आपने दिला इशारा
गोवा सरकारचा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असलेला प्रशासन स्तंभ तसेच दुसरा महत्त्वाचा प्रकल्प असलेला युनिटी मॉल या चिंबल येथे होऊ घातलेल्या दोन्ही प्रकल्पांविरोधात रविवारी चिंबलवासीयांनी गावातून मोर्चा काढीत या दोन्ही प्रकल्पांना जोरदार विरोध केला. यावेळी मोर्चेकरांनी हे प्रकल्प आम्हाला नकोत, असे नारे दिले. तसेच या प्रकल्पांना स्थानिक लोकांचा तीव्र विरोध असल्याचे स्पष्ट केले.
या मोर्चानंतर घेतलेल्या सभेतून बोलताना ग्रामस्थांनी हे दोन्ही प्रकल्प निसर्ग सौंदर्याने नटलेल्या व जैवविविधतेने सजलेल्या कदंब पठारावर येणार असल्याने निसर्गाचे मोठे नुकसान असून पर्यायाने पर्यावरणाचा ऱ्हास होणार असल्याचे मत स्पष्ट केले. गाकुवेध व चिंबल कला आणि सांस्कृतिक मंचच्यावतीने आयोजित या मोर्चात चिंबल, सांताक्रुझ तसेच आजुबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांनी सहभाग घेतला. सभेच्या वेळी ग्रामस्थांनी वरील प्रकल्पांविरोधात जोरदार नारे दिले. गाकुवेधचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर यांनी यावेळी बोलताना, चिंबल हे सर्वांगसुंदर अशा निसर्गसौंदर्याने नटलेले गाव आहे. तसेच या ठिकाणी नैसर्गिक जलस्रोत आहेत. आता या प्रकल्पांमुळे सगळे काही नष्ट होणार असल्याचे सांगितले. यावेळी रामराव वाघ, ॲड्. प्रतिमा कुतिन्हो यांचीही भाषणे झाली. यावेळी बोलताना आमदार वीरेश बोरकर यांनी, प्रकल्पांच्या नावाखाली सरकार बिल्डरांच्या घशात जमिनी घालत आहे. त्यामुळे गोवा वाचवण्यासाठी सर्व लोकांनी एकत्र यावे, असे आवाहन केले. आम आदमी पक्षाचे नेत अमित पालेकर यांनी यावेळी बोलताना गरज पडल्याास या प्रकल्पांच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याच इशारा दिला.
ग्रामस्थांचा विरोध सुरूच
चिंबल ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत गोविंद शिरोडकर यांनी याच जागी 2018 मध्ये सरकारने आयटी पार्क प्रस्तावित केले होते. त्यावेळीही स्थानिकांनी या प्रकल्पाविरोधात चिंता व्यक्त करत त्या प्रकल्पाला जोरदार विरोध केला होता.

