प्रवेश कराबाबत माघार नाही : मुख्यमंत्री

0
54

शून्य तासाला कॉंग्रेस आमदार मॉविन गुदिन्हो, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स व विजय सरदेसाई यांनी प्रवेश कराच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका केल्यानंतर तिला उत्तर देताना पर्रीकर यांनी वरील स्पष्टीकरण केले.

तत्पूर्वी बोलताना वरील आमदारांनी गोवा सरकारने लागू केलेला प्रवेश कर हा घटनाबाह्य तर आहेच शिवाय अधिसूचनाही न काढता तो लागू करण्यात आल्याचा मुद्दा मांडला होता. या प्रवेश करामुळे राज्यात भाजी व कडधान्य या जीवनावश्यक वस्तूंचे दर कडाडल्याचेही त्यांनी नमूद केले होते. तसेच या करामुळे गोव्याचे शेजारच्या राज्यांबरोबरील संबंध बिघडतील अशी भीती व्यक्त करून हा कर रद्द करण्याची मागणी केली होती.

त्याचबरोबर अधिवेशन चालू असताना हा कर लागू करण्याबाबत सभागृहात चर्चा न करता सरकारने परस्पर कसा निर्णय घेतला असा मुद्दा यावेळी रेजिनाल्ड यांनी मांडला होता.त्यावेळी बोलताना पर्रीकर यानी आपण लागू केलेला प्रवेश कर हा घटनाबाह्य नसल्याचे स्पष्ट केले व अधिसूचना न करताच तो लागू केल्याचा आरोपही फेटाळला. हा कर घटनाबाह्य आहे असे ज्याना वाटते त्यानी न्यायालयात जावे म्हणजे तो घटनाबाह्य आहे की काय हे त्याना कळू शकेल, असे ते म्हणाले. कायदा तज्ज्ञांकडून कायदेशीर सल्ला घेऊनच प्रवेश कर लागू केला असल्याचे ते म्हणाले. सरकारने प्रवेश कर लागू केल्याने राज्यात भाज्या व कडधान्ये यांचे दर प्रचंड वाढल्याचा विरोधकांनी केलेला आरोपही यावेळी पर्रीकर यानी फेटाळून लावला. राज्यात भाज्या व कडधान्ये यांचा मुबलक साठा असल्याचे सांगून वेळ आलीच तर गुजरात, मुंबईहून भाजी व कडधान्ये आणू असे पर्रीकर म्हणाले. कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यांच्या वाहतूक सचिवांशी आपली बोलणी झालेली असून त्यांनी आपापल्या राज्यातून गोव्याला होणारा माल पुरवठा सुरळीत होईल असे आश्‍वासन दिले असल्याचे ते म्हणाले. गोव्यात माल घेऊन येणारे ट्रक कुणालाही अडवू दिले जाणार नसल्याची ग्वाही या राज्यांच्या सचिवांनी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रवेश कराविषयी पुढे ते म्हणाले की, राज्यातील महत्त्वाचे व प्रमुख पुल व प्रमुख जिल्हा मार्ग यासाठी हा प्रवेश कर आकारण्यात येत आहे. प्रवेशकरामुळे राज्यात येणार्‍या वाहनांची संख्या कमी झाल्याचा दावाही त्यांनी फेटाळला.

परराज्यातून गोव्यात येणारी वाहने येथे आल्यानंतर स्वस्तात मिळणारे पेट्रोल व डिझेल आपल्या वाहनांच्या टाक्यात भरून नेत असून त्यावर त्यांना प्रचंड फायदा होत असल्याचे पर्रीकर म्हणाले व प्रवेशकरामुळे पर्यटनाला फटका बसेल हे विरोधकांचे म्हणणे त्यांनी फेटाळून लावले.

सिंधुदुर्ग, बेळगाव, कारवार व कोल्हापूर येथून येणार्‍या गाड्यांसाठी १५ दिवसांच्या आत पास पध्दत सुरू केली जाईल असे त्यांनी सांगितले.