प्रदेश कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात विशेष दर्जा, दुहेरी नागरिकत्व, खाणींसह सात मुद्दे

0
50
जाहीरानाम्यात सर्वांत वरचे स्थान देण्यात आले आहे ते राज्यासाठीच्या विशेष दर्जाला. सुंदर गोव्यातील जमीन हडप करण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय भू-माफिया प्रयत्न करीत असून ते टाळण्यासाठी व गोव्याची संस्कृती, अस्मिता व गोव्याचा सुंदर प्रदेश अबाधित राखण्यासाठी राज्याला विशेष दर्जा देण्याचा कॉंग्रेस सरकार प्रयत्न करणार आहे.

दुहेरी नागरिकत्व मुद्दा

युरोपियन देशात जाऊन नोकरी करता यावी यासाठी राज्यातील बर्‍याच लोकांनी पोर्तुगीज नागरिकत्वाचा लाभ मिळवलेला असून या लोकांसमोर समस्या निर्माण होऊ नये यासाठी त्यांना विशेष ‘ओव्हरसीज सिटिझनशीप ऑफ इंडिया’ ही सवलत मिळवून देण्यासाठी नागरिकत्व कायद्याखाली आवश्यक ते सर्व काही करण्यात येणार असल्याचे जाहीरनाम्यातून स्पष्ट करण्यात आले आहे.

ड्रग माफियांवर कारवाई

राज्यातील ड्रग माफियांवर कारवाई करून कायदा व सुव्यवस्था सुधारण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे.

खाण व्यवसाय

राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करून कायदेशीर खाणी लवकरात लवकर सुरू करण्यावर पक्ष भर देणार आहे. तसेच खाण उद्योग बंद पडल्याने संकटात सापडलेले ट्रक मालक, बार्ज मालक व अन्यांना कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी आवश्यकत ते प्रयत्न करण्याचेही आश्‍वासन जाहीरनाम्यात आहे. कायदा व सुव्यवस्था
राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली असून कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू असेही जाहीरनाम्यात म्हटले आहे. विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना सध्या जे त्रास सहन  करावे लागत आहेत त्यातून त्यांची मुक्तता करण्यासाठी त्यांच्या फायद्याचे असे शिक्षण धोरण तयार करण्यात येणार असल्याचे जॉन यांनी शेवटी सांगितले.

वादळग्रस्तांसाठी कॉंग्रेस निधी जमवणार

सत्तरी व डिचोलीत शुक्रवारी झालेल्या वादळी पावसामुळे स्थानिक लोकांचे मोठे नुकसान झालेले असून त्या लोकांना नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. कॉंग्रेस पक्ष त्यासाठी निधी गोळा करणार असल्याचे ते म्हणाले. आमचे उमेदवार रवी नाईक व अन्य नेत्यांनी काल सत्तरी व डिचोली तालुक्यांचा दौरा करून वादळामुळे झालेली पडझड व लोकांचे नुकसान याची माहिती मिळवल्याचे ते म्हणाले.
शुक्रवारी सत्तरी व डिचोली तालुक्यात वादळी पावसामुळे संकटात सापडलेल्या लोकांना सरकारने आर्थिक मदत करण्याची गरज असून निवडणूक आचारसंहितेचा त्याला अडथळा होऊ नये यासाठी सरकारने आयोगाकडे परवानगी घेऊन लोकांना मदत करावी, अशी मागणी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी काल पत्रकार परिषदेतून केली.