Home बातम्या ‘प्रतीभा भीमा’ जहाज ताब्यात

‘प्रतीभा भीमा’ जहाज ताब्यात

0

एम्‌पीटीच्या मदतीने हे महाकाय जहाज समुद्रातून ओढून मुरगांव बंदरात आणण्यात आले. सदर जहाजाचे मुख्य इंजीन यापूर्वीच बंद पडलेले आहे. सदर जहाज हे कोणत्याही बंदराच्या हद्दीत नव्हते, अशी माहितीही त्यांनी दिली. हे जहाज ओढून आणण्यासाठी ४५ टनाच्या तीन जहाजांचा वापर करावा लागला. तीन दोरखंडांनी ते ओढण्यात आले.

जहाज समुद्रात राहिले असते तर ते गोव्याच्या किनार्‍यावर येऊन धडकण्याची व रिव्हर प्रिन्सेस जहाजामुळे जसे किनार्‍याचे नुकसान झाले तसेच एखाद्या किनार्‍याचे नुकसान होण्याची भीती होती. जहाजातून तेलगळती झाली असती तर गोव्याच्या किनारपट्टीचे आणखी मोठे नुकसान झाले असते व पर्यटनावरही परिणाम झाला असता. पण योग्य वेळीच जहाज ताब्यात घेण्यात आल्याने एक मोठी आपत्ती टळल्याचे ते म्हणाले. जहाज हटवण्यास मदत करण्यास कोणतीही केंद्रीय एजन्सी तयार नव्हती. शेवटी आम्ही एम्‌पीटीशी संपर्क साधला. सुरवातीला त्यानीही नकार दिला. मात्र, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, मुख्य सचिव बी. विजयन् यांनी हस्तक्षेप केल्यानंतर एम्‌पीटी राजी झाली. नंतर गुरुवारी जहाज हटवण्यासाठीचे काम हाती घेण्यात आल्याचे ब्रागांझा म्हणाले.

२०४ मीटर एवढ्या लांबीचे हे जहाज असून दीड लाख मेट्रीक टन एवढा माल नेण्याची त्याची क्षमता असल्याचे ते म्हणाले. सदर जहाज तेथून नेण्यास बोटीचा मालक रस दाखवत नव्हता. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली आम्ही कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत जहाज मुरगांव बंदरात राहणार असल्याचे ब्रागांझा यांनी स्पष्ट केले. या जहाजावर १५ कर्मचारी असल्याची माहितीही त्यांनी दिली.

सदर कंपनीची आणखी चार जहाजे अशा प्रकारे बेकायदेशीरपणे अन्यत्र नांगरून ठेवण्यात आलेली असून त्यापैकी दोन मुंबईतील तर एक चेन्नै येथील समुद्रात असल्याची माहिती असल्याचे ब्रागांझा यांनी सांगितले. हे जहाज समुद्रातून हटवण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व मुख्य सचिव बी. विजयन् यांनी केलेल्या प्रयत्नांचा कॅप्टन ऑफ पोटर्‌‌स जेम्स ब्रागांझा यांनी खास उल्लेख केला. सदर जहाज एका केंद्रीय मंत्र्यांच्या मालकीचे असल्याचे वृत्त निराधार असल्याचे ते म्हणाले. जहाजावरील कर्मचार्‍यांकडे अन्नाचा पुरेसा साठा नव्हता व त्यामुळे त्यांची स्थिती हलाखीची बनली होती, असेही ब्रागांझा यांनी सांगितले. जहाज हटवण्यासाठीचे काम गुरुवारी सकाळी सुरू झाले होते. ते संध्याकाळी ७ च्या सुमारास संपले.

कॅसिनोना ताबडतोब हाकला : महापौर

मांडवीतील तरंगत्या कॅसिनोंना आपला पूर्ण विरोध असून पुढील चार वर्षांत नव्हे तर चार महिन्यात या कॅसिनोंना मांडवीतून हाकलावे असे आपले प्रामाणिक मत असल्याचे पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

पणजी शहराच्या विकासकामासाठी चर्चा करण्यास मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज शुक्रवारी आपणास बोलावले असून यावेळी आपण त्यांच्याशी कॅसिनोबाबतची आपली भूमिका मांडणार असल्याचे ते म्हणाले.

कॅसिनोसारख्या जुगारामुळे कुणाचेही भले होणार नसून गोव्यातील युवा पिढी या जुगारामुळे बरबाद होण्याची भीती असल्याचे फुर्तादो म्हणाले. आज मुख्यमंत्र्याबरोबर होणार्‍या बैठकीत आपण पणजी शहराच्या विकासकामाबाबत त्यांच्याशी तपशीलवार बोलणी करणार असल्याचे ते म्हणाले.