26.2 C
Panjim
Friday, June 25, 2021

प्रतिष्ठेच्या निवडणुका कल कोणाकडे? कौल कोणाला?

  • बबन विनायक भगत

 

गोव्याची लोकसभा निवडणूक आणि विधानसभा पोटनिवडणूक नुकतीच झाली. काय होते यावेळी प्रचाराचे मुद्दे आणि कोणाला असेल मतदारांचा कौल? एक विश्‍लेषण-

 

२०१४ साली या देशात एक मोठी लाट आली. त्या लाटेचं नाव होतं नरेंद्र मोदी. देशातील सर्वात जुना असलेला व काही वर्षांचा अपवाद सोडल्यास सतत सत्तेत राहिलेला कॉंग्रेस पक्ष या लाटेत असा काही वाहून गेला की सांगायची सोय नाही. अवघ्या ४४ जागांवर समाधान मानावं लागल्यानं कधी नव्हे एवढी नामुष्की या पक्षावर ओढवली. गांधी घराण्यातील सोनिया गांधी (पक्षाच्या तत्कालीन अध्यक्ष) व राहुल गांधी यांच्या नेतेपदाविषयी प्रश्‍नचिन्ह उभं केलं जाऊ लागलं. याउलट नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला २८२ जागा मिळून तो पक्ष सत्तेवर आरूढ झाला. १५व्या लोकसभेवर भाजपची जेवढी सदस्यसंख्या होती त्यापेक्षा ही संख्या १६६ने जास्त होती. त्यामुळे नरेंद्र मोदी यांचा उदो उदो होऊ लागला.

खरं म्हणजे २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी जेव्हा विविध प्रसारमाध्यमांतून ‘नमो! नमो!’चा जयघोष सुरू झाला, तेव्हाच खरे म्हणजे मोदी यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले होते. घराघरांत, नाक्यानाक्यांवर, चौकाचौकांत तेव्हा मोदी यांचाच बोलबाला होता. एक नवं नेतृत्व तेव्हा मोदी यांच्या रूपात देशपातळीवर उदयाला आलं. मोदी यांनी त्यावेळी लोकांसमोर एक आगळावेगळा असा जाहीरनामा ठेवला. विदेशातील काळा पैसा सत्तेवर येताच भारतात आणू, दर एका भारतीयाच्या बँक खात्यात १५ लाख रु. जमा करू असं मोदी यांनी दणक्यात सांगून टाकलं. कॉंग्रेस पक्षाच्या भ्रष्टाचाराचा पाढा जनतेसमोर वाचण्यात आला. विद्वान प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना सोनिया गांधी व पुत्र राहुल गांधी यांनी कळसूत्री बाहुली बनवल्याचं व सरकारचा रिमोट कंट्रोल सोनिया-राहुल या माता-पुत्राच्या हाती असल्यानं यूपीए सरकार काहीही करू शकत नाही असं लोकांना सांगण्यात आलं. मोदींनी जे काही सांगितलं ते लोकांना पटलं.

मोदी म्हणाले, गेल्या ६० वर्षांपेक्षा जास्त काळ कॉंग्रेसने देशात राज्य केले; पण सामान्य जनता मात्र गरीबच राहिली. दारिद्य्र मिटायचं सोडून ते वाढतच राहिलं. आता मी सत्तेवर आल्यानंतर लोकांना ‘अच्छे दिन’ येतील.

‘अच्छे दिन’चा हा नारा जनतेला प्रचंड आवडला. ‘अच्छे दिन’च्या केवळ कल्पनेनेही लोक सुखावले. त्यातच लोकांनी मोठ्या संख्येने मतदानाच्या वेळी कमळासमोरील बटन दाबलं आणि १६व्या लोकसभेवर भाजपचा दणदणीत विजय झाला. कॉंग्रेस पक्षाची पार धुलाई झाली. कॉंग्रेसच्या खासदारांची संख्या ४४ वर येऊन दोन अंकी झाली. शंभर वर्षांपेक्षा जुना असलेल्या या पक्षाला एवढ्या तारुण पराभवाला कधीही सामोरं जावं लागलं नव्हतं. हीच संधी साधत नंतर नरेंद्र मोदींनी ‘कॉंग्रेसमुक्त भारत’चा नारा दिला आणि २०१४ नंतर १८ राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी ११ राज्यांत विजय मिळवला.

गोमंतकीयांनी मात्र भाजपकडे पाठ फिरवली
मात्र, याच पार्श्‍वभूमीवर २०१७ साली गोव्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत गोव्यातील जनतेने भाजपविरोधात मतदान करीत २०१२ साली झालेल्या निवडणुकीत २१ जागा जिंकलेल्या भाजपच्या पदरात केवळ १३ जागा टाकल्या. भाजपचे गोव्यातील दमदार व सर्वात मोठे नेते मनोहर पर्रीकर हे तेव्हा केंद्रात संरक्षणमंत्री होते. बहुमत न मिळाल्याने भाजपला राज्यात सरकार स्थापन करण्यास अडचणी येत असल्याची संधी साधत पर्रीकर यांनी गोव्यात परतण्याचा निर्णय घेतला. मगो व गोवा फॉर्वर्ड या प्रत्येकी तीन जागा जिंकलेल्या प्रादेशिक पक्षांची मोट बांधून सरकार स्थापन करण्याची जबाबदारी पर्रीकर यांनी घेतली. भाजपच्या पराभवाबरोबरच भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचाही या निवडणुकीत धक्कादायक असा पराभव झाला होता.

पर्रीकर दिल्लीतून गोव्यात परतले ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा आशीर्वाद घेऊनच. पण हुशार व तल्लख बुद्धी असलेल्या मनोहर पर्रीकर यांनी संरक्षणमंत्रीपद सोडून गोव्यात जाऊ नये असे मोदी यांचे म्हणणे होते. पण पर्रीकर गोव्यात परतले व त्यांनी मगोचे नेते सुदिन ढवळीकर व गोवा फॉर्वर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई या दोन्ही नेत्यांंना भाजपला पाठिंबा देण्यास तयार केले. गोविंद गावडे व रोहन खंवटे या अपक्षांनीही पर्रीकर यांना पाठिंबा देण्याची तयारी दाखवली आणि १७ जागा जिंकत सर्वात मोठा एकेरी पक्ष ठरलेल्या कॉंग्रेसला वाकुल्या दाखवत पर्रीकर यांनी सरकार स्थापन केले. मात्र, अवघ्या वर्षभरानंतर पर्रीकर यांना गंभीर आजाराने ग्रासले, पण तद्नंतर गंभीर आजारातही त्यांनी वर्षभर मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले.
गेल्या मार्च महिन्यात पर्रीकर यांचे देहावसान झाल्याने त्यांच्या गैरहजेरीत लोकसभा व तीन ठिकाणी (म्हापसा, मांद्रे व शिरोडा) होणार्‍या निवडणुकांची जबाबदारी नवे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढण्याची जबाबदारी भाजपवर येऊन पडली.

खाण उद्योग
राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला खाण उद्योग बंद पडल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही निवडणूक होत असल्याने या लोकसभा निवडणुकीत राज्यात प्रचारासाठीचा तो महत्त्वाचा मुद्दा बनणे हे अपेक्षितच होते. त्यामुळे भाजपबरोबरच प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस पक्षानेही तो निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा बनवला. केंद्रात तसेच राज्यातही भाजपचे सरकार सत्तेवर असताना भाजपला राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग सुरू करता आला नाही अशी खरमरीत शब्दांत भाजपवर टीका करीत कॉंग्रेसने निवडणूक प्रचाराच्या काळात भाजपला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. तर दुसर्‍या बाजूने भाजपने केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचेच सरकार सत्तेवर येणार असल्याने भाजपच राज्यातील खाण उद्योग सुरू करू शकेल, असे सांगून मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न केला.
मात्र, खाणी सुरू होत नसल्याने खाणपट्‌ट्यातील जनता जेरीस आलेली असून या पार्श्‍वभूमीवर या लोकांनी कुणाच्या बाजूने कौल दिला आहे हे पाहावे लागणार आहे.
खाणपट्‌ट्यातील लोकांची मते या निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याने भाजप तसेच कॉंग्रेसलाही या मतांची चिंता लागून राहिली होती. आता बंद मतपेटीतील या मतांविषयी उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहे.

मच्छीमार व सीआरझेड्‌चा मुद्दा
गोव्यात एका बाजूने खाणपट्टा आहे तर दुसर्‍या बाजूने अरबी समुद्र. खाणपट्‌ट्यातील लोक खाणींवर उदरनिर्वाह करणारे, तर किनारपट्टीवरील जनता ही पर्यटन व मच्छीमारी व्यवसाय करणारी.
केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी सीआरझेड् कायद्यामध्ये एक दुरुस्ती घडवून आणली. या दुरुस्तीद्वारे सरकारने भरतीरेषेपासून वा विकास क्षेत्र जे पूर्वी २०० मीटर एवढे होते ते ५० मीटरवर आणले. गोव्यातील विरोधी पक्ष असलेला कॉंग्रेस तसेच राज्यातील पर्यावरणवादी व बिगर सरकारी संघटनांनी या दुरुस्तीला विरोध केला. बिल्डर लॉबीला किनारपट्टी गिळंकृत करण्यास देण्याच्या कटाचा हा भाग असल्याचे त्यांचे म्हणणे असून या दुरुस्तीमुळे गोव्याच्या किनारपट्टीवरील पर्यावरण धोक्यात येणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कॉंग्रेसने मच्छीमारांची मते मिळवण्यासाठी या दुरुस्तीला कडाडून विरोध केला. तसेच तो निवडणूक मुद्दाही बनवला. राज्यात पारंपरिक मच्छीमार असलेल्या रापणकारांसह मोठ्या संख्येने ट्रॉलरवाले व अन्य मच्छीमारही गोव्यात असून या समाजातील मतदारांचा आकडा हजारोंच्या घरात आहे. या मच्छीमारांची मतेही या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावणार आहेत.

उत्तरेत दोन भंडारी नेत्यांमध्ये लढत
उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक (भाजप) व गिरीश चोडणकर (कॉंग्रेस) या नेत्यांमध्ये जोरदार लढत असून शेवटी विजय कुणाचा होतो हे २३ मे रोजीच स्पष्ट होणार आहे. भंडारी समाज हा राज्यातील संख्येने सर्वात मोठा असलेला समाज. शिवाय राजकारणातही अन्य सर्व समाजांपेशा सक्रिय असलेला समाज. या समाजकार्डाचा भाजप नेते श्रीपादभाऊ यांना दर निवडणुकीत लाभ मिळालेला आहे. मात्र यंदा त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले कॉंग्रेस नेते गिरीश चोडणकर हेही भंडारी समाजातील नेते असल्याने यंदा या समाजाची मते विभागली जाणार आहेत. गेल्या निवडणुकीतही श्रीपाद नाईक यांच्या विरोधात भंडारी समाजातीलच एक ज्येष्ठ नेते असलेले रवी नाईक हे रिंगणात होते. मात्र, त्यावेळच्या मोदी लाटेमुळे रवी नाईक यांना श्रीपाद नाईक यांच्याकडून दारूण पराभव स्वीकारावा लागला होता. १ लाख ६ हजार एवढी आघाडी त्यावेळी भाऊंना मिळाली होती. यापूर्वी श्रीपाद नाईक हे चार वेळा खासदार बनलेले आहेत. यंदा विजयी झाल्यास पाचव्यांदा खासदार बनण्याचे भाग्य त्यांना लाभणार आहे. मात्र यंदा झुंज कडवी आहे. कॉंग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर यांनाही विजयाची संधी असल्याचा काहींचा दावा आहे. प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून चोडणकर यांनी राज्यात कॉंग्रेसला नवसंजीवनी देण्याचे काम केलेले आहे. प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर चोडणकर यांनी ‘नमन गोंयकारा’ हे जनसंपर्क अभियान घडवून आणले. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हल्लीच त्यांनी उत्तर गोव्यात सायकल यात्रा घडवून आणली. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी त्यांनी पत्रादेवी ते काणकोण अशी पदयात्राही घडवून आणली. त्यामुळे चोडणकर यांचे नाव सर्वत्र झाले. त्यामुळे चारित्र्यसंपन्न श्रीपाद नाईक यांच्याविरुद्ध लढा देऊ शकतील असे नेते व उमेदवार म्हणून गिरीश चोडणकर यांची प्रतिमा निर्माण झाली. आता या मतदारसंघात कोण बाजी मारतो ते २३ मे रोजी जाहीर होईलच!

दक्षिण गोवा
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ख्रिस्ती मतदारांची मोठी संख्या असलेल्या दक्षिण गोवा मतदारसंघातही मोदी लाटेमुळे विजय मिळाला होता. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, त्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने आपले त्यावेळचे खासदार व लोकप्रिय नेते फ्रान्सिस सार्दिन यांना उमेदवारी नाकारून युवा नेते आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना दिली होती. मात्र मोदी लाटेत नरेंद्र सावईकर हेही त्यावेळी विजयी झाले. आता नरेंद्र सावईकर यांचा मागच्या निवडणुकीत उमेदवारी नाकारलेल्या फ्रान्सिस सार्दिन या बलाढ्य कॉंग्रेस नेत्याशी सामना झालेला असून मते मतपेटीत बंद झालेली आहेत. दक्षिणेत सार्दिन यांचाच विजय होणार, असा अंदाज त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत असला तरी शेवटी तो एक अंदाजच आहे, या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. दक्षिण गोव्यात कॉंग्रेसची सगळी भिस्त असते ती सासष्टी तालुक्यावर. सासष्टी हा ख्रिस्ती धर्मियांची मोठी संख्या असलेला तालुका. हा तालुका म्हणजे कॉंग्रेसचा बालेकिल्ला. या तालुक्यातील मडगाव, फातोर्डा व अन्य मतदारसंघांतील गोमंतकीय तसेच बिगर गोमंतकीय मुस्लिम धर्मीय हेही कॉंग्रेस पक्षाचे पाठीराखे. त्यामुळे सासष्टी तालुक्यात मिळणारी मतांची आघाडी ही कॉंग्रेस पक्षाला विजयाच्या समीप घेऊन जात असे. आतापर्यंत कॉंग्रेसला या मतदारसंघात पाच वेळा विजय प्राप्त झालेला आहे, तर भाजपला केवळ दोनच वेळा या मतदारसंघात विजय मिळाला आहे. १९९९- रमाकांत आंगले, २०१४ मध्ये नरेंद्र सावईकर. एदुआर्द फालेरो हे कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर या मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आलेले आहेत. हा विक्रम गोव्यात अद्याप कुणाला मोडता आलेला नाही.

यंदा श्रीपाद नाईक हे पुन्हा उत्तर गोव्यातून विजयी झाल्यास या मतदारसंघातून सलग पाच वेळा विजयी होण्याचा विक्रम त्यांच्या नावावरही होणार आहे.
फ्रान्सिस सार्दिन यांनी दक्षिणेतून कॉंग्रेसच्या उमेदवारीवर तीन वेळा निवडणूक लढवली असून तिन्ही वेळा ते विजयी झालेले आहेत. यंदा आम आदमी पार्टीचे उमेदवार एल्विस गोम्स हे सासष्टीत किती मते मिळवतात त्यावरही सार्दिन जिंकणार की सावईकर हे ठरणार आहे.

पोटनिवडणुकांची चुरस
लोकसभा निवडणुकीच्या वेळीच राज्यातील शिरोडा, म्हापसा व मांद्रे या तीन विधानसभा मतदारसंघांत निवडणुका झाल्या, तर पणजी मतदारसंघात १९ मे रोजी निवडणूक होणार आहे. राज्यातील प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या स्थैर्यासाठी या पोटनिवडणुका फार महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या चार जागांपैकी किती जागा भाजपला मिळतील याकडे गोमंतकीयांचे लक्ष लागून राहिले आहे. शिरोड्यात मगोने भाजपच्या पोटात गोळा आणला आहे. मगोच्या शिरोड्यातील उमेदवारीच्या प्रश्‍नावरून मगो व भाजप यांच्यातील युती संपुष्टात आली होती. आता तेथे दीपक ढवळीकर यांच्या विजयाची शक्यता काहींकडून व्यक्त केली जाऊ लागली असल्याने भाजप नेते दडपणाखाली आले आहेत. कॉंग्रेसमधून फुटून भाजपशी हातमिळवणी केलेले अन्य एक नेते म्हणजे दयानंद सोपटे. जीत आरोलकर या मगोचा पाठिंबा असलेल्या अपक्ष उमेदवाराने त्यांच्या नाकी नऊ आणल्याची चर्चा आहे. त्यामुळे तेथेही सोपटे व आरोलकर यांच्यात जोरदार टक्कर आहे. कॉंग्रेसचे बाबी बागकर हेही तेथील तिसरे दावेदार आहेत.
म्हापशात भाजपचे उमेदवार जोशुआ डिसोझा व बंडखोर भाजप नेते असलेले कॉंग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर यांच्यापैकी कोण विजयी होईल हे पाहावे लागणार आहे.

आता लक्ष पणजीकडे
पणजीतील पोटनिवडणूक सोडल्यास अन्य सर्व पोटनिवडणुका पार पडल्याने आता सर्व राजकीय पक्षांचे लक्ष पणजीकडे लागून राहिले आहे. पणजीत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना भाजप उमेदवारी देणार असल्याची चर्चा असून कॉंग्रेसने यापूर्वीच बाबुश मोन्सेर्रात यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यामुळे भाजपसाठी अन्य निवडणुकांपेक्षाही पणजीची निवडणूक ही जास्त प्रतिष्ठेची ठरणार आहे हे मात्र नक्की!

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

सुस्तावाल तर पस्तावाल!

कोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...

आता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका

>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...

लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो

गोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...

सीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच

>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...

राज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार

>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...

ALSO IN THIS SECTION

हिमालयाच्या सर्वोच्च शिखराचे मापन कुणी केले?

दत्ता भि. नाईक ‘हिमालयन माऊंटेनियरिंग इन्स्टिट्यूट’ ही साधीसुधी संस्था नाही. तिच्याच अध्यक्षांनी हा विषय काढल्यामुळे तो आता चर्चेचा...

ख्याल गायकीचे अनभिषिक्त सम्राट पं. राजन मिश्रा

गो. रा. ढवळीकर बुलंद आवाजाने व भावपूर्ण गायकीने जगभर मैफिली गाजवणारे पं. राजन मिश्रा एवढ्या लवकर जातील असे वाटले...

कर्जदार मृत्यू पावल्यास वसुलीचे काय?

शशांक मो. गुळगुळे सध्या कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. बर्‍याच चालत्या-बोलत्या व्यक्ती अचानक जाण्याचे अनुभव येत आहेत. अशा...

सख्य

गिरिजा मुरगोडी फ्रेण्डशीप-डे हा सर्व सर्व स्तरांवरचा मैत्री दिवस, तर हा खास सख्य उजागर करणारा मैत्र दिन. संकल्पना...

परीक्षांचं करायचं काय?

दिलीप वसंत बेतकेकर खरं तर शिकणं म्हणजे काय तर जाणून घेणं; व जाणून घेण्याची क्रिया ही जन्मापासून मृत्यूपर्यंत...