प्रतिभासंपन्न साहित्यिक ः रत्नाकर मतकरी

0
389
  • डॉ. सोमनाथ कोमरपंत

मराठी नाट्यक्षेत्राला विविध स्वरूपाची आशयसूत्रे देणारा प्रथितयश नाटककार म्हणून मतकरी यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची स्वतंत्र मुद्रा निर्माण केली होती. मराठी रंगभूमीवर प्रायोगिक नाटकांचा नवा मनू निर्माण करण्यात त्यांचा लक्षणीय वाटा होता. विपुल नाटके लिहूनही गुणवत्ता टिकविणे हा त्यांचा गुणविशेष होता. ते खर्‍या अर्थाने नाट्यधर्मी होते. लोकप्रियतेच्या दिंडीत न शिरता, परंपरेचे अंधानुकरण न करता, वास्तवाभिमुख बैठक कायम ठेवून व नवतेचे भान ठेवून त्यांनी मराठी नाट्यक्षेत्राला नव्या संहिता सातत्याने दिल्या.

प्रख्यात नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या मृत्यूची बातमी येऊन थडकली आणि साहित्यविश्‍वात दुःखाची लाट पसरली.
मराठी नाट्यक्षेत्राला विविध स्वरूपाची आशयसूत्रे देणारा प्रथितयश नाटककार म्हणून आपल्या व्यक्तिमत्त्वाची स्वतंत्र मुद्रा त्यांनी निर्माण केली होती. मराठी रंगभूमीवर प्रायोगिक नाटकांचा नवा मनू निर्माण करण्यात त्यांचा लक्षणीय वाटा होता. विपुल नाटके लिहूनही गुणवत्ता टिकविणे हा त्यांचा गुणविशेष होता. ते खर्‍या अर्थाने नाट्यधर्मी होते. लोकप्रियतेच्या दिंडीत न शिरता, परंपरेचे अंधानुकरण न करता, वास्तवाभिमुख बैठक कायम ठेवून व नवतेचे भान ठेवून त्यांनी मराठी नाट्यक्षेत्राला नव्या संहिता सातत्याने दिल्या.

वयाच्या सतराव्या वर्षी ‘वेडी माणसे’ ही श्रुतिका लिहून रत्नाकर मतकरी यांनी नाट्यारंभ केला. त्यानंतर पाच तपे त्यांनी आपले जीवन नाट्यविषयक कामगिरीला समर्पित केले असे निःसंदिग्धपणे म्हणता येईल. प्रायोगिक, व्यावसायिक आणि बालनाट्ये अशी तीन प्रकारची नाटके मतकरी यांनी लिहिली. ‘मधुमंजिरी’ (१९५९) या बालनाट्याने त्यांनी आपल्या नाट्यलेखनाला खर्‍या अर्थाने प्रारंभ केला. ‘बालनाट्य’ (१९६२) ही संस्था स्थापन करून त्यांनी बालनाट्यविषयक चळवळ उभी केली. १९७० मध्ये त्यांनी ‘सूत्रधार’ ही नाट्यसंस्था स्थापन केली. नाट्यक्षेत्रात निर्मिती आणि दिग्दर्शन निष्ठेने केले. त्यांची काही नाटके रूपांतरित स्वरूपाची व बरीचशी स्वतंत्र स्वरूपाची आहेत. समाजात वेळोवेळी निर्माण झालेल्या समस्यांवर प्रकाशझोत टाकणारी नाटकेही त्यांनी लिहिली. त्यांतील आशय स्फोटक आहे. समकालीन नाटककारांमध्ये नाट्यप्रकार समाजाभिमुख करण्यात मतकरी यांनी उदंड यश मिळविले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील समाजमनस्कता त्याला कारणीभूत झाली असावी. त्यांनी ‘नर्मदा बचाव आंदोलन’ आणि ‘निर्भय बनो आंदोलन’ या चळवळीत प्रत्यक्ष भाग घेतलेला आहे.

आजमितीस ७० हून अधिक नाटके, २२ बालनाट्ये, २० कथासंग्रह, ३ कादंबर्‍या आणि १२ लेखसंग्रह असा रत्नाकर मतकरी यांचा लेखनसंभार आहे. माध्यमान्तरात त्यांनी आपले कौशल्य प्रकट केले आहे. पु. ल. देशपांडे यांच्या ‘असा मी असामी’ आणि ‘व्यक्ती आणि वल्ली’ यांचे केलेले नाट्यरूपांतर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
‘हुंडाबळी’च्या समस्येवर मतकरी यांनी ‘अग्निदिव्य’ हे नाटक लिहिले. दलितांवर सवर्णांनी केलेल्या छळाच्या पार्श्‍वभूमीवर आधारलेले ‘लोककथा ७८’ हे नाटक त्यांनी लिहिले. ते अत्यंत गाजले. ‘लोककथा ७८’ आणि ‘आरण्यक’ यांसारख्या नाटकांतून त्यांची प्रायोगिकता दिसून येते. नाट्यसंहिता हाच नाटकाचा आत्मा, बाकी सर्व घटक संहितेला पूरक म्हणून येतात ही त्यांची धारणा. दिग्दर्शक या नात्याने याचा ते सांगोपांग विचार करीत.

रत्नाकर मतकरी यांच्या नाट्यसंहितांचा सम्यक अंगांनी परामर्श घेणे हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. तरीही त्यांचे नाट्यचिंतन कोणत्या स्वरूपाचे होते याची थोडीफार कल्पना यावी म्हणून एक-दोन महत्त्वाच्या आशयसूत्रांना स्पर्श करणे अगत्याचे वाटते.
‘लोककथा ७८’ हे रत्नाकर मतकरी यांचे उल्लेखनीय नाटक. दलितांचा सवर्णांकडून होणारा सर्वंकष छळ हे या नाटकाचे आशयसूत्र. या नाटकातील जीवनानुभव दाहक स्वरूपाचा. खेड्यातील काही मंडळी शहरात येऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध कैफियत नाटकरूपाने शहरवासीयांसमोर मांडत आहेत, ही रचना स्वीकारून मतकरी यांनी व्यामिश्र अशा सामाजिक समस्येला नाट्यरूपाने वाचा फोडली आहे. या नाटकातील सव्वीस दृश्यांतून खेड्यातील मनस्वी वृत्तीचे तरुण, त्यांचे साथीदार, त्यांचे कुटुंब, त्यांचे भाईबंद, गावचा पाटील, सरपंच, फौजदार व सेक्रेटरी यांच्यातील अंतसंघर्ष नाटककाराने अतिशय सुसंगतपणे मांडला आहे. स्वातंत्र्योत्तर भारतीय समाजात दलितांच्या वाट्याला आलेले भागधेय त्याने रेखाटले आहे. हे विदारक सत्य त्याने शोकात्मिकेच्या पातळीवर नेले आहे.

रत्नाकर मतकरी यांनी आपल्या नाटकात परंपरा नाकारलेली नाही. महाभारतावरील ‘आरण्यक’ ही त्यांची नाट्यकृती हे त्याचे उदाहरण आहे. ख्यातनाम विदुषी दुर्गाबाई भागवत यांची प्रस्तावना या नाटकाला लाभलेली आहे. या नाटकातील विषय महाभारताच्या शेवटच्या पर्वातील आहे. विदूर, कुंती, गांधारी, धृतराष्ट्र अशी दुय्यम पात्रे नाटककाराने घेतलेली आहेत. ही पात्रे काहीही न करता मृत्यूची वाट पाहात स्वस्थ बसलेली आहेत. हा आव्हानात्मक विषय मतकरींनी जीवन-मृत्यूविषयक चिंतनाच्या पातळीवर नेलेला आहे. तो सर्वकालिक स्वरूपाचा झालेला आहे. आशयातील प्रगल्भ चिंतनाला साजेशा मुक्तछंदासारख्या वेगळ्या शैलीचा वापर त्यांनी केला आहे. रंगमंचाचा वापर वेगळ्या पद्धतीने केला आहे. रूढ अर्थाने ‘आरण्यक’ला नायक नाही. ते नाटक प्रायोगिक म्हणून लक्षणीय ठरले आहे.

रत्नाकर मतकरी यांनी आपल्या ‘वर्तुळाचे दुसरे टोक’, ‘बिर्‍हाड बाजलं’, ‘दुभंग’, ‘माझं काय चुकलं’ आणि ‘जौळ’ या कादंबर्‍यांवर आधारित ‘खोल खोल पाणी’, ‘सत्तांध’, ‘घर तिघांचं हवं’, ‘कार्टी प्रेमात पडली’, ‘जावई माझा भला’ व ‘चार दिवस प्रेमाचे’ इत्यादी नाटके लिहिली व रंगभूमीवर ती यशस्वी ठरली.
नाटकांप्रमाणे एकांकिका आणि कथा-कादंबरी हे वाङ्‌मयप्रकार मतकरींनी तितक्याच ताकदीने हाताळले. ‘सात एकांकिका’ (१९६१), ‘एकाच मातीची खेळणी’ (१९६२), ‘लाल गुलाबाची भेट’ (१९६४), ‘शय्या’ (१९७२), ‘सत्य’ (१९७२), ‘कहाणी कुणा प्रेमिकांची’ (१९७२), ‘अंधारवाडा’ (१९७७), ‘पोटर्‌रेट’ (१९८१) आणि ‘यक्षिणी’ (१९८८) हे त्यांचे काही एकांकिकासंग्रह आहेत. रहस्यपूर्णता आणि आशयांतर्गत नाट्याला दिलेली कलाटणी या दोहोंचा आकर्षक मेळ त्यांच्या एकांकिकांमध्ये असतो. मराठीतील महत्त्वाच्या एकांकिकांकारांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते.

गूढकथांचा प्रवाह मराठीत रूढ करण्यात रत्नाकर मतकरी यांना श्रेय दिले जाते. मराठीत सुरुवातीच्या काळात द. पां. खांबेटे यांनी या प्रकारचे लेखन केले, पण ते प्राधान्याने ‘भयकथा’ या वर्गात गणले जाणारे होते. प. गं. सुर्वे, ग. रा. टिकेकर आणि गजानन क्षीरसागर यांनीही या प्रकारचे लेखन केले. पण रत्नाकर मतकरी यांनी जाणीवपूर्वकतेने याही क्षेत्रात काही प्रयोग केले. त्यांनी सातत्य तर राखलेच, शिवाय वैविध्य आणले. सुरुवातीला त्यांनी परीकथा लिहिल्या. फँटसीच्या अंगाने जाणार्‍या तरल, काव्यात्म प्रकृतीच्या या कथा आहेत. रम्याद्भुत वातावरणात आकारणार्‍या या कथांतून मानवी भावभावनांचे, सुख-दुःखांचे, मानवी जीवनव्यवहारातील वास्तवच रेखाटले आहे. ते मूर्त करणारी शब्दकळा प्रामुख्याने प्रतीक-प्रतिमांची आहे. व्यंजनेवर तिचा भर आहे. या परीकथांचे स्वरूप वरपांगी सुबोध वाटत असले तरी व्यामिश्र असा जीवनाचा अर्थ पेलण्याची क्षमता तिच्यात आहे. सर्जनशील वाचनाची अपेक्षा राखणारी ही कथा आहे. जीवनाविषयीचा भावात्मक दृष्टिकोन आणि मूल्यदृष्टी प्रकट करणारी ही कथा आहे.

१९७९ ते १९८३ या कालावधीत रत्नाकर मतकरी यांनी स्त्रीकेंद्री स्वरूपाच्या वास्तवादी जीवनावर आधारलेल्या दहा कथा लिहिल्या. (‘दहाजणी’) यातील एक कथा वगळल्यास अन्य कथांतील आशयसूत्रे अवतीभोवतीच्या स्त्रीजीवनाशी आणि तिच्या जीवनातील विविध समस्यांशी, ताण-तणावांशी निगडित आहेत. स्त्रीचे भावविश्‍व लेखकाने सहानुभावपूर्ण दृष्टिकोनातून समजून घेतले आहे. विशिष्ट व्यक्तींची आणि त्यांच्या कुटुंबाची जीवनकथा रंगविणार्‍या या कथांतील आशयाला प्रभावी स्वरूपाचे सामाजिक परिमाण लाभलेले आहे.

मतकरी हे विनोदी कथाकार म्हणून ओळखले जात नसले तरी ‘हसता हसविता’ हा विनोदी कथांचा संग्रह त्यांनी प्रसिद्ध केला आहे.
अशा प्रकारे मतकरी कथेची वेगवेगळी रूपे हाताळत नंतरच्या टप्प्यावर गूढकथेकडे येऊन ठेपले. तिथेच त्यांनी दृष्टी स्थिर केली. त्यांच्या गुणवत्तायुक्त कथालेखनाचा परामर्श घेताना गांभीर्याने विचार करायचा असेल तर गूढकथांचाच करावा लागेल.

मतकरींची पहिली गूढकथा ‘खेकडा.’ ही १९६५ साली अनंत अंतरकरांच्या ‘हंस’ मासिकात प्रसिद्ध झाली. त्याआधी गूढता किंवा रहस्यात्मकता समाविष्ट असलेल्या काही एकांकिका त्यांनी लिहिल्या होत्या. त्यानंतर मात्र त्यांनी गूढतेच्या माध्यमातून निर्मिती करण्यासाठी कथा हा साहित्यप्रकार निवडला. तो प्रथम प्रयोग त्यांनी केला ‘खेकडा’मध्ये. १९६५ पासून सातत्याने ते गूढकथा लिहीत राहिले. त्यांच्या दीडशेहून अधिक गूढकथा प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या गूढकथेत फँटसीची योजना असलेली मानसशास्त्रीय गूढकथा जशी आहे; तशीच वास्तवादी प्रकृतीची मानसशास्त्रीय गूढकथा आहे.
मतकरींच्या काही कथा या गुन्ह्याच्या कथा किंवा कूटकथा या प्रकृतीच्या आहेत. परंतु या जातीच्या कथांना अर्थाचे एकाहून अधिक पदर असू शकतात. अखेरच्या कलाटणीला कळीचे स्थान असलेल्या, अंतमुखी (एन्ड ओरिएन्टेड) घटनांच्या क्लृप्तीपूर्ण, चतुर बंधातून आकारणार्‍या, त्रिमिती पात्रचित्रणाचा वा व्यक्तिरेखांचा वापर न करता एखाददुसर्‍या ठळक स्वभावविशेषाच्या आधारे आकारणार्‍या पात्रांची निर्मिती करणार्‍या अशा गुन्ह्याच्या कथांचीही उदाहरणे सांगता येतील.

रत्नाकर मतकरी यांच्या गूढकथांचा समग्रतेने आणि सोदाहरण परामर्श मराठीतील ख्यातनाम समीक्षक डॉ. सुधा जोशी यांनी ‘कथा ः संकल्पना आणि समीक्षा’ या ग्रंथात ‘गूढकथा आणि रत्नाकर मतकरींची गूढकथा’ या स्वतंत्र प्रकरणात घेतला आहे. त्यांच्या गूढकथेचे सर्व स्वरूपविशेष त्यांनी अधोरेखित केले आहेत. त्यांच्या गूढकथांतील निवेदक आणि निवेदनपद्धती यांच्या प्रमुख विशेषांची नोंदही त्यांनी केली आहे. पात्राच्या व्यक्तिमत्त्वाच्या समग्रतेचे भान व्यक्त करणारे सूक्ष्म, व्यामिश्र किंवा अनेकपदरी असे पात्रचित्रण मतकरींच्या गूढकथांतून आढळते असे डॉ. जोशी म्हणतात. कथेतील निवेदकपात्र, भाववृत्ती, सांस्कृतिक परिसर, एकूण वातावरण, कथेची विशिष्ट प्रकृती इत्यादींनुसार बदलण्याची क्षमता, भिन्न भिन्न रूपे धारण करण्यातील लवचीकपणा हा मतकरींच्या भाषेतील एक श्रेयस्कर विशेष आहे हे त्यांनी नमूद केले आहे.

मोजक्या तपशिलांतून चित्र दृग्गोचर करणार्‍या त्यांच्या भाषाशैलीचे एक दोन नमुने येथे उद्धृत करता येतील ः
‘‘थोडा वेळ मी अंगणातच बसून राहिलो. समोरच्या झाडांच्या आकृती काळ्याशार होत गेल्या आणि आज आभाळही काळंभोर झालं होतं, त्याच्यात मिसळून गेल्या. क्वचित एखादी चांदणी झाडांच्या फटीतून लुकलुकत होती तेवढीच!

गार वार्‍याची झुळूक कुठूनशी आली. मला एकदम थरथरल्यासारखं झालं. काळोख चारी बाजूनी अंगावर चालून येतोयसं वाटलं. मी घरात गेलो.’’
गूढकथेत वातावरणनिर्मितीला किती महत्त्वपूर्ण स्थान असते हे दाखविणारे हे दुसरे एक क्षणचित्र ः
‘‘समुद्रावरही कसली हालचाल नव्हती. लाटा नव्हत्याच. नुसते शाईसारखे काळेभोर पाणी इकडून तिकडे पसरले होते. खंगलेली चंद्रकोर अभाळात उगवली होती. तिचा फिकट प्रकाश त्या काळ्या पाण्यावर एखाद्या कोडाच्या चट्‌ट्यासारखा उठला होता. पाणी किनार्‍याला भिडत होते तिथे अगदी कान देऊन ऐकले तरच ऐकू येईल असा चोरट्या कुजबुजीसारखा चुळुकचुळुक आवाज फुटत होता.’’

रत्नाकर मतकरी हे सव्यसाची साहित्यिक. अभिरूचिसंपन्न अशा वाङ्‌मयीन वातावरणात दीर्घकाळ ते व्रतस्थपणे वावरले. नाट्यक्षेत्र हे त्यांचे आवडते क्षेत्र. त्यांच्या सहजीवनात प्रतिभा मतकरी यांनी समर्थपणे साथ दिली. ‘दूरदर्शन’वर ‘शरदाचे चांदणे’ आणि ‘गजरा’ या कार्यक्रमाचे रत्नाकर मतकरी यांनी उत्तम प्रकारे संयोजन केले. ते उत्तम वक्ते होते. मराठीतील शांता शेळके, जी. ए. कुलकर्णी, व्यंकटेश माडगुळकर, व. पु. काळे, ज्ञानेश्‍वर नाडकर्णी, वसंत आबाजी डहाके आणि सदानंद रेगे यांनी साहित्यसाधना करीत असताना चित्रकलेचा छंद जोपासला. त्याचप्रमाणे रत्नाकर मतकरींनी रंग-रेषांचे विश्‍व आत्मसात केले. शब्दमाध्यमाबरोबर चित्रकलाही त्यांना अभिव्यक्तीचे माध्यम वाटले. अनेकांप्रमाणे चित्रकला त्यांनी आपल्या वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वात मुरवून घेतली आहे.

आपल्या जडणघडणीचा आलेख रेखाटणारे, नाट्यविषयक चळवळीतील अनुभवांविषयीचे, लेखनप्रवासाविषयीचे आणि आपल्यावर प्रभाव टाकणार्‍या व्यक्तींचा मागोवा घेणारे ‘आत्मनेपदी’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक रत्नाकर मतकरी यांनी लिहिले आहे.
रत्नाकर मतकरी आणि गोमंतभूमी यांचा दृढ अनुबंध होता. ते गोव्यात अनेकदा वाङ्‌मयीन उपक्रमांसाठी येऊन गेले आहेत. प्राचार्य गोपाळराव मयेकर यांचे ते जीवश्‍चकंठश्‍च स्नेही. त्यांचे एल्फिन्स्टन महाविद्यालयातील ते सहाध्यायी. ‘मज दान कसे हे पडले?’ या मयेकरसरांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनसोहळ्यासाठी ते आणि कवी-चित्रकार शांताराम पवार २६ मार्च २०१२ रोजी येऊन गेले. तीच त्यांच्याशी झालेली शेवटची भेट ठरली… त्या आठवणी संस्मरणीय आहेत… मयेकरसरांनी आपल्या आत्मचरित्रात आपल्या सुहृदाविषयी अत्यंत ममत्वाने लिहिले आहे.
रत्नाकर मतकरी यांच्या जाण्याने मराठी साहित्यजगतातील संपन्न व्यक्तिमत्त्व हरपलेले आहे… त्यांना विनम्र श्रद्धांजली.