Home बातम्या प्रतिकूलतेतून जन्मलेले ‘अवतार-रहस्य’

प्रतिकूलतेतून जन्मलेले ‘अवतार-रहस्य’

0

डॉ. सोमनाथ कोमरपंत

गोवा पारतंत्र्यात असताना ज्या प्रबोधनकारांनी विचारांची धुनी प्रज्वलित ठेवून स्वातंत्र्याची ऊर्मी निरंतर जागविली, त्यांच्यामध्ये दत्ताराम जगन्नाथ वर्दे बोरकर यांचे नाव अग्रगण्य स्वरूपाचे आहे. शतकानंतरही ज्या ज्वालाग्राही लेखनाची मौलिकता लोप पावलेली नाही, ज्या लेखनातून गतकाळातील स्वअस्तित्वाच्या रक्षणासाठी केलेल्या संघर्षाची तीव्रता कळते आणि आत्म्याची उत्कट स्पंदने कळतात, ते लेखन ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून आजच्या पिढीसमोर येणे अत्यावश्यक होते. हे आपले दायित्व आहे असे मानून डॉ. नितीन बोरकर यांनी आपल्या पणजोबांनी प्रतिकूल परिस्थितीत आणि परकीय राजवटीची तमा न बाळगता केलेले हे लेखन लोकांसमोर आणले. त्यांच्या या कायार्र्ला नामवंत कवी आणि अभ्यासक माधव बोरकर यांनी मौलिक सहकार्य केले. आजच्या संदर्भात या लेखनाचे महत्त्व काय आहे हे सूत्रमय शब्दांत अधोरेखित केले, याबद्दल या दोघांचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करायला हवे. ज्या पुस्तकाची नोंद गतेतिहासाच्या अभ्यासकांकडून आवर्जून होत होती; पण त्याची प्रत उपलब्ध नव्हती. जी दुर्मीळ प्रत उपलब्ध होती तिच्या आधाराने सर्वांगसुंदर पुस्तक वाचकांसमोर आणले. अच्युत पालव यांच्यासारख्या सुलेखनात निष्णात असलेल्या अक्षरतज्ज्ञाकडून आशयाला न्याय देणारे साधे पण अत्यंत प्रभावी मुखपृष्ठ करवून घेतले. हे सारे प्रशंसनीय आहे.

या पुस्तकाचा प्रथमावतार १५ डिसेंबर १९१० रोजी झाला होता. ५ ऑक्टोबर १९१० रोजी पोर्तुगालमध्ये राज्यक्रांती झाली. तेथे रिपब्लिकची स्थापना झाली. लोकशाही आली. लोकशाहीची द्वाही फिरताच वसाहतींमध्ये उत्साहाचे वारे संचारले. स्वातंत्र्याची सनद मिळविण्यासाठी नवसुशिक्षितांची पहिली पिढी किती उत्सुक होती, त्यांची मने कशी सेस्मोग्राफिकझाली होती, ते माशेलहून फोंडूशास्त्री करंडे यांच्या संपादनाखाली प्रसिद्ध होणार्‍या सत्संगया नियतकालिकातून प्रत्ययास येत होते. प्रस्तुत लेखन सत्संगमध्ये जुना इतिहासया सदरामध्ये प्रसिद्ध झाले. दशावतार रूपकांचा वापर करून तत्कालीन पोर्तुगीज व ब्रिटिश साम्राज्यशाहीवर दत्ताराम जगन्नाथ बोरकर यांनी जहाल स्वरूपाची टीका केली होती. ती सहन न होऊन ब्रिटिश सरकारने पोर्तुगीज सरकारवर दबाव आणून सत्संगचे प्रकाशन बंद केले.

दत्ताराम जगन्नाथ वर्दे बोरकर १८७६ मध्ये जन्मले आणि १९१३ मध्ये दिवंगत झाले. उणेपुरे सदतीस वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. पण अल्पायुष्यात त्यांनी मातृभूमीच्या मुक्तीसाठी भव्य, दिव्य, उदात्त आणि उत्कट जे स्वतःकडे होते ते निरपेक्ष भावनेने दिले. अशा अलक्षित पण महत्त्वाच्या व्यक्तींच्या बाबतीत नाही चिरा, नाही पणतीअसे होता कामा नये. त्यांच्यासाठी कृतज्ञतेचा कोपरा अंतःकरणात राखून ठेवायला हवा.

योगायोगाचा भाग असा की फोंडूशास्त्री करंडे यांचे जामात प्रा. . का. प्रियोळकर यांनी आपल्या संशोधनाद्वारा ज्वलंत विचारांचा वारसा कायम ठेवला. ख्यातनाम पत्रकार लक्ष्मीदास बोरकर हे दत्ताराम जगन्नाथ बोरकर यांचे नातू. ‘लोकसत्तादैनिकात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. गोव्याच्या स्वातंत्र्यसंग्रामात त्यांचा वाटा होता. ‘लोकसत्तामध्ये गोमंतकाच्या नंदनवनातहे वार्तापत्रही ते लिहायचे. पुढे ते नवप्रभाचे संपादक झाले.

दत्ताराम जगन्नाथ बोरकर यांच्या लेखणीद्वारा द्रष्टेपण प्रकट होताना दिसते. शतकानंतर त्यांच्या अवतार रहस्यावर दुसर्‍या आवृत्तीच्या रूपाने प्रकाश पडत आहे. त्यांचे विचार वाचत असताना प्रकर्षाने आठवण झाली ती धनंजय कीरांनी महात्मा फुले यांच्या चरित्रात काढलेल्या उद्गारांची ः

‘‘उंच वृक्षांना वार्‍याची दिशा चटदिशी समजते. त्याप्रमाणे खर्‍या थोर पुरुषांना नवविचारांची दिशा चटदिशी उमगते आणि त्यांकडे ते झुकतात.’’ त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जोसेफ मॉझिनींच्या चरित्रात त्यांचेच एक वचन उद्धृत केले आहे. ते अत्यंत मननीय आहे.

ढहेीश ुहे हर्रींश पे र्ींळीळेप; ींहशू शिीळीह. (ज्यांच्यापाशी दृष्टेपण नसते; ते नाश पावतात.)

दत्ताराम जगन्नाथ वर्दे बोरकर यांच्या व्यक्तिमत्त्वात राष्ट्रवादी विचारांचे स्फुरण होतेच होते. शिक्षणाविषयी त्यांना अत्यंत आस्था वाटत असे. तत्कालीन हिंदू समाजाचा अभ्युदय शिक्षणाद्वारेच होऊ शकेल असे त्यांना ठामपणे वाटत होते. स्त्रीशिक्षणाविषयी त्यांना विशेष आस्था होती. त्यांनी या सुधारणेची सुरुवात घरापासूनच केली होती. त्यांनी आपल्या बहिणीला शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले. फोंड्याला राष्ट्रीय विचारांचे शिक्षण देणारी संस्था १९११ मध्ये स्थापन झाली. या विचारांची गंगोत्री म्हणून वर्दे बोरकर यांनी केलेल्या या जागृतीकडे अंगुलिनिर्देश करता येईल. अशा छोट्यामोठ्या प्रयत्नांमुळे समाजाच्या नवनिर्मितीचा ओनामा होत असतो हे विसरून चालणार नाही. वर्दे बोरकर यांच्या या लेखनाचा स्फुल्लिंग अनुभवल्यानंतर काळकर्ते शि. . परांजपे यांच्या वक्रोक्तीपूर्ण शैलीची आठवण आल्यावाचून राहत नाही. धग तीच. तळमळ तीच. स्वातंत्र्यविषयक ओढ तीच. विचारांची प्रखरतादेखील तीच.

अवतार रहस्यया पुस्तकाच्या अंतरंगात प्रवेश करून त्यातील विचारांचे दर्शन संक्षेपाने घ्यायला हवे. लेखकाने समाजभान ठेवून हे लेखन केलेले आहे, हे प्रथमदर्शनी शीर्षकातून सूचित केलेले आहे. जनतेला प्रत्यक्ष जीवनात दुर्दैवाचे दशावतार भोगावे लागत असल्यामुळे पुन्हा एकदा भावुकपणे त्याने दशावतारांची कथा रंगवून सांगितलेल्या नाहीत. त्या रंगविणारी अन्य पुस्तके त्या काळात होती. त्या काळात ती अंधश्रद्धेने अधिक वाचली जात होती म्हणून आपला समाज गतानुगतिक राहिला. त्याने स्वत्व गमावले. त्यामुळे सत्त्व हरवले. हे मर्मदृष्टीने जाणून बुद्धिप्रामाण्यवादाच्या भक्कम पायावर उभे राहून दत्ताराम जगन्नाथ बोरकर यांनी अवतार रहस्याची मांडणी केली. त्यांनी नृसिंहावतार, वामनावतार, परशुरामावतार, रामावतार आणि कृष्णावतार हे पाचच अवतार आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी निवडले. यातून त्यांचे आरोप, आक्षेप आणि विवेक हे गुणविशेष प्रकट होतात. आत्मभानाशिवाय अशा गोष्टी घडत नसतात. म्हणूनच अवतार रहस्याची अपूर्वाई वाटते. आणि मुख्यतः त्यांचे आशयसामर्थ्य आहेच.

परित्राणाय साधुनाम् विनाशाय च दुष्कृताम्‌|

धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥

असे उद्गार भगवद्गीतेत काढणार्‍या योगेश्‍वर कृष्णाविषयी लेखकाने १८ पृष्ठे खर्ची घालावीत यातच खरी ग्यानबाची मेखदडलेली आहे. कृष्णाचे युगंधरत्व सज्जनांच्या रक्षणात आणि दुर्जनांच्या विनाशातच सामावलेले होते. गोमंतकीय जनतेला भोगाव्या लागलेल्या दीर्घकालीन कारावासातून मुक्त करणारा आणि महाभारतकालीन अर्जुनाला मानसिक द्वंद्वातून बाहेर काढून

तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्‍चयः|

असे आत्मनिर्भर वृत्तीने सांगणारा कृष्णच हवा होता.

परमेश्‍वराचे पृथ्वीतलावरील अवतरण आणि माणसाचे व्यक्तित्वाचे उन्नयन समांतर प्रक्रियेने घडत जाते तेव्हाच तो अवतार होतो, ही त्यामागची खरीखुरी संकल्पना. मानवतेच्या अभ्युदयासाठी वेळोवेळी उदयाला आलेली विभूतिमत्त्वे म्हणजे परमेश्‍वराचे आधुनिक काळातील अवतारच होते. मला वाटते दत्ताराम जगन्नाथ वर्दे बोरकर यांनी हे पुरतेपणाने जाणलेले होते. या जाणिवेतूनच अवतार रहस्यचा जन्म झाला. या संहितेची भाषा शतकापूर्वीच्या वाकवळणांची असेल. शैलीचा बाज जुना असेल. पण या लेखनाचा आत्मा अम्लान आणि रसरशीत आहे. या आत्मज्योतीची प्रस्फुरणे नव्या पिढीला प्राप्त परिस्थितीत नवी प्रेरणा देणारी ठरतील. ती पिढी निश्‍चितच वर्दे बोरकरांना दुवा देईल.

नृसिंहावताराच्या प्रारंभी लेखकाने राज्यक्रांतीची संकल्पना विशद केलेली आहे ती आजही मननीय वाटते ः

‘‘समाजाच्या व्यवहारावर देखरेख ठेवण्याकरिता लोक ज्या एका व्यक्तीची निवड करतात व तिचे हुकूम पाळण्यास संतोषाने तयार होतात, त्या व्यक्तीस राजा अशी संज्ञा आहे. लोकांनी एवढे अधिकार दिले असतील, तेवढे इतमामाने बजावीत आहे, तोपर्यंत राजाच्या वाटेस जावयाचे लोकांस कारण नसते, म्हणून ते तिकडे लक्ष देत नाहीत. परंतु अधिकार मदाने उन्मत्त होऊन राजे लोक आपल्या धन्याशींप्रजेशींप्रतारणा करू लागतात, तेव्हा लोकसंख्या त्या व्यक्तीकडून आपला अधिकार हिरावून घेण्याच्या प्रयत्नास लागते. ह्या प्रसंगी थोडाबहुत खटका उडाल्याखेरीज राहत नाही. ह्या प्रत्ययास राज्यक्रान्तिअशी परिभाषिक संज्ञा आहे.’’

त्यापुढचे त्यांचे प्रगल्भ चिंतन अधोरेेखित करावेसे वाटते ः

‘‘कालांतराने मिश्रित केलेले काल्पनिक नीर बाजूस काढून हंसवृत्तीने ऐतिहासिक सत्यरूपी क्षीर निवडून घेण्याचा प्रयत्न कोणी केला, तर प्रजापक्षाने राजसत्तेला पायांखाली दाबून ठेवण्याचे प्रयत्न जसे अर्वाचीन इतिहासात झाल्याचे आढळते, तसेच ते प्राचीन काळी झाल्याचे दिसून येईल. अर्वाचीन काय किंवा प्राचीन काय, मनुष्यस्वभाव येथून तेथून सारखाच.’’ हिरण्यकशिपू हा बलाढ्य राजा कसा होता, त्याला सुरुवातीच्या काळात लोकप्रियता कशी लाभली, पण पुढे मात्र प्रजापालनापेक्षा स्वतःच्या ऐषआरामाची गोडी कशी लागली आणि त्याची परिणती प्रजेचे शोषण करण्यात कशी झाली हे लेखकाने चिररुचिर शैलीत रंगविले आहे. हा आशय मुळातून आस्वादण्यासारखा आहे. त्यासाठी तपशिलाची आवश्यकता नाही.

‘‘जुलमी राजांस सत्य, न्याय, नीती सुचविणारे जे कोणी महापुरुष असतात, त्यांस अत्यंत पाप, मानहानि, दुःख सोसावे लागलें. रशियाच्या झारानें आपल्या राज्यांत जो अनर्थ चालविला होता व आहे, त्याच्या विरुद्ध कौंट टॉलस्टॉय यांनी ओरड चालविली, ह्या कारणाने त्यास अतिशय क्लेश सहन करावे लागले. उदार म्हटलेल्या इंग्रज सरकारच्या दरबारांत देखील रंजल्या गांजलेल्या हिंदी लोकांस नुस्ती शाब्दिक सहानुभूति दाखविल्याबद्दल मि. कीर हार्डीसाहेबांस परवा केवढा अपमान सहन करावा लागला, हे सर्वश्रुत आहे. अशीच गत त्यावेळी एका महापुरुषाची झाली. हा महापुरुष म्हणजे खुद्द हिरण्यकशिपूचा मुलगा प्रल्हाद होय. काय असेल ते असो. पण हा थोर पुरुष अगदी लहानपणापासून सुनीतिमान आणि प्रजापक्षाचे जें ध्येय त्याकडेच आपली चित्तवृत्ती देऊन चालणारा निघाला. प्रजापक्षाची कड घेऊन, आपल्या बापाने चालविलेल्या उघड जुलमाविरुद्ध याचे उद्गार निघू लागले.’’

या लेखाचा उपसंहार करताना लेखकाने ज्या प्रकारची मांडणी केलेली आहे त्यावर वेगळे भाष्य करण्याची आवश्यकता नाही ः

‘‘त्यावेळी कर्मधर्मसंयोगाने हिरण्यकशिपूनें प्रल्हादास म्हटलें. ‘ज्या राष्ट्रतेजाचा तूं एवढा बाऊ करून मजपुढें वर्णन करतोस, माझ्यासारख्या अद्वितीय पराक्रमी मनुष्याला देखील जे राष्ट्रतेज आहे कोठे, ते यावेळी मला दाखविन. एका लाथेसरसीं त्याचा चक्काचूर करून टाकतो पहा!’ दर्पोन्मत्त हिरण्यकशिपूने मोठ्या त्वेषाने उच्चारलेले हे शब्द प्रल्हादाने ऐकून ही आणीबाणीची वेळ आहे असे पाहून शांततेने आणि धिमेपणाने बापाला सांगितलें, ‘बाबा! असे अविचारी होऊ नका. ज्या राष्ट्रतेजाच्या ध्यानीं मी लागलों आहे, ते परम कल्याणदायक तेज तुमच्या लाथेने नाहीसे होणारे नाहीच, परंतु आपणास मला कदाचित अपाय घडेल. ते माझे राष्ट्रतेज सर्वव्यापी आहे. ते अमुकच जागी आहे व अमुकच जागी नाही, असे म्हणता येणार नाही. आपल्या या उच्छंखल वर्तनाने सध्या तर तें काष्टीं पाषाणीं देखील प्रकट होऊ शकेल.’’

या लेखनाचा रोख कुणीकडे आहे हे सांगण्याची मुळीच आवश्यकता भासत नाही. ‘वामनावतारहा लेखही असाच प्रभावी आहे. ‘‘राजा केवढाही जुलमी असला तरी भिक्षांदेही पक्ष सर्वकाळी सुखांतच असावयाचाराजा बळीसारखा जसा सढळ हाताचा असला की, त्यांच्या सुखास पारावार न राहायचा! बळीच्या राज्यांत हे लोक अतिशय सुखी होते. परंतु तितक्याच मानानें न्यायाची अपेक्षा करणारे लोक अत्यंत दुःखी होते. बळीचा दानधर्म नको, आणि त्याची अनियमित सत्ताही नको, असें हा पक्ष उघड म्हणत असे. ह्या पक्षांतील लोकांची संख्या थोडी होती, म्हणून उपेक्षेने त्यांस वामन म्हणत असत. तरी ते दृढनिश्‍चयी असल्यामुळे वाळूच्या कणांसारखे राजाच्या डोळ्यांत सलत होते.’’

लेखकाचे पुढील प्रतिपादन धिमेपणाने जनतेने पावले कशी टाकावीत याविषयी अचूक मार्गदर्शन करणारे आहे.

‘‘बेबंदशाहीमुळे खिळखिळा झालेला राज्यशकट ताज्या दमाच्या जमावाने नव्या परिस्थितींत ओढून आणताना पदोपदीं विचार करणे अशक्य आहे. त्यांतल्या त्यांत पहिली तीन पावले तर खोल विचार करून टाकावयाची असतात. पहिले पाऊल, म्हणजे काबीज केलेल्या मुलखाची अंतर्व्यवस्था, दुसरे बाह्यव्यवस्था, अर्थात, नव्या मुलखाशी संबंध असलेल्या इतर राष्ट्रांशी नवे तहनामे वगैरे करणे आणि तिसरे पाऊल म्हणजे, पेंचात सापडल्यामुळे ज्याने राज्यसूत्रे आपल्या हातून सोडून दिली त्या राजघराण्याचा बंदोबस्त करणे. ही तीनही पावलें किंवा कामें अत्यंत महत्त्वाची असतात. कांकीं, नव्या राज्याची बरीवाईट स्थिती ह्यांवर अवलंबून असते. नवा मुलुख काबीज करणारा दृरदृष्टी मुत्सद्दी ही कामें मोठ्या दक्षतेनें करितो.’’

शेवटी लेखकाने ही पावले टाकण्याचा इत्यर्थ सांगितलेला आहे तो महत्त्वाचा आहे. ‘‘सारांश ः वामनावतारकृत्य, म्हणजे फार प्राचीनकाळी एका बलाढ्य भूपतीकडून स्वराज्यसंपादन करण्यात राष्ट्रीय पक्षाने बजावलेली कामगिरी होय.’’

सुज्ञांस अधिक सांगणे नलगे.

परशुरामवतारया लेखात लेखकाने खुबीदारपणे प्रतिपादन केलेले आहे.. ‘‘हिरण्यकशिपु व बळी ह्यांना पदच्युत केल्यानंतर असुरपक्षीय मंडळींचा विध्वंस करण्याची जी हयगय हिंदी राष्ट्रीयांनी केली, तिची धारणा परशुरामाने केली. त्यायोगे हिंदी राष्ट्रास जी अनुपम राज्यपद्धती लाभली तिचे वर्णन रामायणकारांनी लोकांस श्रुत केले आहे. त्या वीराच्या कामगिरीचे विस्तृत वर्णन आपल्या जुन्या इतिहासात आहे ते मननीय आहे. फ्रान्स, अमेरिका इत्यादी प्रजासत्ताक राज्यांचे इतिहास ज्यांनी लक्षपूर्वक वाचले असतील, त्यांस परशुरामवतारकथा अत्यंत रमणीय वाटणार, यात संशय नाही.’’

वक्रोक्ती अलंकाराचे उत्तम उदाहरण म्हणून या विवेचनाकडे पाहता येईल. निरुपणात्मक पद्धतीने परशुरामचरित्राचा परामर्श लेखकाने घेतलेला आहे, तो राज्यकर्त्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा आहे. या लेखनामुळे परकीय सत्तेची झोप का उडाली याचे उत्तर या जहाल लेखणीत आहे. ‘रामावतारया लेखातील सुरुवातीचे विवेचन साधे, सरळ, प्रांजळ आणि प्रवाही आहे. ते प्रभावी तर आहेच आहे; त्याला जॉन स्टुअर्ट मिल यांच्या ऑन लिबर्टीया ग्रंथातील विवेचनासारखी मूलभूत चिंतनाची जोड आहे.

‘‘स्वतंत्र असणे हा मनुष्यप्राण्याचा निसर्गसिद्ध हक्क आहे. तो प्रतिबांधित झालेला त्याला आवडतच नाही. स्वतंत्र राहण्यात त्याला पराकाष्टेचे सुख वाटतें व पारतंत्र्याचा त्याला मनापासून कंटाळा असतो आणि दुर्दैववशात् ते प्राप्त झाले तर त्यापासून मुक्त होण्याचा प्रयत्न तो यथाशक्ती करीत राहतो.’’ प्राचीन काळातील रामरावणाच्या संघर्षाचे स्वरूप आणि प्राप्त परिस्थितीतील बलाढ्य परकीय सत्ता आणि असहाय्य जनतेची हतबलता यांचा संदर्भ जुळवून लेखकाने सुसंगतपणे जो इतिहासाचा मागोवा घेतला आहे तो मननीय आहे. मध्यंतरीच्या शिवछत्रपतींच्या लोककल्याणार्थ घडलेल्या कार्याचे यथार्थ मूल्यमापन त्याने केलेले आहे. काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदविलेली आहेत. ‘‘छत्रपतींच्या चरित्रांत रामायणाची जी थोडी झांक मारते, तिचे धोरण हेंच की, छत्रपतींचे राजगुरू रामदास हे होते. आणि त्यांचे आराध्य दैवत रघुवीर हे होते.’’ राज्यक्रांती यशस्वी झाली. अनिष्ट प्रवृत्तींचा निःपात झाला. रामराज्य अवतरले. हा आनंदक्षण लेखकाने प्रसन्न शैलीत टिपलेला आहे ः ‘‘राज्यक्रांति यशस्वी झाली. परकी राज्यसत्तेचा निःपात झाला तेव्हा सगळे भारत आनंदमय झाले. प्रजाजनांनी भारताची राज्यसूत्रे मोठ्या संतोषाने रघुवीरांच्या हातात दिली. आणखी त्या महावीराने प्रजाकार्य इतक्या दक्षतेने केले की, त्यास दुसरी उपमाच नाही. सागराला उपमा सागराची, तद्वत रामराज्याला उपमा रामराज्याची.’’

कृष्णाला उद्देशून डॉ. पु. . सहस्रबुद्धे यांनी माझे चिंतनया पुस्तकातील भगवान श्रीकृष्णया लेखात कौस्तुभ म्हटलेले आहे. भारतवर्षातील क्रांतिकारकांची परंपरा श्रीकृष्णासारख्या पूर्णपुरुषापासून झाली असावी. दत्ताराम जगन्नाथ बोरकरांच्या या लेखाविषयी यापूर्वीच सूतोवाच केलेले आहे. तोच धागा पकडून पुन्हा एकदा सांगावेसे वाटते की हा लेख म्हणजे अवतार रहस्यपुस्तकातील कौस्तुभहोय. तो तन्मयतेने लिहिला गेलेला आहे. शिवाय प्रमेयास झोंबी घेण्यात त्यांनी अपूर्व यश प्राप्त झालेले आहे. या लेखातील काही वाक्ये ठिणग्यांच्या स्वरूपाची आहेत. उदा. ‘‘अनियंत्रित राज्यपद्धतीचा भीषण थयथयाट चालू झाला, म्हणजे पुढे लागलीच भयंकर राज्यक्रांति असावयाची, हा व्यवहारशास्त्राचा एक अढळ सिद्धांत आहे. तो केव्हा अमलांत येईल हे राज्यकार्यकुशल मुत्सद्यांस चांगले समजते.’’, ‘‘राज्यक्रांति ही सुळावरची पोळीअसते. तीत आरंभापासून अखेरपर्यंत खून, मारामारी, रक्तपात असले भयंकर प्रकार असतात. ती यशस्वी झाली तर तर सुखोपभोग घ्यावयाला सापडतो हे खरे. तथापि, तसे घडून येईपर्यंत हालअपेष्टा भोगाव्या लागतात, त्या अत्यंत असह्य असतात.’’

लेखकाचे पुढील विवेचन नवीन शोधज्योतीसारखे वाटते. ते अंतर्मुख करणारे आहे ः ‘‘कृष्ण हा भयंकर किंवा गुप्त या शब्दांचा पर्याय आहे. कंसासारखा अत्यंत सुलमी राजा झाला, तेव्हा कृष्णावतार म्हणजे गुप्त राज्यक्रांती झाली.’’

कृष्णावतारानंतर जी समृद्धी आली. त्यानंतर अनाचार कसा घडला याचेही मनाला विषण्ण करणारे चित्र लेखकाने रंगविले आहे.

एकूणच या लेखातून लेखकाच्या समग्र जीवनसंचिताचे सारस्वरूप अनुभवायला मिळते. ‘‘जेव्हा दडपशाहीमुळे लोकधर्मास अर्थात प्रजेच्या हल्ल्यांस ग्लानी येते, तेव्हा मी अवतार धारण करतो, असे अभिवचन श्रीकृष्णांनी जगास केव्हाच देऊन ठेविले आहे. ते मिथ्या होणार नाही.’’ आत्मनिर्भर वृत्तीने दत्ताराम जगन्नाथ बोरकर यांनी केलेले विवेचन म्हणजे तिमिरयुगातील दीपस्तंभच होता.