दुसऱ्या महायुद्धातील जपानच्या पराभवाच्या ऐंशीव्या स्मृतिदिनाचे निमित्त करून चीनमध्ये नुकतेच एक भव्य लष्करी संचलन झाले. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्या निमित्ताने चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासमवेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन हे उपस्थित होते. अमेरिकेच्या वर्चस्वाला सदैव शह देत आलेल्या तिन्ही देशांच्या प्रमुखांनी अशा प्रकारे एकत्र येणे हे अत्यंत सूचक आणि प्रतिकात्मक आहे ह्यात शंका नाही. त्याच्या आधी नुकत्याच चीनमध्येच पार पडलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेमध्ये देखील शी जिनपिंग, पुतीन आणि नरेंद्र मोदी हे तिघे मिळून हास्यविनोद करत उभे असलेले जगाला दिसले होते. अशा गोष्टी ह्या निश्चितच प्रतिकात्मक असतात आणि त्यातून एक संदेश पोहोचवला जात असतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत हा संदेश व्यवस्थित पोहोचला आणि त्यांचा जळफळाटही झालेला दिसला. त्यांनी लगेच आपल्या ट्रूथ सोशल ह्या समाजमाध्यमावर लिहिले की हे अमेरिकेविरुद्ध कटकारस्थान करीत आहेत. ट्रम्प यांनी सध्या अवघ्या जगालाच शिंगावर घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. ज्या तऱ्हेने ते विविध देशांवर आयात शुल्क लादून त्यांच्याशी स्वतःला फायदेशीर अशा प्रकारचे व्यापारी करार करण्यास भाग पाडत आहेत आणि त्या दबावाला भीक न घालणाऱ्या देशांवर अव्वाच्या सव्वा आयात शुल्क लादत सुटले आहेत, ते पाहता अमेरिकेचे वर्चस्व मान्य न करता त्याला सतत आव्हान देत आलेल्या बड्या राष्ट्रांच्या प्रमुखांनी अशा प्रकारे प्रतिकात्मक रीतीने का होईना, एकत्र येणे ह्याला निश्चितच महत्त्व आहे. चीनने ह्या लष्करी संचलनामध्ये प्रथमच आपली अत्याधुनिक शस्त्रास्त्र सामग्री प्रदर्शित केली. म्हणजेच आपल्या लष्करी ताकदीचे प्रदर्शन घडवण्यासाठीच हे संचलन आयोजित केले गेले होते असे म्हणायला हरकत नाही, कारण अन्यथा चीनसारखा देश हा सदैव गुप्ततेच्या पोलादी पडद्याखाली दडलेलाच असतो. रशियाकडून कच्चे तेल खरेदी करून युक्रेन युद्धाला पैसा पुरवीत असल्याचा आरोप करून ट्रम्प यांनी भारतावर अव्वाच्या सव्वा आयात शुल्क लादले, मात्र, चीनला ते अजून केवळ इशाऱ्यांमागून इशारेच देत राहिले आहेत. चीनला त्यांनी तीन महिन्यांची मुदत दिलेली आहे. परंतु अमेरिकेच्या ह्या दडपणाला भीक घालण्याऐवजी अशा प्रकारे प्रादेशिक ऐक्य प्रस्थापित करून काटशह देण्याच्या दिशेने विविध पौर्वात्य देशांचे नेते प्रयत्नशील असल्याचे गेल्या काही दिवसांतील घडामोडींतून दिसते. शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेमध्ये देखील अमेरिकाविरोधी एकजूट निर्माण होत असल्याचे संकेत मिळाले. भले ह्या सगळ्या देशांमध्ये अंतर्गत विवाद आणि धुसफूस असेल, परंतु अमेरिकेसारख्या बड्या शत्रूशी सामना करायचा असेल तर आपसातील हे मतभेद दूर करून तात्पुरते का होईना आपण एकत्र यायला हवे हे भान रशिया काय, चीन काय, भारत काय, ह्या देशांना आहे. आता शी जिनपिंग पुतीन आणि किम यांच्यासह एकत्र आले. किमसारख्या नेत्याने आपला देश सोडून एखाद्या विदेशी देशाचा दौरा करणे ही दुर्मिळातील दुर्मीळ घटना आहे. खास बुलेटप्रुफ रेल्वेने ते रशियात दाखल झाले होते. जरी अद्याप औपचारिकरीत्या काही घोषणा झालेल्या नसल्या, तरी गरज भासल्यास एकत्र येण्याचे संकेत ह्या जवळिकीतून मिळू लागले आहेत. ट्रम्प यांचा जळफळाट होण्यास तेच कारण ठरले आहे. अमेरिकेच्या दबावनीतीचा उल्लेख चीनने काही दिवसांपूर्वी ‘बुलिंग’ म्हणजेच दादागिरी असा केला होता. ट्रम्प यांची एकूण रणनीती तीच राहिली आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत आयात शुल्काच्या आडून सर्व देशांना आपल्यापुढे वाकवण्याचा जो प्रयत्न ट्रम्प करीत आहेत आणि त्या देशांच्या बाजारपेठांमध्ये अगदी शेतीपासून दुग्धोत्पादनापर्यंतच्या क्षेत्रामध्ये घुसखोरी करून आपली अमेरिका पुन्हा महान बनवण्याचे जे स्वप्न पाहत आहेत, त्याला कुठे तरी पायबंद घालण्याची नितांत आवश्यकता आहे. अमेरिकेचे हित पाहण्याच्या नावाने संपूर्ण जगाचे अहित घडविण्याच्या दिशेने ट्रम्प यांची सातत्याने पावले पडत आहेत. लहरी राजाप्रमाणे ते वागत आहेत. एकटादुकटा देश अमेरिकेसारख्या महासत्तेविरुद्ध क्वचितच पाऊल उचलू शकतो. परंतु रशिया काय, चीन काय, भारत काय असे देश जर एकजुटीने उभे राहणार असतील तर त्यातून अमेरिकेची कोंडी करणे सहजशक्य ठरेल. त्यामुळे ही एकजूट घडवण्याच्या दिशेने सातत्याने काही घडामोडी घडत आहेत, ज्यामुळे जागतिक समीकरणे उलटीपालटी होऊ लागली आहेत. निष्ठा बदलू लागल्या आहेत. भारतासारख्या देशाला ह्या परिस्थितीत नेहरूंपासून चालत आलेली पारंपरिक अलिप्ततावादी नीतीच हितकारक ठरेल हे आता उमगू लागले आहे.

