बी. साई प्रणिथ, एच.एस. प्रणॉय, पी.व्ही. सिंधू यांनी फ्रेंच ओपन सुपर सीरिज स्पर्धेच्या दुसर्या फेरीत स्थान मिळविले आहे. प्रणिथने थायलंडच्या खोसित फेतप्राताब याला तीन गेममध्ये २१-१३, २३-२१, २१-१९ अशी धूळ चारली. हा सामना एक तास पाच मिनिटे चालला. दुसर्या फेरीत त्याचा सामना जपानच्या केंटो निशिमोतो याच्याशी होणार आहे. निशिमोतोने पहिल्या फेरीत मलेशियाच्या ली चोंग वेई याला नमवून धक्कादायक निकालाची नोंद केली.
प्रणॉयने द. कोरियाच्या ली ह्यून याच्यावर २१-१५, २१-१७ अशी मात केली. जर्मनीच्या फाबियन रॉथ याने सामना अर्ध्यावरच सोडल्याने किदांबी श्रीकांतला फारसे प्रयास पडले नाही. पहिल्या गेममध्ये ०-३ अशा पिछाडीनंतर रॉथ याने दुखापतीमुळे माघार घेतली. सिंधूला विजयासाठी कडवा प्रतिकार करावा लागला. परंतु, सामना तिसर्या गेमपर्यंत लांबणार नाही याची दक्षता तिने घेतली. मिश्र दुहेरीच्या पहिल्या लढतीत प्रणव जेरी चोप्रा व सिक्की रेड्डी यांना चौथ्या मानांकित तोेतोवी अहमद व लिलियाना नास्तिस यांनी २१-१५, २१-१२ असे हरविले होते.
अन्य भारतीयांचे निकाल ः पहिली फेरी ः अश्विनी पोनप्पा व सिक्की रेड्डी वि. वि. जेनी मूर व व्हिक्टोरिया विल्यम्स २१-१२, २१-१२, पारुपल्ली कश्यप पराभूत वि. अँथनी सिनिसुका २३-२१, १८-२१, १७-२१, सायना नेहवाल वि. वि. लिने होजमार्क २१-१४, ११-२१, २१-१०, मनू अत्री व सुमिथ रेड्डी पराभूत वि. व्लादिमीर इव्हानोव व इव्हान सोझोनोव ११-२१, १३-२१, पी.व्ही. सिंधू वि. वि. बिट्रिझ कोरालेस २१-१९, २१-१८

