आपल्या शपथेत ते म्हणाले, ‘मी प्रणव मुखर्जी देवाला साक्षी ठेऊन शपथ घेतो की, भारताच्या राष्ट्रपतीपदाला योग्य न्याय देऊन, माझ्या पात्रतेनुसार मी संविधान आणि नियम यांचे संरक्षण, सुरक्षा आणि बचावाचे कार्य करीन. तसेच भारताच्या लोक हितासाठी आणि समाजासाठी संपूर्णत: स्वत:ला वाहून घेईन’.
शपथविधी समारंभानंतर मावळत्या राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील यांच्यासह श्री. मुखर्जी यांनी स्थान ग्रहण केले. त्यानंतर त्यांना २१ बंदुकींची सलामी दिली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी इंग्रजीतून शपथ घेतली तसेच इंग्रजीतून आपले पहिले भाषण केले. नंतर उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी त्यांच्या भाषणाचा हिंदी अनुवाद वाचून दाखवला.
सोहळ्याला उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, सभापती मीरा कुमार, पंतप्रधान मनमोहन सिंग, मावळत्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील, विरोधी पक्ष नेते, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, मंत्री, खासदार, मुख्यमंत्री, राज्यपाल आदी उपस्थित होते.
तृणमुल कॉंग्रेस अध्यक्ष तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच रालोआतील घटक पक्ष जनता दल संयुक्तचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची उपस्थिती विशेष लक्षणीय ठरली.
दरम्यान, ओमिता पॉल यांची राष्ट्रपतींच्या सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली.
मावळत्या राष्ट्रपतींचा निवास तुघलक रोडवर
मावळत्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यासाठीचा बंगला पुणे येथे तयार होत असून तोपर्यंत त्या दिल्लीत तुघलक रस्त्यावर प्रतिष्ठीत भागात राहतील. याच भागात लालूप्रसाद यादव व शरद यादव यांचेही निवास आहेत. काल पंतप्रधान मनमोहन सिंग, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी आणि सर्व मंत्र्यांनी पाटील यांना निरोप दिला.
युद्धकाळ अजून संपलेला नाही
शपथ घेतल्यानंतर प्रणव मुखर्जींनी उपस्थितांना उद्देशून भाषण केले. युद्धकाळ अजून संपलेला नसून दोन जागतिक महायुद्धांनंतर, शितयुद्ध हे तिसरे विश्वयुद्ध होते आणि आता सध्या दहशतवादाचे चौथे महायुद्ध चालू असल्याचे ते म्हणाले.
दहशतवादाची सर्वात जास्त झळ भारताला पोचली आहे. त्याचे गंभीर परिणाम व विदारकता सर्वप्रथम भारतानेच जगाला पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. दहशतवादाविरुद्ध लढून आपला देश सुरक्षित ठेवणार्या लष्करी जवानांचा तसेच पोलीस फौजांचा आपणास अभिमान वाटतो असेही ते म्हणाले. भारताचे राष्ट्रपती हे भारताच्या तिन्ही फौजांचे प्रमुखही असतात.