– डॉ. सोमनाथ कोमरपंत
‘‘झेपावणार्या पंखांना क्षितिज नसतं; त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत येणारं आकाश असतं.’’ मानवतेचे निस्सीम उपासक बाबा आमटे यांच्या कवितेतील ही एक ओळ. ‘आकांक्षांना अस्मान ठेंगणे’ या उक्तीची आठवण करून देणारी ही आशयघन आणि अर्थपूर्ण ओळ. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर भारतीय वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकरांचा जीवनप्रवास न्याहाळताना आणि कर्तृत्वशक्तीचा आलोक पाहताना हे उद्गार त्यांना तंतोतंत लागू पडणारे आहेत असे जाणवते.
माशेल येथे १ जानेवारी १९४३ रोजी जन्मलेले रघुनाथ माशेलकर यांनी आपल्या कर्तृत्वसंपन्न जीवनाचा प्रवास आता परमोच्च बिंदूपर्यंत नेऊन भिडविला आहे. शून्यातून त्यांनी अभिनव सृष्टी निर्माण केलेली आहे. या देदीप्यमान यशाकडे पाहताना आपली मती कुंठित होते. प्रज्ञा आणि प्रतिभा यांचे संगमतीर्थ असलेल्या या वैज्ञानिकाचा जीवनालेख चढत्या श्रेणीने वृद्धिंगत होत राहिला. अखंडित परिश्रमांची मिती त्याला मिळाली. त्यांचे यश हे वैयक्तिक उन्नयनापुरते सीमित राहिले नाही. समष्टीच्या सौख्याचा तो उच्चबिंदू ठरला. मातीतून जन्मलेली माणसे बहुधा मातीला विसरतात. पण आपले पाय घट्ट मातीत रोवून, तिच्याशी इमान राखून गगनगामी उड्डाण जे करतात आणि भारतवर्षाच्या भावी कालाची रमणीय स्वप्ने पाहतात, त्यांना डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर या नावाने ओळखतात. सारी माणसे त्यांच्यासमोर नतमस्तक होतात. अमोघ वाणी आणि असामान्य कर्तृत्व यांचा स्वरसंगम त्यांच्या भावी व्यक्तिमत्त्वात आहे, ते डॉ. रघुनाथ माशेलकर १ जानेवारी २०१३ रोजी वयाची सत्तर वर्षे पूर्ण करीत आहेत. परिणतप्रज्ञ अवस्थेतील त्यांच्या आयुष्याच्या या महत्त्वपूर्ण बिंदूपाशी त्यांचे अंतःकरणपूर्वक अभीष्टचिंतन!
‘‘एकविसावं शतक हे माहिती आणि ज्ञानाचं शतक असणार आहे. खरोखर मनःशक्तीचंच हे शतक असणार आहे. अनादिकालापासून भारतीय मनःशक्तीने केव्हाच भौतिक आणि आधिभौतिक सृष्टीवर ताबा मिळवला आहे. केवळ याच कारणामुळे एकविसावं शतक हे भारताचं शतक असणार आहे… मानवी जीवन आणि निसर्ग यांतील सतत विकसित होत राहणारा सुसंवाद हे प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य राहिलं आहे आणि त्यातूनच मानवी कौशल्यांच्या व सामर्थ्याच्या अमर्याद विकासाची क्षमता आपल्याकडे आली आहे. सध्याच्या संघर्षाच्या काळामध्ये, आपल्या आत्मिक बळाचे सामर्थ्य ओळखणार्या भारतालाच अखेर एक महाशक्ती म्हणून पुढे येण्याची संधी आहे,’’ असे डॉ. माशेलकर उद्गारतात. भारतीयत्वाचे मर्म जाणणारी प्रज्ञाशक्ती, भारतीयांच्या पुरुषार्थाला आवाहन करण्याची प्रचंड क्षमता आणि वैज्ञानिकाचे बुद्धिवैभव यांचा समुच्चय त्यांच्या व्यक्तिमत्त्वात झालेला आहे. त्यांचा श्वास, ध्यास आणि अभ्यास भारताच्या उज्ज्वल भवितव्याशी निगडित आहे. त्यांच्या चिंतनशीलतेत या भूमीच्या सर्वंकष उन्नतीची बीजे दडलेली आहेत. स्वप्ने सामावलेली आहेत. अखंडित आशावाद आणि सकारात्मक अनुभूती यांमुळे त्यांच्या विचारांना सतेजता प्राप्त होते. ते ऐकत राहावेसे वाटतात. पण केवळ श्रवणभक्तीत आपली इतिकर्तव्यता नाही; आपण आता कार्यप्रवण झाले पाहिजे अशी अंतःप्रेरणा या विचारांद्वारे मिळते. डॉ. रघुनाथ माशेलकरांचे कर्तृत्वसंपन्न जीवन आणि त्यांची तेजस्वी विचारधारा यांत अद्वैत आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा आत्मप्रत्ययशील ओघ त्यांच्या वाणीतून अवतरत असतो. ‘घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिल्लांपाशी’ या जनाबाईंच्या उक्तीप्रमाणे डॉ. रघुनाथ माशेलकर आज आंतरराष्ट्रीय क्षितिजावर तळपत असले तरी गोमंतभूमीच्या अभ्युदयासाठी ते सदैव दक्ष राहतात. त्यांचा कीर्तिसूर्य आता मध्यान्ही तळपत आहे. पण हा भला माणूस एकान्तात चिंतन करणारा असला तरी लोकान्तातही तेवढाच रमतो. ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान या त्रिनेत्रांनी आजच्या गतिमान जगाकडे पाहता आले पाहिजे हे त्यांना उत्कटतेने वाटत असले तरी संस्कारक्षम वयात वाङ्मयाधिष्ठित मनोविश्वाने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिल्यामुळे त्याविषयी त्यांना कृतज्ञता वाटत आलेली आहे. त्यांच्या वक्तृत्वशैलीवर पूर्वसूरींचे संस्कार झालेले आहेत हे जाणवत राहते.
गोवा शासनाने डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या गोवा सुवर्णमहोत्सवी विकास आयोगाने आपल्या अहवालात २०३५ चा गोवा कसा असावा यासंबंधीची सप्तसूत्री मांडलेली आहे. सुरम्य, सुसंस्कृत, संतुलित, सुविद्य, समृद्ध, सुशासित आणि स्वानंदी गोव्याचे भावी काळातील एक कल्पनाचित्र या अहवालात रेखाटलेले आहे. डॉ. रघुनाथ माशेलकरांच्या द्रष्टेपणाचा प्रत्यय त्यातून आल्यावाचून राहत नाही. हा आराखडा तयार करताना त्यांनी विविध क्षेत्रांतील नामवंतांना पाचारण केले. गोव्याच्या विकासासंबंधी त्यांच्या काही संकल्पना होत्या. त्या साकार करण्यासाठी या अनुभवसंपन्न व्यक्तींच्या प्रज्ञा-प्रतिभेचा त्यांनी पुरेपूर वापर करून घेतलेला आहे, ही जमेची बाजू आहे. गोवा प्रदूषणविरहित राहावा, गोवा हे आदर्श राज्य व्हावे हा डॉ. माशेलकरांचा ध्यास आहे.
डॉ. रघुनाथ माशेलकरांचा आजवरचा खडतर जीवनप्रवास, त्यातील वाकवळणे, त्यांनी धीरोदात्त वृत्तीने टिकविलेली व्यासंगी वृत्ती, प्रयोगशाळेत अहर्निश कष्ट घेण्याची मानसप्रवृत्ती, भारताच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी कल्पकतेने टाकलेली दमदार पावले… हे सारे सारे आठवताना संघर्षमय परिस्थितीत आपले व्यक्तित्व उभे करणार्या त्यांच्या अभंग जिद्दीविषयी असलेला आदरभाव द्विगुणित होतो. आजच्या तरुण पिढीला मार्ग दाखविणारे ते दीपस्तंभ आहेत असे वाटत राहते.
डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या असामान्य कर्तृत्वाचा संक्षिप्त आलेख रेखाटण्यापूर्वी त्यांचा जीवनपट न्याहाळणे आवश्यक आहे. ज्या जिद्दीने त्यांनी आपले तेजोमय जीवन घडविले ती अतुलनीय स्वरूपाची. त्यांचा जन्म माशेल येथे एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील अनंत माशेलकर यांचे अकाली निधन झाले. छोट्या रघुनाथचे वय तेव्हा ६ वर्षांचे होते. त्यांची आई अंजनीबाई यांनी त्या कठीण प्रसंगी धीर न सोडता मुंबई गाठली. प्रथम त्या भावाकडे गेल्या. मध्यंतरी तेही वारले. नंतर स्वतः काबाडकष्ट करून मुलाला शिक्षण दिले. सतत प्रोत्साहन दिले. सुरुवातीपासूनच आपल्या मुलाने खूप शिकावे म्हणून त्या झटल्या. ‘जे काही शिकायचे ते शीक. घराचा विचार करू नकोस. एक वेळ पेज जेवली नाही तर कोणी मरत नाही, पण शिक्षणाशिवाय जीवनात अर्थ नाही’ हे त्यांनी मुलाला शिकविले. आईने केलेला हा मनःसंस्कार त्यांच्या आयुष्यात पथदर्शक ठरला. डॉ. रघुनाथ माशेलकर आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आधारस्तंभ बनून राहिलेल्या आपल्या आईविषयी कृतज्ञतेच्या भावनेने उद्गारतात ः ‘‘माझ्या आईने माझ्यातली शिक्षणाची आच सतत तेवती ठेवली. तिच्यामुळेच आज मी या स्थानावर आहे.’’ प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता मुंबईतील गिरगावच्या खेतवाडीतील देशमुख गल्लीतल्या एका चाळीतील खोट्याशा खोलीत माशेलकर आणि त्यांची आई राहायची. दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत असायची. आई छोटी-मोठी कामे करायची. दोघांचा घरखर्च चालवायची. माशेलकरांचे प्राथमिक शिक्षण म्युनिसिपालिटीच्या अप्पर खेतवाडी प्रायमरी स्कूलमध्ये झाले. बालपणापासूनच त्यांनी शालेय शिक्षणात आपली बौद्धिक चमक दाखविली. प्रत्येक परीक्षेत त्यांचा पहिला वर्ग कधी चुकला नाही. एवढे सारे असूनही माध्यमिक शाळेत प्रवेश घेताना मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले. त्या काळात मोठी रक्कम वाटावी असे एकवीस रुपये त्यांच्याकडे नव्हते. आईने तिच्यासारखीच छोटी-मोठी घरकामे करणार्या तिच्या मैत्रिणीकडून पैसे आणून माशेलकरांना माध्यमिक शाळेत घातले. आर्यन हायस्कूल, विल्सन हायस्कूल यांसारख्या मोठ्या शाळा तेथे होत्या, पण आर्थिक ऐपत नसल्यामुळे युनियन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. या खडतर दिवसांबद्दल डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणतात ः ‘‘त्या काळात शाळेतील आठवड्याच्या चाचणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तीन पैसे खर्च करून उत्तरपत्रिका न्याव्या लागत. हे तीन पैसे कुठून येणार याची चिंता लागलेली असायची.’’ शिक्षण अर्ध्यावर सोडावे असे खडतर प्रसंग त्या काळात खूप आले, पण त्यांची आई खंबीरपणे उभी राहिली. अशाही परिस्थितीत शिक्षकमंडळी चांगली भेटली. त्यांनी केवळ विषयांचे शिक्षण दिले नाही; आयुष्यभराचा ज्ञानाचा मार्ग दाखविला. सर्वांगीण विकासाकडे जातीने लक्ष पुरविले. वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा तेथे व्हायच्या. त्यांतूनच माशेलकरांना वक्तृत्व, लेखन आणि वाचन यांत प्रावीण्य मिळविता आले. तेव्हाचे सुर्वेसर आजही त्यांच्या स्मरणात आहेत. सहावीत असताना त्यांनी त्यांना १०० पैकी १०० गुण दिले आणि उद्गार काढले ः ‘‘हा मुलगा आयुष्यात काहीतरी करून दाखविणार.’’ सहावीत असतानाच त्यांना लिहायची आवड लागली. ‘बालमित्र’, ‘अमृत’, ‘नवल’ व ‘मंथन’ या मासिकांतूून लेखन करायला त्यांनी सुरुवात केली. या काळात त्यांनी नाथमाधवांच्या कादंबर्यांपासून बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्यकथांपर्यंत सगळ्या पुस्तकांचे वाचन केले. गिरगाव परिसर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या दृष्टीने समृद्ध. तेथे त्यांनी आचार्य अत्रे यांची व्याख्याने, विंदा करंदीकरांचे काव्यवाचन आणि सानेगुरुजी कथामालेचे कार्यक्रम यांचा मनमुराद आस्वाद घेतला.
युनियन हायस्कूलमध्ये झालेला त्यांचा प्रवेश त्यांच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरला. ती शाळा श्रीमंत नव्हती; पण तेथील शिक्षक ज्ञानाने आणि मनाने समृद्ध होते. तन्मयतेने ते शिकवायचे. भावेसरांसारखे डोळस वृत्तीने शिकविणारे शिक्षक त्यांना लाभले हा त्यांच्या आयुष्यातील भाग्ययोग ठरला. त्यांच्यामुळे माशेलकरांसारख्या जिज्ञासू, चौकस आणि चौफेर पाहणार्या विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेला खतपाणी मिळाले. ‘भिंगातून सूर्यकिरणे केंद्रित करून जाळता येते’ यासंबंधीचा प्रयोग करताना ते म्हणाले होते, ‘‘माशेलकर, तू तुझ्यातील ऊर्जा या सूर्यकिरणांसारखी एकत्रितपणे केंद्रित करू शकलास तर जगातील वाट्टेल ते जाळू शकशील.’’ गुरूने दिलेला हा मंत्र डॉ. माशेलकरांना आयुष्यातील प्रत्येक आव्हानाच्या क्षणी प्रेरणादायी ठरला. आंतरराष्ट्रीय क्षेत्रातदेखील शोधनिबंध सादर करताना डॉ. माशेलकर कृतज्ञतेने या बाबीचा आवर्जून उल्लेख करतात. त्यांच्या वैज्ञानिक दृष्टीला भावनात्मकतेचे मुळीच वावडे नाही. परिपूर्ण माणसाची जीवनशैली अशा वागण्यामधूनच पारदर्शक स्वरूपात प्रतिबिंबित होत असते. डॉ. माशेलकरांच्या अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्वाला राजमान्यतेबरोबर मोठ्या प्रमाणात जनमानसाकडून मान्यता मिळालेली आहे. याचे रहस्य या कृतज्ञताबुद्धीत आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पिंड सदैव समाजसन्मुख राहिला याचे मूळ त्यांनी बालपणापासून भोगलेल्या दुःख-व्यथांत आहे. आपल्यासारखे दुःख इतरांच्या वाट्याला येऊ नये, समाजात सम्यक सौख्य नांदावे यासाठी ते प्रयत्नशील असतात. व्यापक सहानुभूतीचे सक्रियतेत संक्रमण कसे होते याचा जीवनादर्श डॉ. रघुनाथ माशेलकरांच्या चरित्रात आणि चारित्र्यात पाहावा. इंग्रजीचे लाडसर, गणिताचे कोल्हटकर, संस्कृतचे गायतोंडे आणि मराठीचे मो. अ. जोशी माशेलकरांना युनियन हायस्कूलमध्ये लाभले. नववीत असताना त्यांनी ‘सुंठीवाचून खोकला गेला’ हे नाटकही लिहिले होते. त्याचे दिग्दर्शनही त्यांनीच केले होते. अकरावीत असताना प्रा. अनंत काणेकरांचे भाषण ऐकून त्याचे वृत्तान्तलेखन करण्याची स्पर्धा होती. त्या स्पर्धेत ते पहिले आले. स्पर्धेचे परीक्षक असलेले ‘विविध वृत्त’ नियतकालिकाचे श्री. चं. वि. बावडेकर यांनी त्यांना आपल्या मासिकासाठी बातमीदारी करण्याची नोकरी देऊ केली होती. याच वर्षी त्यांच्यासमोर शिक्षणाच्या बाबतीत आर्थिक अडचण निर्माण झाली होती. पण सुदैवाने ‘गोमंतक मराठा समाज’ या संस्थेने त्यांना शिष्यवृत्ती दिल्यामुळे अडथळा दूर झाला. मॅट्रिकच्या दिवसांत त्यांना छोट्याशा खोलीत निवांतपणे अभ्यास करणे शक्य नव्हते. यातून मार्ग काढण्यासाठी माशेलकर गिरगाव चौपाटीवरील दिव्याखाली अभ्यास करायचे. असे टाकीचे घाव सोसत त्यांना दिवस कंठावे लागले. अकरावीच्या परीक्षेत ११ व्या क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले. जीवनाच्या तेजस्वी पर्वाचा तो प्रारंभबिंदू ठरला. युनियन हायस्कूलमधील दिवस म्हणजे डॉ. माशेलकरांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीचा संस्मरणीय काळ.
माशेलकरांचे कष्टमय जीवन लक्षात घेऊन एका हितचिंतकाने त्यांना महाविद्यालयात प्रवेश करताना दोनशे रुपयांची मदत केली. ‘सर दोराबजी टाटा ट्रस्ट’कडून त्यांना दरमहा ६० रुपये अशी सहा वर्षांसाठी शिष्यवृत्ती मिळाली. ‘कोटाह शिष्यवृत्ती’ आणि ‘युडीसीटी’कडूनही शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर झाला. त्यांच्या शैक्षणिक यशाचा आलेख सतत वर्धिष्णू राहिला. जयहिंद कॉलेजमध्ये ते सर्वप्रथम क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले. इंटर सायन्सच्या परीक्षेत १०,००० विद्यार्थ्यांमध्ये द्वितीय क्रमांक त्यांनी प्राप्त केला. त्यांचे मित्र श्री. द्रविड यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या ‘केमिकल टेक्नॉलॉजी’ विभागातून ‘केमिकल इंजिनिअरिंग’चा कोर्स पूर्ण केला. इ. उहशा. ची पदवी मिळविली. तेथील प्रख्यात शास्त्रज्ञ प्रो. आर. कुमार यांच्या अध्यापनकौशल्याचा माशेलकरांच्या विचारसरणीवर मोठा प्रभाव आहे. माशेलकरांनी केलेल्या वेगळ्या कामाबद्दल ते आस्थेने विचारत, ‘नवं काय आहे? यात वेगळेपणा कुठं आहे?’ त्यामुळे त्यांच्या अंगच्या सर्जकतेला आणि संशोधक वृत्तीला पुरेसा वाव मिळाला. भारतातील प्रख्यात शास्त्रज्ञ प्रो. सी. एन. राव यांच्यासारखे निष्णात गुरू त्यांना लाभले. प्रो. एम. एम. शर्मा यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली त्यांनी चरीी ढीरपीषशी या विषयावर पीएच.डी.ची पदवी संपादन केली. ही पदवी प्राप्त झाल्यानंतरही माशेलकरांना त्यांच्या आईने परदेशात जाऊन अधिक प्रावीण्य मिळविण्यासाठी प्रोत्साहन दिले. इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ सॅलफोर्ड येथे दाखल होऊन त्यांनी पॉलिमर इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात मूलभूत स्वरूपाचे संशोधन केले. यांच्या शैक्षणिक यशाचा तो उत्तुंग टप्पा होता. १९७४-७५ साली त्यांना इंग्लंड- अमेरिकेतील नामांकित विद्यापीठांतून निमंत्रणे यायला लागली.
१९७५ मध्ये डॉ. बी. डी. टिळक यांनी त्यांना पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत सन्मानपूर्वक आणले. तेथील निदेशकाची सूत्रे त्यांनी हाती घेतली. नियोजनबद्ध आराखडा त्यांनी तयार केला. या देशातील महत्त्वाच्या प्रयोगशाळेला त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठेचे स्थान मिळवून दिले. वैयक्तिक यशापेक्षा संघशक्तीवर त्यांचा अधिक विश्वास आहे. भारतीय शास्त्रज्ञांच्या कर्तृत्वशक्तीबद्दल त्यांना कमालीचा विश्वास वाटतो. त्यांच्या भ्रातृभावामुळे गुरुत्वाकर्षणाने शास्त्रज्ञांची मांदियाळी एकत्र येते. आत्मविश्वासाने उभी राहते. राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात तन्मयतेने भाग घेते. पुण्याच्या वास्तव्यात त्यांनी या प्रयोगशाळेचा सर्वतोपरी विकास केला. परकीय चलन आणि पेटंट्स या दोन्ही पातळ्यांवर संस्थेने उज्ज्वल यश संपादन केले. भारतातल्या विविध प्रयोगशाळांमध्ये संशोधन करत असलेल्या संशोधकांनी आपले संशोधन सुरक्षित राहावे यासाठी जागतिक स्तरावर पेटन्ट घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन डॉ. माशेलकर करतात. शोधाचे श्रेय त्या-त्या शास्त्रज्ञाला मिळायला हवे याकडे त्यांचा कटाक्ष असतो. या संदर्भात त्यांनी हळदीच्या पेटंटची लढाई जिंकली ही बाब अधोरेखित करावीशी वाटते. आमचे पारंपरिक ज्ञान कोणत्याही अर्थाने कमी नाही हे त्यांनी हिरिरीने पटवून दिले. डॉ. माशेलकर या संघर्षमय परिस्थितीला उद्देशून ‘हळदीघाटची लढाई’ असे म्हणतात. तीच गोष्ट बासमती तांदळाची आणि कडुनिंबाची. त्यांचेही पेटंट त्यांनी जिंकले. त्यामुळे भारतीयांचे मनोबल वाढले; शिवाय आपल्या हक्कांची संपूर्ण जाणीव भारतीयांना व्हायला मदत झाली. या प्रख्यात प्रयोगशाळेचे संचालकपद त्यांनी १९८९ ते १९९५ पर्यंत भूषविले. या कालावधीत वैज्ञानिक क्षेत्रात आधुनिक भारताच्या उज्ज्वल भवितव्याची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. तेथील कार्यप्रणालीत त्यांनी आमूलाग्र बदल घडवून आणला. युरोप-अमेरिकेतही माहितीची निर्यात करण्याचे भारतीयांचे स्वप्न आता त्यामुळे साकार झालेले आहे. आज आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपन्या या प्रयोगशाळेतील उत्पादनांचा आणि सेवेचा लाभ घेताहेत.
१९९८ मध्ये ‘कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च’ (सी.एस.आय.आर.) या जगातील औद्योगिक संशोधन आणि विकास संस्थांच्या सर्वांत मोठ्या साखळीचे महासंचालकपद डॉ. रघुनाथ माशेलकरांना प्राप्त झाले. हा त्यांच्या वैज्ञानिक जगतातील प्रदीर्घ आणि संपन्न अनुभवाचा सन्मान होता आणि त्यांच्या कर्तृत्वशक्तीला मिळालेले व्यापक क्षेत्र होते. सुयोग्य व्यक्तीला मिळालेले ते सुयोग्य क्षेत्र होते. मिळालेल्या सुवर्णसंधीचा त्यांनी समुचित उपयोग केला आणि प्रत्येक क्षण राष्ट्रनिर्मितीसाठी वेचला. प्रखर बुद्धिमत्ता, खळाळते चैतन्य आणि अखंड उपक्रमशीलता हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे स्थायिभाव सतत वास्तवाभिमुख राहून, आशावादी दृष्टिकोन बाळगून आत्मविश्वासाने ते संशोधनप्रक्रियेत मग्न राहिले. राष्ट्रीय समस्यांचे प्रगल्भ आकलन असल्यामुळे प्राधान्याने त्यांची उकल करण्याचा त्यांनी आत्मनिर्भर वृत्तीने प्रयत्न केला. त्यांच्या नेतृत्वाखाली ३९ प्रयोगशाळा आणि २३ हजार कर्मचारी कार्यरत राहिले. सारस विमान मलेरियावरील औषध आणि अमूल बालान्न इ. उत्पादनांच्या तंत्रविकासात डॉ. माशेलकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली सी.एस.आय.आर.ने नेत्रदीपक यश प्राप्त केले. त्यासाठी त्यांचा द्रष्टेपणा उपयुक्त ठरलेला आहे. राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यावरण, परिसर, अर्थशास्त्र, समता आणि नीतिमूल्ये या पाच गोष्टींचा समतोल साधण्याची गरज आहे असे डॉ. माशेलकरांना वाटते. समता आणि नीतिमूल्ये यांच्याकडे दुर्लक्ष करून निव्वळ आर्थिक विकास साधणे योग्य ठरणार नाही अशी त्यांची धारणा आहे. त्याचप्रमाणे परिसर आणि पर्यावरण यांकडे दुर्लक्ष करून आर्थिक प्रगती साधणे हेही उचित ठरणार नाही असे त्यांना वाटते. त्यांच्या दृष्टीने मानवकेंद्रित विकासाची ही कोनशिला आहे. सी.एस.आर.चे महासंचालक झाल्यावर त्यांनी उडखठ २००१ : तळीळेप रपव डींीरींशसू हा कार्यक्रम हाती घेतला. संशोधनाच्या माध्यमातून ज्ञानाचे- माहितीचे रूपांतर संपत्तीत आणि पर्यायाने समाजाची- राष्ट्राची प्रगती हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते. १९९८ साली डॉ. माशेलकरांना ‘शांतिस्वरूप भटनागर’ हा वैज्ञानिक क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला. तो प्रदान करताना भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते ः
‘‘डॉ. माशेलकर हे निव्वळ भारतातील प्रतिभावान शास्त्रज्ञच नाहीत तर ते उत्तम विज्ञान प्रशासकही आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सीएसआयआरमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे आणि संस्थेला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे जागतिकीकरणामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांचा सामना करण्याची क्षमता निर्माण झाली आहे.’’
डॉ. माशेलकरांना त्यांच्या द्रष्टेपणाबद्दल खुल्या दिलाने दिलेली ही दाद आहे. या परिणतप्रज्ञ वैज्ञानिकाच्या व्यक्तिमत्त्वाचे काही महत्त्वपूर्ण पैलू डोळ्यांसमोर तरळतात.
– ते विज्ञान-तंत्रज्ञानाला नवी दिशा देणारे वैज्ञानिक आहेत.
– व्यवस्थापनाच्या माध्यमातून त्यांनी आजवर विज्ञान अधिकाधिक लोकाभिमुख केले आहे.
– ते सदैव भारतातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणारे आहेत.
– येथील तळागाळातील समाजाच्या उन्नतीचा ते विचार करणारे आहेत.
– भारतीयांच्या बौद्धिक क्षमतेवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे.
– येथील ज्ञानाचे अर्थपूर्ण नियोजन करण्याचे द्रष्टेपण त्यांच्याकडे आहे.
या दृष्टीने त्यांच्या प्रदीर्घ चिंतनातून साकार झालेले नवे पंचशील संक्षेपाने अधोरेखित करावेसे वाटते. मानवकेंद्रित विकासाचे मूलतत्त्व विशद करताना त्यांनी दोन बाबींकडे अंगुलिनिर्देश केलेला आहे तो म्हणजे जगातील वाढत्या लोकसंख्येचा आणि पृथ्वीवरील सर्व मानवांना उत्तम दर्जाचे जीवन देण्याच्या पृथ्वीच्या क्षमतेचा. भारतात सध्या नियोजनाची पद्धत केंद्र सरकारकडून ग्रामपंचायत पातळीकडे अशा रीतीची आहे. ती बदलून नियोजनात स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग हवा. निसर्गाला, गरिबांना आणि स्त्रियांना प्राधान्य देणारी रोजगार निर्मितिक्षम आर्थिक वाढ हे आपले उद्दिष्ट हवे. एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर उत्पादन झालं पाहिजे आणि लोकांच्या सहभागातून लघुक्षेत्रातही मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले पाहिजे. मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले तर जागतिकीकरणाच्या जमान्यात ते परवडू शकेल आणि उत्पादन छोट्या-छोट्या क्षेत्रात झाले तर रोजगार वाढू शकेल असे डॉ. माशेलकर यांना वाटते.
युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती असल्यामुळे युवाशक्तीला आकार दिल्यास देशाची प्रगती निश्चित होईल असा आशावाद डॉ. माशेलकरांनी बाळगलेला आहे. हा केंद्रबिंदू कल्पून विद्यार्थिकेंद्रित शिक्षणाची संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. यासाठी सद्यःकालीन शिक्षणप्रणाली बदलायला हवी असे त्यांना वाटते. घोकंपट्टीवर भर देणारी शिक्षणपद्धती बदलून प्रत्यक्ष प्रयोगांवर भर देणारी, ज्ञानाचा- माहितीचा ‘शोध’ घेणारी पद्धती हवी असे त्यांना वाटते. शास्त्रीय विषयांच्या अभ्यासक्रमात स्थानिक निसर्ग, माती, फुले, फळे, सामाजिक-आर्थिक समस्या यांचा अंतर्भाव असावा. यातून त्यांच्या अभ्यासाला वेगळे परिमाण मिळेल. या संदर्भात संगणक उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार संगणकाच्या साहाय्याने त्यांचे मूल्यमापन करावे. नवी पिढी व्यक्तिमत्त्वसंपन्न आणि कल्पनाशक्तीने बहरलेली असावी. म्हणजे ती येत्या शतकाला स्वतःच्या कर्तृत्वाने उजळून टाकेल असा त्यांना विश्वास वाटतो.
आपल्या स्वप्नातील भारताची उभारणी करायची असेल तर स्त्रियांना राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात समानतेच्या तत्त्वावर सहभागी करून घ्यायला पाहिजे. तिच्या कर्तृत्वाला पूर्णपणे वाव द्यायला पाहिजे, असे डॉ. माशेलकरांना वाटते. माहिती तंत्रज्ञान आणि संगणक क्षेत्रातील प्रगती यामुळे स्त्रियांना ज्ञानक्षेत्र फार मोठ्या प्रमाणात खुले होण्याची शक्यता डॉ. माशेलकरांना वाटते. म्हणून ‘स्त्रीकेंद्रित कुटुंब’ ही संकल्पना त्यांनी आपल्या नव्या पंचशीलात मांडलेली आहे. स्त्रियांना सन्मानाचे स्थान मिळायचे असेल तर उद्योजकतेची कौशल्ये त्यांना शिकवायला हवीत आणि त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणे आवश्यक आहे असे त्यांना वाटते. कुटुंबाच्या केंद्रस्थानी स्त्री स्थानापन्न होऊ शकली तर खर्या अर्थाने समाजातील लोकशाहीचे लघुरूप अस्तित्वात येईल असेही त्यांना वाटते. डॉ. माशेलकरांना आपल्या आईच्या रूपाने आत्मविकासाच्या प्रक्रियेत हा प्रत्यय आलेला आहे.
‘ज्ञानावर आधारित समाजनिर्मिती’ या संकल्पनेचा पुरस्कार डॉ. माशेलकरांनी केलेला आहे. ‘आपण जे काही करतो ते का करतो, त्याचा उद्देश काय हे ज्याला समजते तो ज्ञानोपासक’ अशी व्याख्या डॉ. माशेलकर यांनी केलेली आहे. भारतातील ग्राहकदेखील ज्ञानोपासक झाला पाहिजे असे त्यांना वाटते. ‘सर्वांसाठी ज्ञान’ हे आपले उद्दिष्ट हवे अशी त्यांची धारणा आहे. माहिती आणि विज्ञानाचा वापर करून उद्योग-व्यापार-रोजगाराचा विकास; पारंपरिक अनुभवसिद्ध ज्ञानाला विज्ञानाची जोड आणि विज्ञानाच्या कक्षेबाहेरचे वाटणारे अध्यात्म आणि विज्ञान यांचा परस्पर संबंध तपासणे या तीन गोष्टींचा संगम साधला तर ज्ञानाधारित समाजाची निर्मिती करणे अशक्य नाही अशी मांडणी डॉ. माशेलकर यांनी केली आहे.
नवनिर्मितीवर भर देणार्या भारताचे मानस डॉ. माशेलकरांनी आपल्या नव्या पंचशीलात प्रकट केले आहे. संशोधनाचा आणि नवनिर्मितीचा ध्यास बाळगल्याशिवाय ज्ञानाला किंमत नाही. कारण संशोधनामुळे ज्ञानाचे रूपांतर संपत्तीत आणि सामाजिक उन्नतीत होते असे त्यांना वाटते. संशोधक निर्माण करण्यासाठी आपल्याला साक्षरता, विज्ञानाचे शिक्षण, सामाजिक जाणिवेची जागृती, माध्यमांचा वापर आणि विज्ञानामध्ये संशोधक वृत्तीचा वापर या सर्व आघाड्यांवर कार्यरत व्हावे लागेल असे डॉ. माशेलकर सुचवितात. तंत्रज्ञानविकासाचे त्यांनी तीन प्रकार विशद केलेले आहेत.
संशोधक हे फक्त प्रयोगशाळेत नसतात. ते शेतात, कचेरीत, खेड्यात, घरात, रस्त्यात सर्वत्र असतात असे निरीक्षण डॉ. माशेलकर नोंदवितात. त्यासाठी संशोधक हेरण्याची आपल्याला दृष्टी हवी असे ते सांगतात. संशोधनसन्मुख समाज निर्माण करणे ही आजच्या काळाची गरज आहे असे त्यांना वाटते.
भावी काळात ज्ञानसंपदेने समृद्ध असा भारत व्हावा हे डॉ. रघुनाथ माशेलकरांचे जीवनस्वप्न आहे. भारत ही भविष्यकाळातील महासत्ता आहे हे ते पुनःपुन्हा अधोरेखित करीत आलेले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच आयुर्वेद आणि त्यासाठी भारतात उपलब्ध असलेली औषधी वनस्पती यांचे महत्त्व त्यांनी वेळोवेळी प्रतिपादन केलेले आहे. असा हा परंपरा आणि नवता यांचा सुमेळ साधणारा द्रष्टा वैज्ञानिक आहे. भारतातील आणि परराष्ट्रांतील चौदा विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय पदवी देऊन गौरविले आहे. राष्ट्रउभारणीचे विधायक कार्य केल्याबद्दल त्यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ (१९९१) आणि ‘पद्मभूषण’ (२०००) या किताबांनी गौरविले आहे. आपल्या गोवा शासनाने त्यांना नुकताच ‘गोमंतभूषण’ हा पुरस्कार जाहीर केलेला आहे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्षितिजावर तळपणार्या या तेजस्वी आणि वर्धमान वैज्ञानिकाच्या ७० व्या वाढदिनी हार्दिक शुभेच्छा!

