रस्ता रुंदीकरणाचा बांधकामावर परिणाम होणार नाही. लोकांची घरे वाचवूनच रस्त्याचे रुंदीकरण होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. बांधकामे पाडावी लागत असल्यामुळेच रुंदीकरणाचे काम रखडले, असे ते म्हणाले. घरे पाडणार नसल्याने या प्रकल्पास अडथळा येणार नसल्याचे पर्रीकर म्हणाले.
मोप विमानतळ प्रकल्पासाठी सहापदरी मार्गाची गरज असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. मोपचे काम बंद ठेवलेले नाही. पर्यावरण परिणाम अहवाल आल्यानंतरच पुढील परवाने मिळविण्याचे काम सुरू होईल. मोप विमानतळ केवळ प्रवाशांवर अवलंबून नसेल. कार्गो व्यवसाय, विमान पार्कींग, विमान दुरुस्ती, व्यापार प्रकल्प यामुळे प्रकल्प फायदेशीर होऊ शकेल. दाबोळी विमानतळ चालू राहील याचा विचार करूनच कंपन्यांना निविदा भरण्यासाठी पुढे यावे लागेल.
या प्रकल्पाला आपले सरकार जमीन वगळता अन्य काहीही देऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. नियमानुसार सर्व कामे चालू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.