मायणा कुडतरी पोलीस स्थानकात चौघांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी काल दोन पोलीस उपनिरीक्षकांना निलंबित केले. गौरव नाईक व संकेत नाईक अशी या दोन उपनिरीक्षकांची नावे आहेत. या प्रकरणात दोन दिवसापूर्वी पोलीस कॉन्स्टेबल चेतन कोळी यांना निलंबित केले होते. त्यानंतर हेड कॉन्स्टेबल समीर सुधीर व कॉन्स्टेबल पुंडलिक परीट या दोघांना निलंबित केले होते. या प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना
निलंबित केले आहे.
सदर चारही तरुणांच्या वतीने ॲड. लिवोना बार्रेटो यांनी यांनी मायणा-कुडतरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्यात घटनेस जबाबदार पोलिसांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.
6 जूनच्या रात्री रामनगरी-नेसाय येथे दोन गटांमध्ये झालेल्या मारहाणीनंतर पोलिसांनी सदर चौघांना ताब्यात घेतले होते. तक्रारीनुसार, ज्या पोलिसांनी मारहाण केली, ते मद्याच्या नशेत होते. त्यांनी त्या तरुणांना पोलीस स्थानकाच्या विश्रामखोलीत नेत कपडे काढले. तसेच त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना शिव्या दिल्या, बेदम मारहाण केली आणि सुटका करण्यासाठी पैसे मागितले. सदर पोलीस फुटबॉल खेळण्यासाठी गेले होते, तेथून ते मद्यधुंद अवस्थेत पोलीस स्थानकात परतले. त्यावेळी त्यांच्या अंगावर पोलीस गणवेश नव्हता, तर फुटबॉलची जर्सी होती. त्या पोलिसांनी रात्री 10 ते पहाटे 3 वाजेपर्यंत चौघांना मारहाण केली. यानंतर सकाळी 9 वाजता त्यांना सोडून देण्यात आले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
मानवाधिकार आयोगाकडून दखल
या प्रकरणी मानवाधिकार आयोगाने स्वेच्छा दखल घेऊन दक्षिण पोलीस अधीक्षक व मायणा कुडतरी पोलिस निरीक्षक यांना बुधवार दि. 17 जून रोजी सकाळी 10.30 वाजता चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

