पोलीस महासंचालकांवर आमदार विजय सरदेसाईंची जोरदार टीका

0
24

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, आमदार विजय सरदेसाई यांनी राज्याचे पोलीस महासंचालक डॉ. जसपाल सिंग यांनी समाजमाध्यमातून केलेल्या गैरवर्तनाबाबत नापसंती व्यक्त केली आहे. आपण लोकप्रतिनिधी आहे. आपण काय बोलावे आणि काय नाही याबाबत पोलीस महासंचालक सांगू शकत नाही. राज्यातील पोलीस दल नैतिक आणि आर्थिक बाबतीत भ्रष्ट बनले आहे. पोलीस खात्यातील भ्रष्टाचाराची यादीच देऊ शकतो. पोलीस महासंचालकांनी लोकप्रतिनिधीला समाज माध्यमावर दिलेल्या उत्तराची राज्याचे गृहमंत्र्यांनी योग्य दखल घ्यावी. अन्यथा, केंद्रीय गृहमंत्र्याकडे तक्रार करण्याचा इशारा आमदार विजय सरदेसाई यांनी गोवा फॉरवर्डच्या मुख्यालयात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत काल दिला.

तेलंगणा पोलिसांनी अमलीपदार्थप्रकरणी केलेल्या एका कारवाईनंतर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, आमदार विजय सरदेसाई यांनी गोव्यातील अमलीपदार्थाविषयी एक संदेश समाजमाध्यमावर जारी केला होता. आमदार सरदेसाई यांचा सल्ला अवांच्छित असल्याचे उत्तर महासंचालक डॉ. जसपाल सिंग यांनी दिल्याने आमदार सरदेसाई भडकले आहेत. जेव्हा काही चुकीचे निदर्शनास आणले जाते, तेव्हा पोलीस महासंचालकांनी त्याला सभ्य उत्तर द्यायला हवे होते. चांगले मुद्दे, चूक निदर्शनास आणून देण्यासाठी आम्हांला लोकांनी निवडून दिले आहे. पोलीस महासंचालक नागरिकांशी अशा प्रकारचे असभ्य वर्तन करू शकत नाहीत, असेही सरदेसाई यांनी सांगितले. पोलीस महासंचालक सिंग यांना गोवा पोलिसांची प्रतिमा डागाळण्यात येत असल्याचे वाटत असल्यास त्यांनी तेलंगणा पोलिसांवर मानहानीचा खटला दाखल करावा, असे आव्हान आमदार सरदेसाई यांनी दिले.