पोलीस अधीक्षक एडविन कुलासो यांचे निलंबन

0
9

पोर्तुगीज पासपोर्ट आणि दुहेरी नागरिकत्व प्रकरणी कारवाई

राज्य सरकारच्या दक्षता खात्याने पोलीस खात्याच्या दहशतवादी विरोधी विभागाचे पोलीस अधीक्षक एडविन कुलासो यांना पोर्तुगीज पासपोर्ट आणि दुहेरी नागरिकत्व प्रकरणात काल निलंबित केले.

एडवीन कुलासो यांनी पोर्तुगाल येथे 2008 मध्ये जन्म नोंदणी आणि 2009 मध्ये विवाह नोंदणी केल्याचे समोर आले आहे. कुलासो यांच्याकडे पोर्तुगीज पासपोर्ट असल्याचे आढळून आले आहे. आता, दक्षता खात्याकडून कुलासो यांची सखोल चौकशी केली जाणार आहे.
काशिनाथ शेट्ये यांनी काही वर्षांपूर्वी पोर्तुगाल येथे जन्म नोंदणी केलेल्या अनेक सरकारी अधिकारी, राजकीय नेते व इतरांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यात पोलीस अधीक्षक एडविन कुलासो यांच्याही नावाचा समावेश होता.

दरम्यान, दुहेरी नागरिकत्व प्रकरणात सहभागी असलेल्या सर्वांची चौकशी करावी. निवडक अधिकाऱ्यांना टार्गेट करू नये, अशी मागणी काशिनाथ शेट्ये यांनी काल पत्रकारांशी बोलताना केली.