पोलिसाच्या गोळीबारात जखमी ओडिशाच्या आरोग्यमंत्र्यांचा मृत्यू

0
6

पोलीस उपनिरीक्षकाच्या गोळीबारात जखमी झालेले ओडिशाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री आणि ज्येष्ठ बिजू जनता दलाचे (बीजेडी) नेते नबा दास यांचे काल उपचारादरम्यान निधन झाले. पश्चिम ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यात काल ब्रजराजनगरमध्ये दिवसाढवळ्या एका कार्यक्रमादरम्यान सहाय्यक उपनिरीक्षकाने नबा दास यांच्यावर गोळीबार केल्याने ते गंभीर जखमी झाले होते.

60 वर्षीय नबा दास हे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गांधी चौकात आपल्या कारमधून उतरत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोपाल दास यांनी त्यांच्यावर पॉइंट ब्लँक रेंज रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते.

नबा दास यांच्या छातीवर डाव्या बाजूला गोळ्या लागल्या होत्या. तसेच उपनिरीक्षकाने रिव्हॉल्व्हरमधून झाडलेल्या काही गोळ्या शेजारी असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला लागल्याने तोही जखमी झाला होता. या घटनेनंतर दास यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी नबा दास यांना एअरलिफ्ट करून भुवनेश्वरला हलवण्यात आले होते; मात्र काल रात्रीच उपचारादरम्यान निधन झाले. या प्रकरणी पोलिसांकडून सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.