पोलिसांना चकवत गोमेकॉतून चोरट्याचे पलायन

0
4

>> पहाटे 3 वाजता काढला पळ

>> पोलिसांची लूकआऊट नोटीस जारी

आरोग्य तपासणीसाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळात दाखल करण्यात आलेला संशयित चोरटा पी. रमेश (50) याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढल्याची घटनाकाल शुक्रवारी पहाटे 3 च्या सुमारास घडली. चारचाकी वाहनातून लाखो रुपयांच्या चोरी प्रकरणी हवा असलेल्या संशयित चोरटा पी. रमेश याला गुरुवार (दि. 27 एप्रिल) तक्रारदाराने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. नंतर पोलिसांनी संशयित पी. रमेश याला अटक करून आरोग्य तपासणीसाठी प्रथम दाबोळी चिखली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला गोमेकॉत नेले होते. तेथून पी. रमेश याने पलायन केले. वास्को पोलिसांनी संशयीत आरोपी पी. रमेश (वय 50) यांच्या विरोधात लुक आउट नोटीस बजावली आहे. तर संशयिताला तक्रारदार सलीम गुडगेरी यांनी, स्वत:हून पकडून पोलिसांच्या ताब्यात देऊनही तो पलायन करतो याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

दि. 23 फेब्रुवारी 2023 या दिवशी दुपारी दीड वाजता वास्को येथील एचडीएफसी बँकमधून 2.50 लाख रुपये सलीम गुडगेरी यांनी काढले. ते पैसे त्यांनी आपल्या कारमध्ये ठेवून कार पार्क करून कामानिमित्त गेले व ते परत येऊन त्यांनी पाहिले असता कारमधील पैसे गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्वरित त्यांनी वास्को पोलिसांत तक्रार दिली.
दरम्यान गुरूवार 27 एप्रिल रोजी गुडगेरी यांचे पैसे चोरणाऱ्या संशयिताला वास्को पेोलिसांनी गुडगेरी यांच्या मदतीने ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला बांबोळी येथे आरोग्य तपासणीसाठी नेले असता काल शुक्रवारी पहाटे 3 वाजता पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला.

लूकआऊट नोटीस
वास्को पोलिसांनी फरार झालेला संशयित आरोपी पी. रमेश याच्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे. सदर चोरट्याच्या पायाला प्लास्टर होता अशी माहिती तक्रारदार सलीम गुडगेरी यांनी दिली आहे. वास्को पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.