दोन डॉक्टरसह सात जणांना अटक; जम्मू-कश्मीर, हरियाणा आणि उत्तरप्रदेश पोलिसांची संयुक्त कारवाई
जम्मू-कश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई करत जैश-ए-मोहम्मद आणि अंसार गझवत-उल-हिंद या दहशतवादी संघटनांशी संबंधित आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय ‘व्हाईट कॉलर’ दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन डॉक्टरांसह सात जणांना अटक केली असून, 2,900 किलो आयईडी हे स्फोटके तयार करण्याचे साहित्य आणि दोन एके सीरिज रायफल्स जप्त केल्या आहेत. हरियाणातील फरिदाबाद येथील एका डॉक्टरच्या घरी छापा टाकत पोलिसांनी ही कारवाई केली.
जम्मू-कश्मीर, हरियाणा आणि उत्तरप्रदेश पोलिसांच्या संयुक्त मोहिमेत ही मोठी कारवाई करण्यात आली. या ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि स्फोटक तयार करण्याचे साहित्य जप्त केले. अटक केलेल्यांमध्ये फरिदाबादचा डॉ. मुजम्मिल शकील आणि कुलगामचा डॉ. आदिल अहमद यांचा समावेश आहे.
डॉ. मुजम्मिलने तीन महिन्यांपूर्वी फरिदाबादच्या धौज गावात एक खोली भाड्याने घेतली होती. तिथे तो राहत नव्हता, त्याने त्याचे सामान ठेवण्यासाठी ती खोली भाड्याने घेतली होती. पोलिसांकडून खोलीतून 14 बॅगा जप्त करण्यात आल्या, ज्यामध्ये 2500 किलो स्फोटके तयार करण्याचे साहित्य, 350 किलो अमोनियम नायट्रेट, एक एके-56 रायफल, 5 लिटर रसायने, 84 काडतुसे आणि दोन स्वयंचलित पिस्तूल होते. बॉम्ब बनवण्याच्या उपकरणांसह 48 वस्तू जप्त करण्यात आल्या. गेल्या काही दिवसांत पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी श्रीनगर, अनंतनाग, गांदरबल, शोपियां आणि फरिदाबाद येथे छापे टाकून या नेटवर्कचा पर्दाफाश केला.
अटकेतील दहशतवाद्यांची नावे
© डॉ. मुजम्मिल शकील (मुसैब), कोईल, पुलवामा, © डॉ. आदिल अहमद, वानपोरा, कुलगाम, © अरिफ निसार डार (साहिल), नौगाम, श्रीनगर, © यासिर-उल-आशरफ, नौवगाम, श्रीनगर, © मकसूद अहमद डार (शाहिद), नौगाम, श्रीनगर, © मौलवी इरफान अहमद (मशिदीचा इमाम), शोपियान, © जमीर अहमद आहंगर (मुतलाशा), वाकुरा, गंदेरबल
गुजरात पोलिसांकडूनही एकास अटक
दहशतवादाशी संबंधित दुसऱ्या एका प्रकरणात गुजरात पोलिसांनी हैदराबादमधून डॉ. अहमद मोहियुद्दीन सय्यद याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या जवळून तीन हँडगन, 30 जिवंत गोळ्या आणि चार लिटर कॅस्टर ऑइल (एरंडेलाच्या बियांपासून तेल काढल्यानंतर उरणाऱ्या मळीपासून तयार केले जाणारे विष) जप्त केले.

