पोर्टलवर ४ हजार गोमंतकीयांची परत येण्यासाठी नोंदणी ः सावईकर

0
154

 

कोविड-१९ महामारीच्या पार्श्‍वभूमीवर ६५ देशांत अडकून पडलेल्या सुमारे ४ हजार गोमंतकीयांनी गोव्यात परत येण्यासाठी अनिवासी भारतीय आयोगाच्या पोर्टलवर नोंदणी केली असल्याची माहिती काल राज्याचे अनिवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावईकर यानी दिली. आयोगाने सुरू केलेल्या पोर्टलवर विदेशांतून गोव्यात परत येण्यास इच्छुक असलेल्या सुमारे ४ हजार गोमंतकीयांनी गोव्यात परत येण्यासाठी नोंदणी केली असल्याचे सावईकर यांनी सांगितले.
जगभरातील ६५ देशांत हे गोमंतकीय असले तरी त्यातील सर्वजण हे मध्य पूर्वेकडील राष्ट्रे व अमेरिकेत असल्याचे सावईकर यांनी स्पष्ट केले. या गोमंतकीयांनी आपल्या विषयीची संपूर्ण माहिती विदेश व्यवहार मंत्रालयाला दिली असल्याचे सावईकर यांनी पुढे नमूद केले. या लोकांच्या स्वदेश प्रत्यार्पणाची जबाबदारी ही विदेश व्यवहार मंत्रालयाने घेतली आहे. पहिल्या टप्प्यात जे प्रत्यार्पण होणार आहे त्यात गोमंतकीयांचा समावेश नसल्याची माहितीही सावईकर यांनी दिली. गोमंतकीयांचा दुसर्‍या यादीत समावेश होणार आहे. विदेशात अडकून पडलेल्या गोमंतकीयांचे लवकरात लवकर स्वदेश प्रत्यार्पण व्हावे, अशी विनंती अनिवासी भारतीय आयोगाने विदेश व्यवहार मंत्रालयाकडे केली असल्याचे सावईकर यांनी स्पष्ट केले.