फोंडा विधानसभा मतदारसंघात होणारी आगामी पोटनिवडणूक लढविण्याची घोषणा डॉ. केतन भाटीकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काल केली. मगो-भाजप युतीचा उमेदवार किंवा अपक्ष म्हणून फोंड्यातील पोटनिवडणूक लढवणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रवी नाईक यांच्या निधनामुळे येत्या सहा महिन्यांत फोंडा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार, या चर्चांना आता ऊत आला आहे.
डॉ. केतन भाटीकर हे मगोचे कार्यकर्ते असून, त्यांनी 2022 मध्ये मगोच्या उमेदवारीवरून फोंड्यातून विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यामुळे डॉ. भाटीकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता त्यांनी भूमिका जाहीर केली आहे.
फोंडा पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही. मतदारांना नवीन आमदार निवडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे निवडणूक होऊ द्या. आपण सध्या मगोमध्ये कार्यरत आहे. युतीची उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहे, असे केतन भाटीकर यांनी स्पष्ट केले.

