– डॉ. राजेंद्र रामचंद्र साखरदांडे
‘‘डॉक्टर मला वाचवा… मला वाचवा हो!!’’ पूर्वी असे केव्हा ते बोलले नव्हते. त्यांचे वय ८०-८५ असावे. शरीर पार थकून गेलेले. पण जगण्याची जिद्द होती. आशा होती. त्यांच्या घरी त्यांना तपासायला गेलो होतो. त्यांच्याबरोबर मी बोलतच बसायचो… त्यांना बरे वाटायचे… धीर वाटायचा. हे डॉक्टर आपल्याला वाचवणार याची खात्री होती. त्यांना कोणताही रोग नव्हता, सोडून वार्धक्याचा. त्यांना मुंबईला आपल्या नातवाकडे जायचे होते. घरात अंथरुणावर बसायचे त्राण नव्हते; तरीदेखील मुंबईला जायची भाषा!
त्या दिवशी तर ते चांगलेच भ्रमात गेले होते. पण जाग आल्यावर मात्र ते आपल्याला वाचवण्याचा आक्रोश करू लागले. मी मात्र विचारच करायला लागलो. डॉक्टरी पेशात कितीतरी वयस्कर लोकांना निरोप घेण्याची घाई झालेली पाहिली होती. परवाच एक साठी उलटलेले व्यक्ती मला म्हणाले, ‘‘आपले जीवन संपलं… आता वर मिळतोय तो बोनस…!’’ त्याचे बोलणे ऐकून उगाचच छातीत धस्स झाले. हल्ली मीही साठी ओलांडली होती… म्हणजे आपलाही बोनस… छे! छे…!! ८०-८५ वर्षे वयाची माणसे आपल्या बोनसविषयी काहीच बोलत नाहीत. मग तू रे असा कसा?
मागे एक गृहस्थ माझ्याकडे आलेले. चांगले वयस्क होते. ते दररोज पहाटे आपल्या बायकोबरोबर फिरायला जात असे. कालांतराने त्यांची बायको यायची बंद झाली. मग हे एकटेच हातात काठी घेऊन फिरायचे. मला त्यांचे कौतुक वाटायचे. मला म्हणाले, ‘‘डॉक्टरसाहेब, आता आपलं काही खरं नाही. चालायला होत नाही. जेवण पचत नाही. मुलीच्या घरी बिछान्यावर पडायच्या अगोदर, देवा नेरे मला!! म्हणून प्रार्थना करतो.’’ म्हातारा चांगलाच थकलेला दिसत होता. प्रत्येक वयस्कर माणसाला असे वाटणे साहजिकच होते. हातपाय थकल्यावर… गात्रे गळीत झाल्यावर जीव टांगणीला येतो. मग हातात जपमाळ येते. ओठांवर कधी न घेतलेले देवाचे नाव येते. तो देवाला शरण जातो. मला लवकर नेरे बाबा… मला अंथरुणावर पडायला लावू नकोस! कुणी म्हणे, ‘‘डॉक्टर मला हवं तर मरायचं इंजेक्शन द्या… जगायचं नको… मला जगायचं नाही!’’ मी त्या गृहस्थांना अर्धा तास समजावत राहिलो. मी म्हटले तुमचे नाव चित्रगुप्तांच्या वहीवर नाही लागले… आराम करा… चांगले खा… काहीतरी विरंगुळा म्हणून करा… स्वत:ला जपा… उगाचच मी बळेबळे त्यांना सल्ला देत होतो. त्यांचे माझ्याकडे लक्षच नव्हते.
अंथरुणावर खितपत पडलेली माणसे मी दररोज बघतो. त्यांची सेवा करता करता घरची चांगलीच थकून गेलेली असतात. शेवटी त्यांची वळकटी कोपर्यात टाकलेले असते. अगदी गोदामात कचरा भरल्यासारखे जमिनीवर. जमीनही पावसात ओली झालेली. जमिनीवर जुनाट सतरंजी… तिच्यावर चादर फाटकी पांघरायला व त्याच्यावर पडलेली ती म्हातार्याची वळकटी…
अशा कितीतरी थकलेल्यांना बघायला मला त्यांच्या शेवटच्या सफरीअगोदर नेलेले… म्हणजे वाड्यावरची लोकं नाहीतर म्हणतील, ‘‘मुलानं वडिलांना त्यांच्या आजारात डॉक्टरी इलाज पण केला नाही.’’ म्हणून हा फक्त प्रपंच करायचा. मग चार दिवसांनी तो मुलगा मला भेटायला यायचा. ‘‘डॉक्टर वडील गेले…. त्यांना अगदी शांतपणे मरण आले.’’ मला मग त्याची किळस यायची. ‘‘म्हातारा मेला की तू मारलास?’’ माझा प्रश्न हटकून असायचा.
त्या गावची ती म्हातारी… वय वर्षे नव्वदच्या पुढे. पणतू झालेत… आता शेणतू यायची प्रतीक्षा! ती चक्क मॅचिंग करून यायची. म्हणायची, आता आपली काहीच इच्छा राहिलेली नाही. देवाने लवकर आमंत्रण पाठवले तर माझी तयारी आहे, वगैरे वगैरे. त्या दिवशी ती माझ्याकडे आली. म्हणाली, ‘‘डॉक्टरसाहेब ताप येतोय, सहन होत नाही. मला लवकरात लवकर बरे करा. घरात नातसुनेचे डोहाळे आहेत. काय करायचेय… सगळी तयारी करायची बाकी आहे.’’ पूर्वी लोक आपले आयुष्य पूर्णपणे मजेत जगायची. आता परिस्थिती बदललीय. आज मरत नाहीत म्हणून जगतात… जगात वयस्करांची संख्या एवढी वाढली आहे की सर्व राष्ट्रांसमोर प्रश्नचिन्ह उभे ठाकलेय… त्यात हे हाल. मग… शेवटच्या प्रवासाला निघायची प्रत्येकाला घाई झालेली. केव्हा हा पैलतीर गाठतो असे व्हायचे.
नदीच्या तीरावर पूर्वी कसे ओसाड असायचे. लोक पूर्वी तिथे भटकायला पण जात नव्हते. दोन-तीन वयस्कर माणसे तिथल्या पारावर बसलेली असायची. पैलतीरावर जायला नावाडी आपली होेडी घेऊन तयार असायचा. पण पैलतीरी जायला लोक कमीच असायचे. पण आता त्या तीरावर ही गर्दी…. कितीतरी नवीन बाके घातली होती. अपुरी पडतात म्हणून आणखी बाके घालण्याचे काम जोरात चालू होते. पैलतीरी जाणार्यांना पोचविणार्यांची संख्या भरपूर वाढलेली. प्रत्येकाच्या हातात, खांद्यावर त्यांची ती वळकटी होती. मात्र नावाडी तोच आपली तीच छोटीशी नाव घेऊन हजर झालेला. पण आज त्याच्या हातात वही व वहीवर नोंद असलेल्या लोकांनाच तो आपल्या नावेत घेऊन हजर झालेला. पण आज त्याच्या हातात वही व वहीवर नोंद असलेल्या लोकांनाच तो आपल्या नावेत घ्यायचा. नाव किनार्यावर लागताच झुंबड व्हायची. तो नावे घ्यायचा अन् राहिलेले खिन्न चेहर्याने परत फिरायचे. तो सांगायचा, ‘‘शांत बसा. अजून तुमचं नाव माझ्या वहीवर लागलेले नाही.’’ त्याच्या वहीवर आमचे नाव येणार ते केव्हा??
पैलतीर तर साफ दिसत होता. नदी फार मोठी होती. नाव जाई-येईपर्यंत कितीतरी तास लागायचे… पण पैलतीरावर गेलेली माणसे दिसत नव्हती… धुके गडद होत चाललेले… पैलतीर धुक्यात हरवला होता… काठावर आपापली वळकटी घेऊन येणार्यांची संख्या वाढत चाललेली… प्रत्येकाला पैलतीर गाठायची ओढ लागलेली… फक्त पैलतीर…!
…………

