पेरारीवलनची सुटका

0
26

राजीव गांधी हत्या कटातील एक आरोपी ए. जी. पेरारीवलन याची तुरुंगवासातून सुटका करण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केला आहे. त्यामुळे अवघ्या १९ व्या वर्षी तुरुंगात गेलेला पेरारीवलन आता ३१ वर्षांनंतर वयाच्या पन्नाशीत तुरुंगाबाहेर येणार आहे. या सुटकेसाठी त्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झालेला असला, तरी या देशाच्या पंतप्रधानांच्या हत्या कटातील तो एक महत्त्वाचा आरोपी होता आणि त्यातही लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ ईलम म्हणजेच एलटीटीई या जगातील सर्वांत घातक दहशतवादी संघटनेशी संबंधित होता हे विसरता येणार नाही. ज्या कमरपट्‌ट्यात दडवलेल्या स्फोटकांनी राजीव गांधींचा घात केला, त्यांचा स्फोट घडविण्यासाठी जी नऊ वोल्टची बॅटरी वापरली गेली, ती ह्याच पेरारीवलन ऊर्फ अरिवूने कटाचा सूत्रधार शिवरासनला पुरवली होती.
आज जरी त्याचा उल्लेख सर्वत्र पेरारीवलन असा केला जात असला, तरी राजीव हत्या प्रकरणाच्या तपासकार्यादरम्यान त्याचा उल्लेख त्याच्याच अरिवू या दुसर्‍या नावाने करण्यात येत होता आणि तपास अधिकारी डी. आर. कार्तिकेयन यांनी नंतर ह्या प्रदीर्घ आणि गुंतागुंतीच्या तपासकार्यासंबंधी जे पुस्तक लिहिले, त्यातही त्याच्या कारवायांचा उल्लेख त्याच्या अरिवू याच नावाने केलेला आहे. त्यामुळे अटक झाली तेव्हा भले तो एकोणिस वर्षांचा कोवळा तरूण होता, तरी आपण एलटीटीईच्या एका घातक कटामध्ये सहभागी होत आहोत याची जाणीव नसण्याएवढा तो दूधखुळाही नक्कीच नव्हता. ह्या हत्याकटातील आणखी एक महत्त्वाची आरोपी नलिनी हिचा भाऊ भाग्यनाथन याच्यामुळे हा अरिवू एलटीटीईच्या संपर्कात आला. निशांतन ऊर्फ निक्सन किंवा शिवरासनसारख्या श्रीलंकन दहशतवाद्यांच्या संपर्कात वावरणे किती घातक असू शकते याची जाणीव त्या वयातही त्याला नक्कीच असेल. राजीव हत्येपूर्वी विश्वनाथप्रतापसिंह यांच्या सभेमध्ये हत्येची जी रेकी करण्यात आली, तेव्हा तिथे शुभा, धानू, नलिनी, मुरुगन, छायाचित्रकार हरिबाबू या सर्व साथीदारांसोबत अरिवूही होता. शिवरासनच्या सांगण्यावरून एलटीटीईच्या वायरलेस संचासाठी कार बॅटरी आणि धानूच्या कमरपट्‌ट्यासाठी नऊ वोल्टच्या बॅटर्‍याही यानेच खरेदी केल्या होत्या. इतकेच नव्हे, तर दहशतवाद्यांच्या वापरासाठी ह्याच अरिवूच्या नावे कावासाकी मोटारसायकलही खरेदी करण्यात आली होती. एवढे भक्कम पुरावे असल्यानेच आधी त्याला फाशी झाली व नंतर जन्मठेपेत परिवर्तीत करण्यात आली.
राजीव हत्या कटात एकूण ४१ आरोपी होते आणि त्यापैकी १२ जण त्या स्फोटातच ठार झाले. तिघे फरार सोडल्यास इतरांवर खटले चालवले गेले आणि प्रदीर्घ न्यायालयीन लढाईअंती त्यांना सजा झाल्या. मात्र, जे जन्मठेप भोगत आहेत, त्यांच्या सुटकेचा विषय हा तामीळनाडूमध्ये नेहमीच राजकीय व भावनिक विषय बनून राहिलेला आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी तो उसळून बाहेर येत राहिला आहे. अरिवू तथा पेरारीवलनच्या सुटकेसाठी त्याच्या अर्पुथम अम्मल या वृद्ध मातेच्या माध्यमातून भरपूर प्रयत्न आजवर करण्यात आले, परंतु त्याच्या व त्याच्या साथीदारांच्या सुटकेचा निर्णय घेण्याइतपत त्यांचा गुन्हा किरकोळ नसल्याने कोणी त्याची कार्यवाही करू शकले नाही. या दरम्यान या पेरारीवलनने आपले शिक्षण पूर्ण केले. तो बीसीए झाला, एमसीए केले आणि ‘फाशीच्या तख्तावरून पत्र’ या शीर्षकाचे एक पुस्तकही त्याने तामीळमधून लिहिले आहे. तुरुंगातील चांगल्या वर्तणुकीचा फायदा त्याला आता शिक्षेतून सूट मिळण्यात झाला आहे.
आपण शिवरासनला ज्या बॅटर्‍या पुरवल्या, त्या कशासाठी वापरल्या जाणार आहेत हे आपल्याला माहीत नव्हते, असाच या अरिवूचा आजवरचा युक्तिवाद राहिला आहे. सीबीआयचे तपास अधिकारी त्यागराजन यांनी त्याच्या जबानीतून तो परिच्छेद आपण हटविल्याची कबुली नंतरच्या काळात दिली. त्यामुळे खरोखरच अरिवूला राजीव हत्येचा कट शिजतो आहे याची कल्पना नव्हती असे जरी मानले, तरीही ज्या घातक लोकांमध्ये तो वावरत होता, त्यांना सर्वतोपरी मदत करीत होता, ते पाहता त्याला निष्पापही म्हणता येत नाही. अर्थात, काळ जातो तशा तीव्र भावनाही बोथटतात. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनीही राजीव हत्या प्रकरणातील आरोपी नलिनीला शिक्षेतून सूट देण्याचे जाहीर आवाहन केले होते व प्रियांका तिला तुरुंगात जाऊन भेटली होती. काळ जखमा बुजवतो म्हणतात तेच खरे. त्यामुळेच अरिवूच्या सुटकेसंदर्भात आता भावना तेवढ्या तीव्र राहिलेल्या नाहीत. आपला एक अत्यंत उमदा पंतप्रधान मात्र आपण ह्या सैतानांमुळे गमावला.