‘पेपर स्प्रे’च्या उग्र वासाने 12 मुली अत्यवस्थ

0
7

>> डिचोलीच्या शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रकार

>> उपचारानंतर 10 जणींना पाठवले घरी; दोघींवर उपचार सुरू

>> वर्गातीलच विद्यार्थ्यांचा खोडसाळपणा; कारवाईची मागणी

>> मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश; शिक्षण खात्याकडून नोटीस

डिचोली तालुक्यातील शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 11वीच्या वर्गातील 12 विद्यार्थिनी ‘पेपर स्प्रे’च्या उग्र वासामुळे अत्यस्वस्थ बनल्याचा प्रकार काल घडला. या उग्र वासामुळे सदर विद्यार्थिनींना श्वास घेण्यात त्रास होऊ लागल्याने त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने सुरुवातीला डिचोली सरकारी इस्पितळात आणि नंतर म्हापशातील आझिलो इस्पितळात दाखल करण्यात आले. उपचारानंतर 12 पैकी 10 विद्यार्थिनींना घरी पाठवण्यात आले असून, दोघांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात काही विद्यार्थ्यांचा सहभाग असून, त्यांची ओळख पोलिसांनी पटवली आहे. तसेच विद्यालयाच्या व्यवस्थापनाला त्यांच्याविरुद्ध कडक कारवाईचे निर्देश पोलिसांनी दिले. याशिवाय मुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंतही यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकारासाठी शिक्षण खात्याने शांतादुर्गा विद्यालय व्यवस्थापनाला जबाबदार धरले असून, त्यांना नोटीस बजावली आहे.

सविस्तर माहितीनुसार, शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता अकरावीचा वर्ग नेहमीप्रमाणे सुरू असताना दुपारी 12 च्या सुमारास वर्गात अचानक पसरलेल्या एका उग्र वासामुळे काही विद्यार्थिनींना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. आणि त्यानंतर लगेचच त्या अत्यवस्थ बनल्या. त्यांना लगेचच डिचोलीतील सरकारी इस्पितळात करण्यात आले. इस्पितळात दाखल केलेल्या 12 पैकी 9 विद्यार्थिनींची प्रकृती काहीशी गंभीर असल्याने त्यांना तातडीने म्हापशातील आझिलो इस्पितळात दाखल करण्यात आले. सदर मुलींना श्वसनामध्ये त्रासाबरोबरच घशातही खवखव जाणवू लागली. यावेळी त्या मुलींना सलाईन व ऑक्सिजनचा वापर करून उपचार सुरू करण्यात आले. पेपर स्प्रेच्या उग्र वासामुळे थोडा वेळ बरे वाटून काही वेळाने पुन्हा सदर मुलींना त्रास जाणवत होता. त्यामुळे डॉक्टरांकडून त्यांच्यावर देखरेख ठेवली जात होती.

‘त्या’ विद्यार्थ्यांची ओळख पटली
या घटनेची माहिती डिचोली पोलिसांना विद्यालयाच्या व्यवस्थापनाने दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक राहुल नाईक व त्यांचे पथक विद्यालयात दखल होऊन त्यांनी सखोल चौकशी केली. त्यासाठी सीसीटीव्ही फुटेज व इतर माध्यमातून तपासणी करण्यात आली. पोलीस तपासात या प्रकरणात काही विद्यार्थ्यांचा सहभाग आढळला असून, त्यांची ओळख पटवण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हा पेपर स्प्रे फवारला, ते अल्पवयीन असल्याने त्यांच्याविरुद्ध पोलीस कारवाई करणे कठीण आहे. त्यामुळे डिचोली पोलिसांनी विद्यालय व्यवस्थापनाला पत्र पाठवून सदर विद्यार्थ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

दोघींवर अद्यापही उपचार सुरू
डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, पालक-शिक्षक संघ आणि व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी डिचोली सरकारी इस्पितळ आणि आझिलो इस्पितळात जाऊन उपचार घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या प्रकृतीची विचारपूस केली. डिचोली सरकारी इस्पितळात तिघा मुलींवर, तर आझिलो इस्पितळात 9 मुलींवर उपचार करण्यात आले. 10 मुलींना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले, तर दोघींवर अद्यापही उपचार सुरू आहेत.

पाटकर, फेरेरा यांनी घेतली भेट
म्हापसा येथील आझिलो जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या उपचाराधीन विद्यार्थिनींची काँग्रेस आमदार ॲड. कार्लुस फेरेरा आणि गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी गुरुवारी भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलीस आणि शिक्षण खात्याला डिचोली येथील शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयातील ‘पेपर स्प्रे’ प्रकरणी सखोल चौकशीचा आदेश काल दिला.

विद्यालय व्यवस्थापन घटनेला जबाबदार; शिक्षण खात्याकडून नोटीस; उत्तर मागवले
शिक्षण खात्याने डिचोली येथील उच्च माध्यमिक विद्यालयातील पेपर स्प्रे प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या व्यवस्थापनाला या घटनेला जबाबदार धरून नोटीस पाठवली आहे. या नोटिसीला शांतादुर्गा शिक्षण संस्थेने 3 दिवसात उत्तर देऊन पेपर स्प्रे प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करावा, असा आदेश देण्यात आला आहे. अशा प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी विद्यालय व्यवस्थापनाने खबरदारी घ्यावी, असेही शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी नोटिसीमध्ये म्हटले आहे.

डिचोली पोलिसांचे प्राचार्यांना पत्र
डिचोली पोलीस स्थानकाचे निरीक्षक राहुल नाईक यांनी शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यांना पत्र पाठवून पेपर स्प्रे प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची सूचना काल केली. विद्यालयातील मुलांनीच सदर प्रकार केल्याचा संशय आहे. व्यवस्थापकीय समिती आणि आपणासोबत झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झालेली आहे. या घटनेची शिक्षण संस्था पातळीवर चौकशी झाली पाहिजे. यापुढे शिक्षण संस्थेत अशा प्रकारचा कोणताही अनुचित घटना घडू नये म्हणून कसून चौकशी होण्याची गरज आहे. तसेच, विद्यालय परिसर आणि विद्यालयातील वर्गांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असेही राहुल नाईक यांनी पत्रात म्हटले आहे.