गोवा, येथील निसर्ग व भाषा टिकवून ठेवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन पर्यावरण मंत्री एलिना साल्ढाना यांनी पेडणे येथे केले.
येथील सेंट जोसेफ हायस्कूल मैदानावर आयोजित १८व्या युवा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. कोकणी भाषा मंडळ व पेडणे शासकीय महाविद्यालयातर्फे यंदाच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
व्यासपीठावर सभापती राजेंद्र आर्लेकर, नगराध्यक्ष डॉ. वासुदेव देशप्रभू, पेडणे सरकारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मेंडीस, फा. फेडिको डिसोझा, कार्याध्यक्ष शिरीष नाईक, सतिश सावळ, कोकणी भाषा मंडळाचे अध्यक्ष चेतन आचार्य उपस्थित होते.
सभापती आर्लेकर यांनी आपल्या भाषणात, गोमंतकीय संस्कृतीचे दर्शन अशा महोत्सवातून होत असल्याचे सांगितले.
नगराध्यक्ष डॉ. वासुदेव देशप्रभू यांनी पेडण्यात येत्या काळात ‘सूडा’च्या मदतीने सुसज्ज सभागृह बांधण्याचा मनोदय व्यक्त केला.
कोकणी भाषा मंडळाचे अध्यक्ष चेतन आचार्य यांनी माध्यम प्रश्न प्राधान्य क्रमाने सोडवावा, कोकणी भाषेतून डी.एड. पदवीच्या शिक्षणाची सोय करावी यासाठी सरकारला प्रस्ताव पाठविला असल्याचे सांगितले. १६ जानेवारी हा दिवस गोवा अस्मिता दिन घोषित करण्याची मागणीही त्यांनी केली. उद्घाटन सत्राचे आभार प्रदर्शन सतिश सावळ यांनी केले.

