पॅरा ऍथलिट दीपा मलिक निवृत्त

0
168

भारतीय पॅरा ऍथलिट दीपा मलिक हिने सोमवारी निवृत्ती जाहीर केली. राष्ट्रीय क्रीडा संहितेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तिने ही निवृत्ती जाहीर केली आहे. भारतीय पॅरालिंपिक समितीचे अध्यक्षपद भूषविण्यासाठी दीपाने निवृत्ती स्वीकारली. खेळाने मला खूप काही दिले आता खेळासाठी योगदान देण्याची वेळ आली असल्याचे ४९ वर्षीय दीपाने सांगितले. २०२२ सालच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभाग घेण्याची इच्छा असून त्यावेळची परिस्थिती पाहून पुढील पावले उचलेन, असे दीपाने सांगितले. देशाच्या क्रीडा संहितेत तरतूद असली तर आंतरराष्ट्रीय पॅरालिंपिक समिती अधिकार्‍याला खेळामध्ये सहभागास परवानगी देते. परंतु, भारताच्या राष्ट्रीय क्रीडा संहितेमध्ये सक्रीय खेळाडू कोणत्याही राष्ट्रीय संघटनेत पद भूषवू शकत नाही, त्यामुळे जड अंतकरणाने निवृत्ती स्वीकारावी लागल्याचे दीपाने सांगितले. दीपा ही पॅरा ऍथलिटमधील भारताची आघाडीची खेळाडू होती. मागील वर्षी २९ ऑगस्ट रोजी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने तिचा सन्मानही करण्यात आला होता. हा पुरस्कार मिळवणारी ती पहिली पॅरा ऍथलिट ठरली होती. पॅरालिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये पदक मिळविणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू ठरली होती. तिच्या नावावर ५८ राष्ट्रीय व २३ आंतरराष्ट्रीय पदके आहेत.