येथील डॉ. डी.वाय. पाटील स्टेडियमवर काल गुरुवारी झालेल्या फिफा अंडर १७ विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात पॅराग्वेने तुर्कीचा ३-० असा पराभव करत सलग तिसरा विजय नोंदविला. या विजयासह त्यांनी ‘ब’ गटात अव्वल स्थान मिळवून दिमाखात बाद फेरी गाठली. पराभवामुळे खात्यात केवळ १ गुण व गोलफरक वजा ५ असल्याने तुर्कीला स्पर्धेबाहेरचा रस्ता धरावा लागला.
सामन्याची सुरुवात पॅराग्वेसाठी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. दुसर्याच मिनिटाला मिळालेली पेनल्टीची संधी त्यांना सत्कारणी लावता आली नाही. अनिबेल व्हेगा याने लगावलेला फटका तुर्कीचा गोलरक्षक बर्के ओझेर याने अप्रतिमरित्या अडवल्यानंतर पॅराग्वेच्या गोटात शांतता पसरली. या धक्क्यातून लगेच सावरताना पॅराग्वेने उर्वरित सामन्यात तुर्कीच्या गोलरक्षकाला विसाव्याची संधी दिली नाही. जोवानी बोगाडो याने ४१व्या मिनिटाला २५ यार्ड आंतरावरून घेतलेल्या फ्री किकने तुर्कीच्या बचावाच्या भिंत ओलांडत गोलजाळीचा वेध घेतला. यानंतर दोनच मिनिटांनी (४३वे मिनिट) ब्लास आरमोवा याने लगावलेल्या फ्री किकवर फर्नांडो कार्दोझ याने गोल नोंदवून तुर्कीचा खेळाडूंना अचंबित केले. मध्यंतरापर्यंत पॅराग्वेचा संघ २-० असा आघाडीवर होता. ६१व्या मिनिटाला आंतोनियो गालियानो याने डाव्या पायाने लगावलेल्या फटक्याने तुर्कीच्या बचावपटूला लागून अचानक दिशा बदल्याने गोलरक्षकाला हा फटका अडविता आला नाही. करीम केसगिन याने (९० + ३) अतिरिक्त वेळेत तुर्कीचा एकमेव गोल केला. ‘अंतिम १६’मधील पॅराग्वेचा सामना १६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यांचा प्रतिस्पर्धी अजून निश्चित झालेला नाही.

