Home बातम्या पूर्वेची पश्‍चिमेला ओळख

पूर्वेची पश्‍चिमेला ओळख

0

– डॉ. सोमनाथ कोमरपंत

भारतीय प्रबोधनकालाचे एक शिल्पकार म्हणून स्वामी विवेकानंदांचे नाव अभिमानाने घेतले जाते. त्यांचे तेजस्वी व्यक्तिमत्त्व देशबांधवांना निरंतर स्फूर्ती देणारे आहे. सार्‍या जगाला मानवतेचा दिव्य संदेश देणारे आहे. खडतर कालखंडात त्यांनी विवेकनिष्ठेच्या बळावर भारतीय अस्मितेला आकार दिला. राष्ट्रतेजाचा स्फुल्लिंग जागविला. त्यांच्या अमोघ वाणीत मनुष्यमात्राला भावमंत्रित करण्याची शक्ती होती. तिच्यातील विजिगीषू जीवनप्रणाली किंकर्तव्यमूढ देशबांधवांना दीपस्तंभाप्रमाणे अभ्युदयाची दिशा दाखविणारी होती.

विशेषतः युवकांच्या सुप्त, असीम शक्तीविषयी त्यांना आस्था वाटत असे. त्यांच्या अंतःकरणातील तात्पुरती निराशा आणि मनोवृत्तीतील जडता निपटून काढण्याचा विवेकानंदांनी अहर्निश प्रयत्न केला. वैश्‍विक दृष्टिकोन, नितांत राष्ट्रप्रेम आणि स्वसंस्कृतीविषयीचा निरतिशय अभिमान त्यांच्या अणुरेणूंमध्ये वसत होता. त्यांच्या उक्तीतून आणि कृतीतून या गुणत्रयीचा प्रत्यय देशबांधवांना आणि पाश्‍चात्त्य जगताला आला. अफाट बुद्धिमत्ता, तीव्र स्मरणशक्ती, स्वाभिमान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या गुणवैशिष्ट्यांचा समुच्चय त्यांच्या व्यक्तिमत्त्वात झालेला होता. बुद्धिप्रामाण्यवादी मनःपिंडाचे असूनही ते रुक्ष वृत्तीचे नव्हते. जीवनाच्या सर्वांगांना स्पर्श करणारी प्रज्ञा आणि प्रतिभा त्यांच्या ठायी होती. भारतीय जीवनसंचिताच्या चित्कळेने त्यांच्या अंतःकरणातील भावोर्मी उमलत असत. त्यांच्या वक्तृत्वामधून हे विलोभनीय ओथंबलेपण प्रकट होत असे. खडकावरून गतिमानतेने कोसळणार्‍या शुभ्रधवल जलप्रपाताप्रमाणे त्यांच्या वाणीचा ओघ होता. श्रोतृवृंदाच्या काळजाला स्पर्श करून जाण्याची अमर्याद शक्ती आणि असामान्य कला तिच्यात सामावलेली होती.

विवेकानंदांनी भारतीय जीवनदृष्टीचा सूक्ष्म अभ्यास केला होता. या जीवनाच्या मर्मदृष्टीचा साक्षात्कार त्यांना झालेला होता. अक्षय गंगौघाप्रमाणे प्रवाहित होणार्‍या वाणीद्वारा मनुष्यमात्राच्या उद्धारासाठी त्यांनी भारतीयांच्या पारंपरिक वारशाची ओळख समर्थपणे करून दिली. तेच आपले जीवितकार्य मानले. अंतिम सत्याकडे, चिरंतन सौख्याकडे आणि वैश्‍विक एकात्मतेकडे घेऊन जाणारा हा मार्ग आहे हे त्यांनी जगाला पटवून दिले. भौतिकतेकडून आध्यात्मिकतेकडे वळणे यात माणसाचे उन्नयन आहे. हा आत्मिक सुखाचा मार्ग आहे. यातच त्याची मुक्ती आहे हे मनामनांवर बिंबविण्याचा त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केला. हाच पूर्वेचा खरा वारसा आहे. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाबरोबरच राष्ट्राच्या नवनिर्माणासाठी जो झटतो, या उत्तरदायित्वाची जाणीव जो अंतःकरणात निरंतर जोपासतो, तोच खर्‍या अर्थाने जगतो अशी त्यांची जीवनधारणा होती.

नव्या युगाला अनुसरून भारताचा आध्यात्मिक वारसा पुनरुज्जीवित करणारे द्रष्टे प्रज्ञावंत म्हणून स्वामी विवेकानंदांचे स्थान राष्ट्रीय जीवनात फार मोलाचे आहे. त्यांच्या या विचारसरणीत पूर्व आणि पश्‍चिम यांना जोडणारी विशाल जीवनदृष्टी सामावलेली होती. वेद आणि उपनिषदे यांतील तत्त्वज्ञान कालबाह्य झालेले नाही. नित्यनूतन आणि प्रकाशमान ज्योतीची प्रस्फुरणे त्यांत आहेत. फक्त पाहण्याची प्रगल्भ दृष्टी हवी. त्यातील चालू काळाशी सुसंगत असे तत्त्वज्ञान विवेकानंदांनी जगाला उलगडून दाखविले; तेव्हा भारताचा समृद्ध वैचारिक वारसा जगाला कळला. आपल्या राष्ट्राकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलला. त्याला नवी प्रतिष्ठा प्राप्त झाली. भारतीय आत्म्याची जगाला नव्याने ओळख करून देणारा प्रेषित म्हणून विवेकानंदांकडे पाहिले जाऊ लागले.

उत्तिष्ठत्! जाग्रत! प्राप्य वरान्निऽ बोधत्!

‘उठा, जागे व्हा! ध्येयपूर्ती झाल्यावाचून थांबू नका’ या संजीवक स्पर्श असलेल्या उपनिषदातील जीवनमंत्राची आठवण त्यांनी करून दिली. भारतीयांमधील आत्मतेजाचा स्फुल्लिंग जागविला. त्यांचा आत्मविश्‍वास वाढविला.

‘तुझे आहे तुजपाशी, परि तू जागा चुकलासी’ ही जाणीव त्यांना देशबांधवांना करून द्यायची होती. शिवाय भारतीयांकडे अवहेलनात्मक नजरेने पाहणार्‍या पाश्‍चात्त्य जगाला येथील अमृतमय ठेव्याची ओळख करून द्यायची होती. विश्‍वात्मक जाणिवेची दारे उघडून देण्याचे महान कार्य विवेकानंदांनी केले. विश्‍वातील अंतिम सत्य जिला आकळले आणि जिने ‘वसुधैवकुटुम्बकम्’चा सातत्याने उच्चार आणि प्रसार केला अशा उदारमनस्क संस्कृतीचा वारसा आपल्यापाशी आहे. ज्या भूमीवर, ज्या पाण्यावर आणि ज्या हवेवर ही संस्कृती अंकुरली, पल्लवित झाली ती भूमी आपल्यापाशी आहे. आपण या संपदेचे महत्त्व समजावून घेण्याचे कष्ट उचलले तर गतिमान काळातही आपणांस अभिप्रेत असलेल्या सांस्कृतिक क्रांतीचे आपण उद्गाते होऊ हे आत्मभान देशबांधवांमध्ये संक्रमित करण्याचा विवेकानंदांनी प्रयत्न केला.

११ सप्टेंबर १८९३ ला शिकागोला भरलेल्या सर्वधर्मपरिषदेतील स्वामी विवेकानंदांचे भाषण संस्मरणीय ठरले. ‘अमेरिकेतील माझ्या बंधुभगिनींनो…’ या पहिल्या वाक्यासरशी त्यांनी श्रोत्यांची मने जिंकून घेतली आणि मग त्यांचा वाक्प्रवाह अखंडितपणे चालू राहिला. त्या शब्दांत तेज होते. मनुष्यमात्रांविषयी ममत्व होते. त्यांच्या अभ्युदयाचा उत्कट ध्यास होता.

‘‘अनेक धर्मांचे आदिपीठ असा जो सनातन हिंदुधर्म, त्याचा प्रतिनिधी या नात्याने मी तुम्हाला धन्यवाद देतो. फार काय सांगावे? सगळ्या पृथ्वीवरील, सगळ्या वर्णांच्या आणि संप्रदायांच्या कोटी-कोटी स्त्री-पुरुषांच्या वतीने मी आज तुम्हाला धन्यवाद देतो,’’ अशा आपुलकीच्या भावनेने ते बोलले. ‘‘जो धर्म सगळ्या जगाला सहिष्णुता शिकवीत आलेला आहे, त्या धर्मात मी जन्मास आलो आहे. अशा त्या धर्माचा मला अत्यंत अभिमान वाटतो. इतर धर्मांच्या लोकांविषयी आम्ही नुसती सहिष्णुताच बाळगतो असे नाही; तर आम्हाला सगळेच धर्म खरे वाटतात. तसा आमचा पक्का विश्‍वास आहे,’’ असे त्यांनी ठामपणे प्रतिपादन केले.

‘‘कोणत्याही भावना ठेवून कोणीही माझ्याकडे आले तरी त्या सगळ्यांवर मी समदृष्टीने कृपा करतो. अर्जुना, लोक जरी निरनिराळ्या वाटांनी चालले तरी शेवटी ते मलाच येऊन मिळतात’’ या भगवद्गीतेतील श्रीकृष्णाच्या वचनाचे त्यांनी सर्वांना स्मरण करून दिले.

‘‘ही महान सर्वधर्मपरिषददेखील हेच उदात्त विचार सगळ्या जगाला सांगत आहे. आजपर्यंत आपल्या या पृथ्वीवर धर्माच्या नावावर अनेकांनी अनेक चुका केल्या आहेत. अनेक लोक आंधळ्यासारखे वागले आहेत. अनेक लोक वेड्यासारखे वागले आहेत. अशा लोकांनी या पृथ्वीवर लुटालूट माजविली. जाळपोळ केली. कत्तली केल्या. रक्ताच्या नद्या वाहविल्या. त्यांनी अनेक संस्कृतींचा नाश केला. राष्ट्रेच्या राष्ट्रे नाहीशी केली. हे भयंकर राक्षस नसते तर मनुष्यसमाज कितीतरी सुखी झाला असता.

पण आता यापुढे अशा राक्षसांचे काहीएक चालणार नाही. त्यांची घटका भरत आलेली आहे. आज सकाळी आपल्या या सर्वधर्मपरिषदेच्या प्रारंभानिमित्त घंटा वाजविण्यात आल्या. या घंटानादाने जणू त्या राक्षसांना सांगितले आहे की, धर्माच्या नावाखाली तलवारीने किंवा लेखणीने छळ करणार्‍या लोकांनो, आता तुमचे राज्य संपले. यापुढे असहिष्णुता संपेल. आता सगळीकडे सहिष्णुता नांदेल.’’

स्वामी विवेकानंदांचे हे उद्गार ऐकून सारे सभागृह मंत्रमुग्ध झाले. विध्वंसक वृत्तीचे दमन करणारी आणि शुभंकर शक्तीला आवाहन करणारी त्यांची प्रभावी वाणी ऐकून सारेजण भारावून गेले. तेथे जमलेल्या सगळ्या प्रतिनिधींपेक्षा स्वामी विवेकानंद वयाने लहान होते. पण त्यांच्या विचारांत हिमालयाच्या शिखरांची उत्तुंगता होती. हिंदी महासागराची अथांगता होती. लास्य होते. भारतीय जीवनसंचिताचा अंतःस्रोत त्यांच्या मुखातून मुखर होत होता. पूर्वेच्या उज्ज्वल परंपरेची ओळख पश्‍चिमेला होत होती.

विवेकानंदांनी सर्वधर्मपरिषदेत हिंदुधर्माविषयीचा निबंध वाचून दाखविला. ‘न्यूयॉर्क हेराल्ड’ या वृत्तपत्राने त्यांचा गौरव केला. सर्वधर्मपरिषदेनंतर अमेरिकेत त्यांची तेथील जनतेच्या इच्छेनुसार ठिकठिकाणी भारतीय संस्कृतीविषयीची व्याख्याने झाली. तेथील लोकांनी ती मन लावून ऐकली. मॅडम मेरी लुईस, डॉ. सॅन्डस् बर्ग, मिसेस ओलिबुल, डॉ. ऍलन डी., मिस वॉल्डो, प्रो. वेमन, प्रो. राइट, डॉ. स्ट्रीट आणि कितीतरी ख्रिस्ती मिशनरी विवेकानंदांचे शिष्य झाले. या वास्तव्यात ते अखंडितपणे अठरा तास काम करायचे.

अमेरिकेतील वास्तव्यानंतर विवेकानंद इंग्लंडमध्ये गेले. लंडन शहरात त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांची भाषणे ऐकण्यासाठी माणसे गर्दी करीत. आपला देश पारतंत्र्यात होता. सर्वतोपरी प्रतिकूल परिस्थिती होती. अनेक महाविद्यालयांत आणि विश्‍वविद्यालयांत त्यांची भाषणे होत. अनेक विद्वानांबरोबर त्यांना वादविवाद करावा लागला. कणखरपणे त्यांनी इंग्रजांचे दोष दाखवून दिले. हिंदुधर्माची आणि भारतीय संस्कृतीची थोरवी त्यांना पटवून दिली. महिनाभर त्यांचे वास्तव्य तेथे होते. तेथेही त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. मिस मार्गारेट इं. नोबेल ही तेथील बुद्धिमान शिक्षिका आणि निष्ठावंत समाजसेविका. विवेकानंदांच्या विचारांमुळे ती प्रभावित झाली. ती त्यांची शिष्या झाली. पुढे तिने संन्यास घेतला. आपला मायदेश सोडून ती भारतात आली. भारतीय जनतेची सेवा करण्यात तिने आपले उर्वरित आयुष्य घालविले. ‘भगिनी निवेदिता’ या नावाने ती ओळखली जाऊ लागली.

पाश्‍चात्त्यांना प्रभावित करणे हा हेतू विवेकानंदांनी मनाशी बाळगला नाही. भारतीय संस्कृतीची महत्ता अधोरेखित करणे हाच त्यांचा निदिध्यास होता. नैतिक मूल्यांचे अधिष्ठान असलेल्या भारतीय जीवनप्रणालीविषयी विवेकानंद म्हणतात ः

‘‘हा देश असा आहे की अध्यात्म आणि त्याग हेच येथील जीवनस्वर आहेत. या देशाचे सूत्र असे की दिसणारे, भासणारे जग ही दोन दिवसांची माया आहे. म्हणून आत्मदर्शनापुढे विज्ञान, उपभोग, सत्ता, संपत्ती आणि कीर्ती या बाबी दुय्यम आहेत.’’

पाश्‍चात्त्य जगाने अतिरिक्त भौतिक समृद्धीच्या हव्यासामुळे अधःपतनाकडे वाटचाल केली होती हे विवेकानंदांना पुरतेपणी जाणवले होते. हा विसंवाद आपल्या राष्ट्रीय जीवनात निर्माण होऊ नये म्हणून द्रष्टेपणाने सावधानतेचा इशारा त्यांनी दिला होता.

‘‘तुम्ही जर आपले अध्यात्म सोडून दिलेत आणि पश्‍चिमेच्या भौतिकवादी जीवनसरणीच्या मागे लागलात तर तीन पिढ्यांत तुमचा वंश नामशेष होईल, कारण राष्ट्रीय चारित्र्याचा कणाच मोडून पडेल. राष्ट्रजीवनाची उभारणी ज्या पायावर व्हायची तो पायाच खचेल आणि उरतील फक्त विनाशाच्या खुणा.’’

स्वतःवर, आपल्या कार्यप्रणालीवर, शाश्‍वत मूल्यांवर आणि या मूल्याधिष्ठित परंपरेवर आपली नितांत श्रद्धा असली पाहिजे याकडे विवेकानंदांचा कटाक्ष होता. ब्रिटिशांच्या आत्मकेंद्रित बनविणार्‍या शिक्षणप्रणालीमुळे भारतीय समाज निःसत्त्व झालेला आहे. त्याच्या अंतःप्रेरणा निमाल्या आहेत. तो अंधानुकरणात मग्न झालेला आहे. ब्रिटिशांनी मूळ मातीमध्ये रुजलेली आमची श्रद्धास्थाने उद्ध्वस्त केल्यामुळे, आपण आपल्याच मूल्यांकडे उपहासाने पाहू लागलेलो आहोत, याची त्यांना खंत वाटत असे. एकीकडे त्यांना दिसली अज्ञानी, दरिद्री व अंधश्रद्ध जनता आणि दुसरीकडे आढळली मूठभर इंग्रजाळलेली, तथाकथित बुद्धिवादी अश्रद्ध मंडळी. हे दोन्ही परस्पर विभिन्न समाज आपल्या राष्ट्राचे कल्याण साधू शकणार नाहीत अशी विवेकानंदांची स्पष्ट भूमिका होती. भारतीय मानसिकतेचे त्यांचे प्रगल्भ आकलन यात दिसून येते.

विवेकानंदांच्या आध्यात्मिक बैठकीला बुद्धिप्रामाण्यवादाची जोड होती. हा समतोल, हा विवेक मनात बाळगल्यामुळे तत्कालीन युवकवर्गाला ते यथार्थ मार्गदर्शन करू शकले. त्याला आत्मविश्‍वासाचा मंत्र देताना ते म्हणतात ः ‘‘आपल्या पुराणातील तेहेतीस कोटी देवांवर ज्याचा विश्‍वास आहे, पण स्वतःवर विश्‍वास नाही, तो नास्तिक होय. नचिकेताची श्रद्धा तुमच्या अंतर्यामी प्रवेश करू दे.’’

विवेकानंदांनी देशबांधवांना उद्देशून केलेल्या उपदेशात विश्‍वात्मक आवाहन आहे. ‘‘बालपणापासून सर्वांना शिकविण्यात येते की, तुम्ही शक्तिहीन व पापी आहात. सगळ्यांना शिकवा की, तुम्ही दिव्य अमृताचे पुत्र आहात. ईश्‍वराचे पुत्र आहात. आपल्या मनाला नेहमी सांगा- ‘मी ब्रह्म आहे- अहं ब्रह्मास्मि|’ रात्रंदिवस हाच मंत्र जपा. तुमच्या मनात तो एखाद्या स्फूर्तिदायक गीतासारखा सतत निनादत राहू द्या. आणि मरण ओढवले तरी ‘अहं ब्रह्मास्मि’ याच मंत्राचा घोष करा. हेच सत्य आहे. विश्‍वातील अनंत बल तुमच्या ठायी वास करीत आहे.’’

भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख पाश्‍चात्त्य जगाला करून देण्यासाठी विवेकानंदांनी पुष्कळ भ्रमंती केली. न्यूयॉर्कला त्यांनी ‘वेदान्त सोसायटी’ची स्थापना केली. अनेक नामवंत विद्वान तिचे सदस्य झाले. प्रकांड पंडित आणि प्रज्ञावंत मॅक्समुल्लर इंग्लंडमध्ये राहत होते. सतत चाळीस वर्षे परिश्रम करून त्यांनी वेदांचे इंग्रजीत भाषांतर केले होते. या प्रज्ञावंताला भेटण्यासाठी विवेकानंद तिथे गेले. मॅक्समुल्लरनी त्यांचे आत्मीयतेने आणि आदरपूर्वक स्वागत केले. दोन प्रज्ञावंतांच्या भेटीचा तो अपूर्व क्षण होता. त्यांचे वैचारिक आदान-प्रदान झाले. मॅक्समुल्लर त्यांना म्हणाले, ‘‘स्वामीजी, आपण मला माहिती पुरवाल तर मी श्रीरामकृष्ण परमहंसांचे जीवनचरित्र लिहीन.’’ विवेकानंदांनी त्यांना त्यासाठी आवश्यक सामग्री पाठविली. मॅक्समुल्लरनी ‘श्रीरामकृष्णांचे जीवन आणि उपदेश’ हे पुस्तक लिहिले. भारतात परतताना युरोपातील अनेक देशांना विवेकानंदांनी भेट दिली. अर्थात ही भेट निरुद्देश नव्हती. पश्‍चिमेकडील देशांत वेदान्तधर्माची विजयपताका फडकवून ते भारतात परतले.

समर्पित भावनेने भारतीय परंपरेची जगाला ओळख करून देणारे प्रवक्ते म्हणून विवेकानंदांचे नाव गौरवाने घेतले जाते. पूर्वेची खरीखुरी ओळख पश्‍चिमेला करून देणारे ते श्रेष्ठ विचारवंत होते.