पूर्वसूरींच्या पायावरच आमची प्रयोगशीलता!

0
89

– विष्णू सूर्या वाघ

एका प्रख्यात समीक्षकाने पं. जितेंद्र अभिषेकी यांना एकदा प्रश्‍न केला- ‘‘संगीत हे नाटकाचे आवश्यक अंग आहे असे आपल्याला वाटते का? तसं असल्यास संगीताचं नाटकात स्थान काय?’’
या प्रश्‍नावर बुवांनी दिलेलं उत्तर अभ्यासपूर्ण आणि आशयघन होतं. बुवा म्हणाले- ‘‘नाटकातच कशाला? मानवी समाजाच्या प्रत्येक कलेत संगीताचं स्थान वैशिष्ट्यपूर्णच आहे. ते स्थान जो माणूस जाणू शकत नाही त्याचा संवादच बेसूर व बेताल होतो.’’ मग हा मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी बुवा ‘विष्णु धर्मोत्तर’मधील राजा व प्राज्ञ यांचा संवाद उद्धृत करायचे. हा संवाद असा चालतो-
राजा : निर्गुण निराकारा, मला मूर्ती घडवण्याची कला शिकव.
प्राज्ञ : चित्रकला न जाणणारा तू, तुला शिल्प कसे समजेल?
राजा : मग मला चित्रकला येऊ दे.
प्राज्ञ : नृत्य न जाणणारा चित्र कसे काढू शकेल?
राजा : मग मला नृत्यकला शिकव.
प्राज्ञ : तत, वितत, घन, सुषीर वाद्ये न जाणणारा तू नृत्याचा का विचार करतोस?
राजा : मग मी काय करावे असे आपणास वाटते?
प्राज्ञ : संगीत जाणणाराच हे करू शकतो.
राजा : कोणतीही कला संगीताच्या अवस्थेप्रत जाण्याचा हव्यास बाळगते, असे तर तुम्हाला सांगावयाचे नाही ना?
प्राज्ञ : होय. म्हणूनच हे राजा, तू सर्वप्रथम व सदासर्वकाळ संगीत शीक.

वरील संवाद सांगितल्यानंतर बुवा म्हणाले ः खरे म्हणजे संगीत हे नाटकाचे आवश्यक अंग आहे किंवा नाही असले ‘गजकर्णी’ प्रश्‍न याच देशातले रिकामटेकडे लोक निर्माण करीत असतात. इतर कोणत्याही देशांतील लोकांसमोर असले प्रश्‍न निर्माण होतच नाहीत. कारण आपणाला नक्की काय हवंय व काय द्यायचंय हे त्यांना आधीच माहीत नसतं. आम्हाला नेमकं तेच कळू शकलेलं नाही. भरतासमोर किंवा पूर्वीच्या कोणत्याही नाटककारासमोर उभा न राहिलेला हा प्रश्‍न नेमका या महाभागांच्या समोर उभा राहून याना संत्रस्त करीत आहे. याउलट भरतमुनी नाट्यशास्त्रात संगीत व गीत हे नाट्याचे एक आवश्यक अंग मानून त्याच्या साहाय्यानेच ‘भाव’ आणि ‘रस’ यांची चर्चा करतात आणि ठणकावून सांगतात-
गीते प्रयत्ने प्रथमं तु कार्यम्‌|
शय्यांही नाट्यस्य वदन्ति गीतम्‌॥
गीते च वाद्ये च ही सप्रयुक्ते|
नाट्यं प्रयोगे न विपत्ती मेऽति॥
मानवातील नाट्य हे ब्रह्मांडातील निसर्गसिद्ध व नियमितपणे समांतर राहणार्‍या ‘लय’ या क्रियेतून निर्माण झाले आणि त्याने निसर्गसिद्ध अशा या लयीचा आविर्भाव हर्ष-क्रोधादी उर्मीमुळे साहजिकच अवयवांच्या द्वारे सुस्पष्ट व व्यक्त केला यालाच आपण नाट्य म्हणतो. म्हणजे लय हेच संगीताचे व अंतिमतः नाटकाचे अधिष्ठान आहे. एवढं सांगूनही ज्या महाभागांना संगीत हा नाटकाचा अविभाज्य भाग आहे हे कळू शकणार नाही किंवा ते मुद्दाम समजू शकणार नाहीत त्यांना काय म्हणावे? अशा लोकांना ‘प्रोज’ ही शिवीच देणे योग्य! अशा लोकांची मानसिक पातळी एकसारखे निरर्थक प्रश्‍न विचारणार्‍या बाष्कळ मुलांसारखीच असते. माझ्यासमोर हा प्रश्‍न कधीच उभा राहिला नाही. कारण चांगल्या संवादातून मी सूर ऐकू शकतो व उत्कृष्ट नाट्यगीतांत मी नाट्य अनुभवू शकतो.
मराठी संस्कृतीवर पडलेला नाट्यसंगीताचा प्रभाव प्रत्येकाने मान्य केला पाहिजे असे पंडितजींचे आग्रही मत होते. म्हापसा येथे १९६८ साली ४९ वे मराठी नाट्यसंमेलन मो. ग. रांगणेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. त्यावेळी काढलेल्या ‘रंगदेवता’ नावाच्या विशेषांकात पंडितजींनी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत ते म्हणतात, ‘‘पं. रविशंकर मला नेहमीच खाजगीत एक मनातली गोष्ट सांगतात- सगळं जग फिरलो. अनेक प्रकारच्या श्रोत्यांपुढं कार्यक्रम सादर केले. पण महाराष्ट्रात जो ‘नजर’ असलेला श्रोता मला मिळू शकला तसा कुठेही मिळू शकला नाही.’’ महाराष्ट्रात असा तल्लख श्रोता निर्माण करण्यात नाट्यसंगीतानेच विशेष वाटा उचलला आहे. आजदेखील मराठी मुलखातील सर्वसामान्य श्रोता ‘मृगनयना रसिकमोहिनी’वरून दरबारी किंवा ‘जा न भय न मम मना’वरून मालकंस ओळखताना दिसून येतो. विशेषकरून वडीलधारे लोक. यात कमीपणा कोणताही नाही. शिक्षणक्रमातदेखील ‘डायरेक्ट मेथड’ म्हणून आजकाल जे काही वापरले जाते, त्यातलाच हा प्रकार.
‘सं. मत्स्यगंधा’ नाटकापासून संगीत रंगभूमीचे एक नवीन पर्व सुरू झाले. नाट्यसंगीतात काही वेगळे प्रयोग होऊ लागले. ‘मत्स्यगंधा’नंतर ‘ययाती आणि देवयानी’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकांतले अभिषेकींचे संगीत गाजले व लोकप्रिय झाले. या पार्श्‍वभूमीवर कोणालाही आपल्या नाट्यसंगीतातील प्रयोगशीलतेचा यथोचित गर्व वाटणे स्वाभाविक होते, पण अभिषेकीबुवा मात्र त्याला अपवाद ठरले. आपण नवीन काहीच केले नाही. पूर्वसूरींनी जो पाया रचून ठेवला त्यावरच आपल्या कथित प्रयोगशीलतेची इमारत उभी झाली हे निःसंकोचपणे सांगताना त्यांना जराही कमीपणा वाटला नाही. यासंदर्भातली त्यांची मते जाणून घ्यायला ती संपूर्ण मुलाखतच काळजीपूर्वक वाचायला हवी. त्या अत्यंत दुर्मीळ अशा मुलाखतीमधला प्रश्‍नोत्तराच्या स्वरूपातील हा भाग ः
प्रश्‍न : हल्ली, म्हणजेच गेल्या पाच-सहा वर्षांत मराठी रंगभूमीवर आलेली संगीत नाटके बाजूला ठेवून, त्यापूर्वी रंगभूमीवर गाजलेल्या संगीत नाटकांतील संगीतावर आपले मत स्पष्ट सांगाल का?
उत्तर : मला स्वतःला गेल्या दहा वर्षांत स्थिर झालेल्या नवीन नाटकांपेक्षाही पूर्वीच्या नाटकांतील गाणी विशेष आवडतात. रस व भावपरिपोषाच्या दृष्टीने या नाट्यगीतांत मोठी ताकद दिसून येते. यांत मी संगीत दिलेली नाटके वगळीत नाही. विशेषतः किर्लोस्कर व देवल या दोन नाटककारांना संगीताची बैठकच होती असे मला पावलोपावली दिसून येते. या दोन्ही नाटककारांच्या प्रत्येक पदापूर्वीचा गद्य भाग कुणीही जरूर न्याहाळावा. आजच्या नाटककारांनी तर जरूरच. पदाची बांधणी केल्यानंतर त्या त्या पदाच्या नादमाधुर्याच्या व जडणघडणीच्या अंगानेच वरील दोन्ही नाटककारांचे संवाद फुलत जातात. पुढे येणार्‍या पदाची लय पहिल्या गद्यात साहजिक ओघाने उभी केली गेली आहे. हे झाले काव्याबद्दल. पूर्वीच्या नाटकांत ज्या लोकांनी संगीत दिले ते फक्त संगीत-दिग्दर्शक नसून स्वतः गायक होते. त्यामुळे साहजिकच त्या-त्या गीतातील नाट्याभिनिवेष त्यांना स्वतःला अभिप्रेत झाल्यानंतरच त्यांनी चाली सिद्ध केल्या. आम्ही जे काही आज करतो त्यामागे या लोकांचे संस्कारच उभे आहेत. आम्ही आज करतो त्यामागे या पूर्वसूरींची छाया उभी आहे आणि या छायेतच आम्ही वावरत आहोत.
प्रश्‍न : गेल्या पाचदहा वर्षांत रंगभूमीवर गाजलेल्या मराठी संगीत नाटकांतील संगीतावर आपले स्पष्ट मत सांगाल का?
उत्तर : गेल्या पाच-दहा वर्षांत रंगभूमीवर गाजलेल्या मराठी संगीत नाटकांतील संगीतावर (यात माझीही संगीतरचना अंतर्भूत होते) मी स्वतः संतुष्ट नाही. अपेक्षापूर्तीचा आनंदच इथे गहाळ होऊन बसलेला दिसून येतो. कुठंतरी अपुरेपणाची तहान थैमान घालीत आहे. तहान लागलेल्याला पळीने पाणी पाजल्यासारखे आमचे आजचे संगीत आहे. रसिक श्रोता दुसरे चांगलेसे काहीच मिळत नाही म्हणूनच आमचे चालवून घेतो. थिएटरच्या आसपास असल्यास नाटकाचा खेळ सुटल्यानंतर घरी परतणार्‍या प्रत्येक श्रोत्याच्या नजरेत त्याचे प्रतिबिंब मला दिसते. मोठे अस्वस्थ करणारे प्रतिबिंब. त्याला कानात सांगावेसे वाटते- ‘अरे गरुडाची झेप घेण्याची ताकद हरवून बसलेल्या पिढीत आम्ही जन्माला आलो. आमच्यासारख्या वटवाघळांना तू मानतोस! तुझी व्यथा, तुझी भूक मी जाणतो. पण ही बुद्धीच खोट्या अन्नावर वाढली, मी तरी काय करू?’ जाऊ द्या. यापेक्षा अधिक स्पष्ट लिहिल्यास आधीच आमच्याविषयी असलेल्या गैरसमजात आणखी भर पडेल म्हणूनच ते जाऊ द्या. आज जे काही रंगभूमीवर चालले त्याच्या मूलभूत प्रकृतीवर उखडणार्‍या आमच्या प्रवृत्ती आपापली आसने घट्ट धरून बसलेल्या लोकांशी आणि जे बलिष्ट आहेत त्याच्याशी कितपत झुंज देऊ शकणार? म्हणून तेरी और तेरे साथ मेरी भू चूप!
प्रश्‍न : बरेच मराठी नाट्यसंगीत आजपर्यंत स्वतंत्रपणे रागावर आधारण्यापेक्षा किंवा रचण्यापेक्षा हिंदी संगीतातील बंदिशीवर खिळे ठोकल्याप्रमाणे बसविले गेले आहे. त्यामुळे नाट्यसंगीताला रेखीवपणा व बांधेसूदपणा प्राप्त झाला. परंतु त्याच्या प्रकृतीवर याचा काही परिणाम झाला असे आपणास वाटते का? मराठी नाट्यसंगीत असे म्हटल्याबरोबर त्याचा यामुळे एक ठराविक साचा होऊन बसला असे आपणास वाटते का?
उत्तर : किर्लोस्कर व देवलांनंतर मराठी नाट्यसंगीताचा एकच एक साचा ठरून गेला. याला कारणीभूत त्यावेळचे संगीतकार व त्यांच्याबरोबर त्यांच्याएवढेच त्या वेळचे संगीत भूमिका करणारे गायक-नटही आहेत. ‘माझ्या गळ्याप्रमाणे चाल काढा’ असे सांगणारा एक गायक-नटवर्ग आज रंगभूमीवर थैमान घालतो आहे. मुळात हा गायक-नटवर्ग कुणाची तरी दुसरी किंवा तिसरी पुसट अशी कार्बन कॉपी आहे. या व अशा गायक-नटांनीच नाट्यसंगीताला तोच तोपणा आणला. पूर्वीचे लोक गायले म्हणून हेदेखील गबाळे व अव्यवस्थित गात असतात. पण हे लोक लक्षात घेत नाहीत की पूर्वीच्या लोकांच्या गायनात जो ठाशीवपणा व रेखीवपणा होता तो इतका मोठा होता की कितीही मोठे दोष झाकून टाकण्याची शक्ती या गायकांत होती. तसेच संगीत रचनाकारदेखील हिंदी ‘बंदिशी’ शोधत फिरू लागले. मिळाली ‘बंदिश’ की घुसड हवी तेथे हवी तशी. यामुळे स्वतंत्र सांगीतिक रचना मागे पडली व हिंदी चीजांवर मराठी शब्दांची कलमे उगवू लागली. ‘बाबा दख्खनी और पेहेराव कनौजी’ असल्या प्रकारामुळे पदे खूप झाली पण मॅटर वाढले नाही.
प्रश्‍न : नाट्य संगीतात नावीन्यपूर्ण प्रयोग करणे, वेगवेगळ्या दिशांनी ते वाढीला लावणे, फक्त व्यावसायिक यश-अपयश यांचा विचार न करता त्यांच्यात मूलभूत व क्रांतिकारक प्रयोग करणे याविषयी आपली मते आपण मांडावी अशी इच्छा आहे.
उत्तर : नावीन्यपूर्ण प्रयोग रंगभूमीवर करणे किंवा परंपराच कुरवाळीत बसणे या झगड्यात आम्हाला हवे किंवा नको हे वाटण्यालादेखील अवसर नाही अशा वेगाने आज काळ पुढे धावत आहे. आपल्या वाटण्याला आज अर्थ येण्यासदेखील सवड नाही. ज्या व्यक्ती व संगीतकार आपल्या यशाप्रमाणेच अपयशाचेही छातीठोक स्वतः धनी आहोत असे सांगू शकतात, ते प्रयोग करीतच पुढे जाणार. माझ्या यशाप्रमाणेच माझ्या अपयशाचाही मीच धनी आहे हे सांगताना मला कोणतीच लाज वाटत नाही. त्यामुळे मी सातत्याने आयुष्यभर प्रयोगच करीत राहीन. एकेका सुरावर कित्येक गायकांनी आयुष्यभर प्रयोग केले. तिथे आम्ही करतो ते प्रयोग म्हणजे ‘सागरात माझ्या एका थेंबाची भर’ असे म्हणण्यासारखे होय. असे प्रयत्न चारी दिशांनी झाले पाहिजेत, तरच हे शिवधनुष्य पुन्हा एकवार उचलले जाईल. नसल्यास दशाननाप्रमाणे आमच्याच सर्वांच्या छातीवर पुन्हा एकदा ते कोसळेल.
प्रश्‍न : तांत्रिकदृष्ट्या संगीत-नाट्य प्रकाराला मुंबईतील थिएटरांतून असणारी सामग्री अपूर्ण आहे व या दृष्टीने आपण फार मागे आहोत असे वाटते का? असल्यास यावर काय उपाय?
उत्तर : यावर एकमेव उपाय म्हणजे मुंबईतील प्रत्येक थिएटरमधील एअर कंडिशन्स व कूलर्सचा त्रासदायक आवाज प्रथम बंद करणे. एवढे जरी झाले तरी बरेच काही साधू शकेल. प्रेक्षकांचे खोकणे, खाकरणे, चिवडा-वेफर्स खाणे, वेळी-अवेळी उठून जाणे व हालचाल करणे हाही एक जीवघेणा ताप बंद झाल्यास रंगभूमीचे बरेच भले होऊ शकेल.
प्रश्‍न : नाट्य व्यवसायात नवीन गायक नट-नटी निर्माण होण्याच्या दृष्टीने व करण्याच्या दृष्टीने काही निश्‍चित मार्ग किंवा उपाय आपल्या नजरेसमोर आहेत काय?
उत्तर : या बाबतीत पूर्वीच्या नाटक कंपन्या बरेच काही करीत असत. या नाटक कंपन्यांतून लहान मुले उमेदवारी करीत. ही उमेदवारी त्यांचे गुण सिद्ध होईपर्यंत चालू राही व उत्कृष्ट उपजत गुणांची चालकांना अशा मुलांच्या बाबतीत चाहूल लागल्यास त्यांना मनःपूर्वक शिक्षण दिले जाई. परीक्षा घेण्यासाठी कोळ्यांच्या पोरांना जसे दर्यात फेकून दिले जाते तसे या अशा मुलांना अचानक प्रेक्षकांसमोर उभे केले जाई. त्याचप्रमाणे पूर्ण वेळ त्यांच्या नाट्य व संगीतविषयक अभ्यासाकडे प्रयत्नपूर्वक लक्ष दिले जाई. एकेका संवादाची किंवा गाण्याची आठआठ तास संथा म्हणून घेतली जाई. असाच योजनाबद्ध विचारपूर्वक प्रयत्न नवीन गायक-नटाच्या बाबतीत केला पाहिजे. नवीन गायक व नट शोधून काढून आठआठ तास त्यांच्याकडून रोज रियाज करवून घेतला जावा. याबरोबरच त्यांच्या पोटापाण्याची काळजीही पूर्णपणे दूर झाली पाहिजे. सरकारी किंवा श्रीमंत संस्थांच्या आश्रयाखालीच तरबेज व द्रष्ट्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने हे कार्य होऊ शकेल. भविष्यकाळात गायक-नट म्हणून ‘करियर’ घेऊ पाहणारेच हे करू शकतील. नसल्यास ‘अहोरूपम् अहो ध्वनि’ हा प्रकारच याहीपुढे चालू राहील.
प्रश्‍न : आजच्या नवीन गायक नट-नट्यांविषयी आपले मत काय? संगीत नटांतील कॉपीकॅट प्रवृत्तीविषयी आपले काय मत?
उत्तर : म्हातारपणी उत्तर देण्यासारखा हा प्रश्‍न आहे. आणि मी म्हातारा झालोय असे माझ्या म्हातारपणीही मला वाटणार नसल्यामुळे या प्रश्‍नाचे उत्तर नकोच. कॉपीकॅट प्रवृत्ती काही दिवस भाव खाऊन जाते, पण नंतर लोकांना मुळातील आवृत्तीच बरी वाटू लागले व असे लोक मागे पडतात. मुळात काही नसणारेच या कॉपीकॅट प्रवृत्तीला बळी जात असतात.
प्रश्‍न : संगीत नाटकाच्या भविष्यकाळाविषयी आपणास काय वाटते?
उत्तर : संगीत नाटकाचा भविष्यकाळ उज्ज्वल होता, आहे व असेल. आमच्याच भविष्यकाळाची शाश्‍वती नाही. नाटकाच्या भवितव्यापेक्षा आमच्या भविष्यकाळाच्या जडणघडणीच्या दृष्टीने प्रयत्न केल्यास नको असलेल्या चिंता करीत बसण्याची गरज भासणार नाही.